रशियाने युक्रेनमध्ये उत्तर कोरियामध्ये तयार झालेल्या क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचा आरोप अमेरिकेने अलीकडेच केला होता. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन आपल्याकडील अद्ययावत क्षेपणास्त्रांचे वारंवार प्रदर्शन करीत असले, तरी अद्याप त्याचा प्रत्यक्ष रणांगणावर वापर प्रथमच झाल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर ही अस्त्रे कोणती, ती किती घातक आहेत, रशियाच्या हाती ही अस्त्रे पडणे युक्रेन आणि ‘नाटो’साठी किती धोकादायक आहे, याचा हा आढावा…
रशियाने डागलेली क्षेपणास्त्रे कोणती?
रशियाने युक्रेनमध्ये नेमक्या कोणत्या कोरियन क्षेपणास्त्रांचा वापर केला, हे अमेरिकेने स्पष्ट केलेले नाही. मात्र अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे समन्वयक जॉन किर्बी यांच्या मते क्षेपणास्त्रांच्या आरेखनानुसार ती केएन-२३ आणि केएन-२५ ही ९०० किलोमीटर पल्ल्याची क्षेपणास्त्रे असू शकतात. युक्रेनवासीयांनी समाजमाध्यमांवर प्रसृत केलेली छायाचित्रे आणि चित्रफितींमध्ये आढळलेल्या अवशेषांवरून, ही क्षेपणास्त्रे हॉसाँग-११ या उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र दलातील असू शकतात असे नेदरलँड्समधील तज्ज्ञ जूस्ट ओलिनमन्स यांचे म्हणणे आहे. याच क्षेपणास्त्र संचात केएन-२३ आणि केएन-२५ मोडतात, हे विशेष.
हेही वाचा : विश्लेषण : महाराष्ट्रात भाजप जास्त जागांसाठी आग्रही? महायुतीत जागांसाठी कशी रस्सीखेच?
‘केएन’ श्रेणीतील क्षेपणास्त्रांची वैशिष्ट्ये काय?
घनरूप इंधनाचा (सॉलिड फ्युएल) वापर असलेल्या केएन-२३ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी मे २०१९मध्ये करण्यात आली. कमी उंचीवरून उड्डाण करत क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांना चकवा देण्याची क्षमता यामध्ये आहे. उत्तर कोरियाने प्रक्षेपक वाहनावरून, रेल्वेच्या डब्यातून, जमिनीत गाडलेल्या अवस्थेत आणि पाणबुडीतून हे क्षेपणास्त्र डागण्याच्या चाचण्या घेतल्या आहेत. केएन-२४ हेदेखील घनरूप इंधनावरील क्षेपणास्त्र असून २०१९मध्येच त्याचीही चाचणी घेण्यात आली होती. तज्ज्ञांच्या मते उत्तर कोरियाने या क्षेपणास्त्राचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केले आहे. ती लष्करी सेवेतही दाखल झाल्याचे सांगितले जाते. केएन-२४देखील क्षेपणास्त्रविरोधी प्रणालीला चकवा देण्यास सक्षम आहे. मात्र ही सर्व क्षेपणास्त्रे संपूर्णत: कोरियन बनावटीची असून त्यांचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी कोरियाच्या तज्ज्ञांना युद्धभूमीवर असणे आवश्यक आहे. याचा दुसरा अर्थ असा, की रशियाने युक्रेनमध्ये ही क्षेपणास्त्रे डागली असतील, तर त्यांचे तज्ज्ञ रशियामध्ये उपस्थित असतील.
हेही वाचा : मालदीवच्या विकासात भारताचं योगदान; विमानतळ-पाणी पुरवठा-कॅन्सर हॉस्पिटल- क्रिकेट स्टेडियम
रशियाला कोरियन क्षेपणास्त्रे कशी मिळाली?
२००६मध्ये अण्वस्त्र चाचणी केल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी उत्तर कोरियावर निर्बंध लादले आहेत. रशियाचा पाठिंबा असलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार अन्य देशांना उत्तर कोरियाबरोबर शस्त्रास्त्रे किंवा अन्य लष्करी साहित्याचा व्यापार करता येत नाही. नोव्हेंबर २०२३मध्ये उत्तर कोरियाने रशियाला ‘शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल’ (एसआरबीएम) पुरविल्याचा आरोप केल्यानंतर दोन्ही देशांनी त्याचा इन्कार केला होता. मात्र गतवर्षी किम जोंग उन आणि व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी संबंध अधिक दृढ करण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. गतवर्षी ऑगस्टपासून उत्तर कोरियाच्या ईशान्य किनारपट्टीवरील रॅसन बंदरात रशियाच्या लष्कर रसद यंत्रणेतील जहाजांची ये-जा होत असल्याचा दावा अमेरिका आणि दक्षिण कोरियाने उपग्रह प्रतिमांच्या आधारे केला आहे. नोव्हेंबरपर्यंत रॅसन बंदरातून असे २ हजार कंटेनर रशियाकडे गेल्याचा अंदाज आहे. केएन-२४चे सिंन्हुग येथील कारखान्यात उत्पादन होते. किम जोंग यांनी या कारखान्याच्या भेटीवेळी छायाचित्रेही काढून घेतली होती. याच कारखान्यातून रॅसनमार्गे ही क्षेपणास्त्रे रशियाला गेली असावीत, असा अंदाज आहे.
हेही वाचा : विश्लेषण: मेट्रो पांढरा हत्ती ठरतेय का?
या व्यवहारातून उत्तर कोरियाचा फायदा काय?
क्षेपणास्त्रे आणि अन्य शस्त्रास्त्रांच्या बदल्यात उत्तर कोरियाला रशियाकडून लढाऊ विमाने, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, चिलखती वाहने, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या उत्पादनाचे साहित्य किंवा कच्चा माल तसेच अन्य अद्ययावत तंत्रज्ञान दिले जात असल्याचा गुप्तहेर अहवाल असल्याचा दावा किर्बी यांनी केला आहे. किम जोंग उन यांना हे अद्ययावत तंत्रज्ञान पुरविण्यासाठी पुतिन किती उत्सुक आहेत, हा प्रश्न असला तरी अमेरिकेच्या निर्बंधांमुळे जगात एकाकी पडलेले दोन शेजारी देश ही देवाणघेवाण करू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाने खरोखरच रशियाने उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रे डागली असतील आणि त्यांनी अचूक लक्ष्यभेद केले असतील तर ती अमेरिका आणि नाटोसाठी धोक्याची घंटा ठरेल. कारण उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रे ‘नाटो’ने युक्रेनला पुरविलेल्या अद्ययावत क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा भेदण्यात यशस्वी ठरली, असा अर्थ यातून निघू शकतो.
amol.paranjpe@expressindia.com