काँग्रेसच्या नेत्या व वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी-वाड्रा त्यांच्या बॅगमुळे सध्या चर्चेत आहेत. सोमवारी (१६ डिसेंबर) त्या पॅलेस्टाईन लिहिलेली एक बॅग घेऊन दिसल्या. ही बॅग संसदेत आणून त्यांनी संघर्षग्रस्त प्रदेश पॅलेस्टाईन येथील लोकांच्या समर्थनाचा इशारा दिला. त्याच्या एक दिवसानंतर त्या बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या दुर्दशेबद्दल एक वाक्य असलेली नवीन बॅग घेऊन दिसल्या. हा मुद्दा भाजपाच्या अनेक नेत्यांनी उचलून धरला आणि त्या स्थानिक समस्यांपेक्षा जागतिक समस्या मांडत असल्याची टीका केली. नेमके प्रकरण काय? प्रियांका गांधी यांच्या बॅगेवरून सुरू झालेला वाद काय? जाणून घेऊ.
प्रकरण काय?
सोमवारी (१६ डिसेंबर) प्रियांका गांधी-वाड्रा संसदेत ‘पॅलेस्टाईन’ असा शब्द असलेली हॅण्डबॅग घेऊन जाताना दिसल्या. बॅगेवर पॅलेस्टिनी चिन्हांपैकी एक टरबूजचे चिन्ह होते. हे चिन्ह पॅलेस्टाईनला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी वारंवार वापरले गेले. त्या मंगळवारी बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या दुरवस्थेच्या समर्थनार्थ घोषणा देणारी नवीन बॅग घेऊन दिसल्या. या वर्षाच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान शेख हसीना यांची उचलबांगडी झाल्यापासून बांगलादेशात अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यांचा संदर्भ देत त्यांनी त्यांच्या बॅगेवर ‘बांगलादेशी हिंदू आणि ख्रिश्चनांच्या पाठीशी उभे राहा,’ असे लिहिले होते. वाड्रा यांच्या बॅगेचा इतर विरोधी खासदारांनी निषेध केला. लोकसभेत सोमवारच्या आपल्या भाषणात, वाड्रा यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचा मुद्दा सरकारला उपस्थित करण्यास सांगितले. ख्रिश्चन आणि हिंदूंच्या सुरक्षेसाठी त्यांनी केंद्राला ढाकाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याची विनंती केली.
हेही वाचा : Sovereign Gold Bond : स्वस्त सोने विकण्याची सरकारची योजना होणार बंद? कारण काय?
पॅलेस्टिनींचे समर्थन
प्रियांका गांधी वाड्रा यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आणि गाझामध्ये इस्रायलने केलेल्या लष्करी हल्ल्यावर टीका केली आहे. परंतु, नवनिर्वाचित वायनाड खासदार म्हणून त्यांनी आपल्या भूमिकेकडे बरेच लक्ष वेधले आहे. यापूर्वी त्यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सरकारचा निषेध केला. ७ ऑक्टोबर रोजी हमास या इस्लामी संघटनेने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे आक्रमण करण्यात आले. प्रियांका यांनी, गाझामधील परिस्थितीला भीषण नरसंहार, असे म्हटले आणि जूनमध्ये नेतान्याहू यांच्या सरकारवर अन्यायकारक वागणुकीचा आरोप केला. “द्वेष आणि हिंसाचाराला विरोध करणाऱ्या इस्रायली नागरिकांसह इस्त्रायली सरकारच्या कृतीचा निषेध करणे आणि या अत्याचारांना थांबविण्याची मागणी करणे ही प्रत्येक उजव्या विचारसरणीच्या व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे,” असे प्रियांका यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले. ‘पीटीआय’च्या मते, नवी दिल्लीतील पॅलेस्टाईन दूतावासाच्या चार्ज डी अफेअर्स अबेद एलराजेग अबू जाझर यांनी वाड्रा यांचे गेल्या आठवड्यात वायनाडमधील निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदनही केले होते.
पाकिस्तानी राजकारण्याकडून कौतुक
पाकिस्तानी राजकारणी व पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय)चे माजी नेते फवाद चौधरी यांनी वाड्रा यांनी केलेले विधान आणि पॅलेस्टाईनला त्यांनी दिलेला पाठिंबा याबद्दल प्रियांका गांधी यांचे कौतुक केले. त्यांनी विधान केले, “जवाहरलाल नेहरूंसारख्या उत्तुंग स्वातंत्र्यसैनिकाच्या नातवंडाकडून आपण अशीच अपेक्षा करू शकतो.” त्यांनी पाकिस्तानी राजकारण्यांवरही टीका केली, “इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे की, आजपर्यंत कोणत्याही पाकिस्तानी संसद सदस्याने असे धाडस दाखवलेले नाही.”
