-मोहन अटाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा महामार्ग कायमच चर्चेत राहिला आहे. महामार्गाच्‍या बांधकामाच्‍या सुरुवातीला अनेक अडचणी आल्‍या. प्रत्‍यक्ष कामाला सुरुवात झाली, त्‍यावेळी हा महामार्ग ऑक्‍टोबर २०१२ मध्‍ये सुरू होणार, असे सांगण्‍यात आले होते. पण, विविध कारणांमुळे मुहूर्त हुकले. जमीन अधिग्रहण, करोना काळातील टाळेबंदी, नामकरणावरून राजकीय मतभेद, अशा अडथळ्यांना सामोरे जात आता या प्रकल्पाचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन २ मे २०२२ रोजी होणार होते, पण अपूर्ण कामामुळे मुहूर्त लांबला. मध्यंतरीच्या काळात महामार्गावर बांधकामादरम्यान दोन मोठे अपघात घडल्याने कामाच्या गतीवर परिणाम झाला. आता अखेर या महामार्गाचे पहिल्‍या टप्‍प्‍याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ११ डिसेंबरला होणार आहे.

बांधकामादरम्यान कोणते अपघात घडले?

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या ७०१ किलोमीटरच्या बांधकामात नागपूरपासून ३६ किलोमीटर अंतरावर वन्यजीव उन्नत मार्गाच्या कमानी २४ एप्रिल २०२२ रोजी कोसळल्या. त्यानंतर २७ एप्रिलला बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजाजवळ क्रेनच्या सहाय्याने काँक्रिट गर्डर पुलाच्या पियरवर ठेवण्याचे काम सुरू होते. क्रेनच्या सहाय्याने गर्डर वर उचलला जात असताना क्रेनला लावलेला जॅक निखळला आणि गर्डर जमिनीवर कोसळला. या दोन अपघातांमुळे कामाच्या गतीवर परिणाम झाला.

महामार्गाच्या कामात कोणते अडथळे आले?

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात २०१५मध्‍ये समृद्धी महामार्गाची घोषणा करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी भूसंपादनाला अनेक ठिकाणी विरोध झाला. नंतर पाच पट मोबदला देऊन जमीन संपादित करण्यात आली. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शिवसेनेने समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवला. पण नंतर पक्षाने आपली भूमिका बदलली. या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली होती. पण भाजपकडून अटलबिहारी वाजपेयींचे नाव देण्याचा आग्रह होता. अखेर नोव्हेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर महामार्गाला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ असे नाव देण्यात आले.

नक्की पाहा हे फोटो >> फडणवीसांनी चालवलेल्या आलिशान Mercedes-Benz कारची किंमत पाहून व्हाल थक्क! ९ गेअर, ९ एअरबॅग, BJP कनेक्शन अन्…

समृद्धी महामार्गाचे काम कशा पद्धतीने सुरू आहे?

राज्य सरकारने समृद्धी महामार्गाच्या विकासासाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची नेमणूक केली आहे. समृद्धी महामार्गावरील १ ते १६ पॅकेजेसचे बांधकाम अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) तत्त्वावर करण्यात येत असून त्यातील महामार्ग व संरचनेच्या उभारणीसाठी आवश्यक सर्वेक्षण आणि अन्वेषण, त्यावर आधारित संकल्पन, रेखाचित्रे तयार करणे, तसेच त्याला प्राधिकारी अभियंत्याची मंजुरी प्राप्त करणे आणि आवश्यक बांधकाम साहित्य, यंत्रसामग्री, मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी ईपीसी कंत्राटदाराची असते. प्रूफ सल्लागार व सुरक्षा सल्लागाराची नेमणूक करण्यात येऊन सल्लागारांमार्फत बांधकामासाठी आवश्यक मानके तपासून संकल्पन व रेखाचित्रे मंजूर करून घेण्याची जबाबदारीदेखील कंत्राटदाराची आहे.

बांधकामातील दोष दूर करण्याची जबाबदारी कुणाची?

प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास ती स्वखर्चाने दूर करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर सोपविण्यात आली आहे. प्रकल्पाच्या बांधकामासाठी प्राधिकारी अभियंता हे बांधकाम साहित्याची तपासणी व मंजुरी, संकल्पने तपासणी, दैनंदिन पर्यवेक्षण, गुणवत्ता तपासणी, मोजमापाची नोंद व देयके तयार करून मंजूर करणे, झालेल्या कामाची तपासणी करून त्यातील त्रुटी कंत्राटदाराच्या निदर्शनास आणून देणे, त्याची दुरुस्ती करून घेणे ही प्राधिकारी अभियंत्यांची जबाबदारी आहे. प्रकल्पाच्या ४ वर्षांच्या दोष निवारण कालावधीत कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास ती स्वखर्चाने दूर करण्याची संपूर्ण जबाबदारी करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार कंत्राटदाराची आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय आहेत?

मुंबई ते नागपूर ८१२ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी १४ तास लागतात. समृद्धी महामार्गामुळे हे अंतर पार करण्यासाठी ८ तास लागतील. ७०१ किलोमीटर इतकी या महामार्गाची लांबी आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ५५ हजार ४७७ कोटी रुपये आहे. हा महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. महामार्गावर ५० हून अधिक उड्डाणपूल, २४ इंटरचेंजेस असतील. हे इंटरचेंजेस वाहनांसाठी एक्झिट पॉईंट आहेत.

नक्की वाचा >> पाच तासांत फडणवीस-शिंदेंचा ५३० किमी प्रवास; ‘समृद्धी महामार्गा’वर स्पीड लिमिट किती? सर्वसामान्यांना या वेगाने जाता येणार?

महामार्गावर कोणत्या सुविधा राहणार आहेत?

महामार्गावर दर पाच किलोमीटरवर अत्यावश्यक टेलिफोनची सुविधा असेल. फूड प्लाझा, रेस्टॉरंट्स, बस बे, ट्रक टर्मिनस, ट्रॉमा सेंटर या महामार्गावर असतील. समृद्धी महामार्गावर वायफायची सुविधा असेल. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या महामार्गावर २० ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. हा महामार्ग वनक्षेत्रातून जात असल्यामुळे वन्यजीवन प्राण्यांच्या मुक्त वावरासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. या भुयारांमध्ये वाहनांचे आवाज रोखण्यासाठी ध्वनिरोधक यंत्रणा बसवण्यात येत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why samruddhi highway project keeps overshooting deadlines print exp scsg
Show comments