बॅगेवरून प्रियांका गांधींवर भाजपाची टीका
प्रियांका गांधींच्या भूमिकेवर त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला; तर भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. प्रियंका गांधींवर भाजपाने तुष्टीकरणाच्या राजकारणात गुंतल्याचा आरोप केला. भाजपा नेते अनिर्बान गांगुली यांनी काँग्रेसला नवीन मुस्लिम लीग म्हटले आणि प्रियांका गांधी यांच्यावर जागतिक घडामोडींबाबत अनभिज्ञ असल्याचा आरोप केला. गांगुली पुढे म्हणाले की, त्यांची वागणूक विभाजनकारी राजकीय अजेंडा आणि हिंदूविरोधी वृत्ती दर्शविते. “पंडित नेहरूंपासून ते प्रियंका गांधींपर्यंत, त्यांनी नेहमीच त्यांची हिंदुविरोधी मानसिकता दाखवली आहे,” असे ते म्हणाले. ‘एनडीटीव्ही’शी बोलताना गांगुली म्हणाले, “बांगलादेशी हिंदूंच्या प्रश्नांवर त्यांनी मौन का पाळले? हे मोठे प्रश्नचिन्ह आहे. ही भारतीय संसद आहे. १४० कोटी भारतीयांच्या मनातील चिंता मांडण्यासाठी देशभरातून खासदार निवडून येतात. आधी असदुद्दीन ओवेसी यांनी ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा दिला आणि आता प्रियांका गांधींनी पॅलेस्टाईनची बॅग संसदेत आणली.”
भाजपाच्या आयटी युनिटचे प्रमुख अमित मालवीय यांनी, “संसदेच्या या अधिवेशनाच्या शेवटी, जे प्रियांका गांधी वाड्रा यांचे म्हणणे हाच उपाय आहे, असे मानतात, त्या काँग्रेसमधील प्रत्येकासाठी दोन मिनिटांचे मौन पाळावे, असे आवाहन केले. “संसदेत पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ बॅग घेऊन वावरणे म्हणजे जातीयवादी पवित्रा आहे,” असे मालवीय यांनी ‘एक्स’वर लिहिले.
प्रियांका गांधी यांची तीव्र प्रतिक्रिया
प्रियांका गांधी वाड्रा यांनी भाजपाच्या आरोपांना उत्तर दिले. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, “मी काय वापरते हे कोणीही ठरवू शकणार नाही. मी कोणते कपडे घालायचे हे कोण ठरवणार आहे? ही विशिष्ट पितृसत्ताकता आहे का महिलांनी काय परिधान करावे हे तुम्ही ठरवता. मी याचे सदस्यत्व घेत नाही. मला जे हवे आहे, ते मी घालेन.” त्या पुढे म्हणाल्या, “याबद्दल माझे मत काय आहे हे मी अनेकदा सांगितले आहे. तुम्ही माझे ट्विटर हँडल पाहिल्यास, माझ्या सर्व टिप्पण्या तेथे आहेत.” प्रियांका गांधी यांनी भाजपावर मानवतावादी मुद्द्यांवर दबाव आणण्यापासून लक्ष विचलित केल्याचा आरोप केला आणि त्या म्हणाल्या, “त्यांना सांगा की, त्यांनी बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू आणि ख्रिश्चनांवर होत असलेल्या अत्याचारांबद्दल काहीतरी केले पाहिजे.”
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार पी. संदोष कुमार यांनी पॅलेस्टाईनचा मुद्दा तुष्टीकरणाच्या डावपेचाऐवजी मानवतावादी असल्याचा दावा करून प्रियांका गांधी वाड्रा यांचा बचाव केला. “पॅलेस्टाईनची बॅग बाळगणे हे मुस्लिम तुष्टीकरण नाही. जे लोक पॅलेस्टाईनचा प्रश्न मुस्लिम समस्येशी जोडतात, ते अन्याय करीत आहेत. कारण- ही मानवतावादी समस्या आहे,” असे कुमार यांनी एएनआयला सांगितले. ही एक जागतिक समस्या आहे; ज्यासाठी सर्वांची सामूहिक मदत आवश्यक आहे.
हेही वाचा : लैंगिक छळ प्रतिबंधक ‘पॉश’ कायदा राजकीय पक्षांना लागू होणार? हा कायदा पुन्हा चर्चेत येण्याचे कारण काय?
h
दोन्ही मुद्द्यांवर भारताची भूमिका
निष्पाप जीवांच्या सततच्या हानीमुळे चिंतीत झालेल्या भारताने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. सरकारने ताबडतोब युद्धविराम आणि गाझामधील लोकांसाठी मदतीची मागणी केली आहे. भारताने एक व्यवहार्य, स्वतंत्र आणि सार्वभौम पॅलेस्टिनी राज्य निर्माण करण्याचे आवाहन केले, जे इस्रायलच्या बरोबरीने शांततेत आणि सुरक्षिततेने राहू शकेल. केंद्राने पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी युनायटेड नेशन्स रिलीफ अॅण्ड वर्क एजन्सी (UNRWA) ला पाच दशलक्ष डॉलर्स प्रदान केले आहेत आणि संघर्ष सुरू झाल्यापासून औषधांसह जवळपास ७० मेट्रिक टन मदतीचा पुरवठा पाठवला आहे. बांगलादेश आणि भारताचे मजबूत सामरिक आणि ऐतिहासिक संबंध आहेत. परंतु, माजी पंतप्रधान शेख हसीना यांची उचलबांगडी झाल्यापासून अल्पसंख्याकांवर हल्ले होत असल्याच्या अलीकडील अहवालांमुळे चिंता व्यक्त करण्यात आली आहे.