नासा, इस्रोसह जगभरातील अंतराळ संशोधन संस्था मोठ्या प्रमाणात उपग्रह मोहिमा राबवतात. या मोहिमा जगाच्या फायद्यासाठी असल्या तरी त्यामुळे अंतराळात मोठे संकट निर्माण होत आहे; ज्याचा एकूणच परिणाम पर्यावरणावर होत असल्याचे चित्र आहे. आज १०,००० हून अधिक सक्रिय उपग्रह पृथ्वीभोवती फिरत आहेत. २०२० पर्यंत ही संख्या १,००,००० पेक्षा जास्त आणि त्यानंतरच्या दशकात कदाचित अर्ध्या दशलक्षापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. बहुतेक उपग्रह, त्यांच्या जीवनचक्राच्या शेवटी नष्ट होतात. परंतु, त्यांचे विघटन होत असताना ते अंतराळातील वातावरणात सर्व प्रकारचे प्रदूषक सोडतात. उपग्रहांची संख्या जसजशी वाढत जाईल, तसतसे हे प्रदूषणही वाढेल. त्यामुळे काही शास्त्रज्ञांनी याविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्याचे कारण काय? अंतराळातील कचरा पर्यावरणासाठी किती घातक? त्याविषयी जाणून घेऊ.
प्रदूषण करणारे उपग्रह
यूएस नॅशनल ओशनोग्राफिक ॲण्ड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (एनओएए)मधील वायुमंडलीय शास्त्रज्ञ डॅनियल मर्फी आणि इतरांनी निश्चित पुरावे सादर केले की, स्ट्रॅटोस्फियर (पृथ्वीच्या वातावरणातील विविध थरांपैकी एक)मधील १० टक्के एरोसोल कणांमध्ये ॲल्युमिनियम आणि इतर धातू असतात, जे उपग्रह जळाल्यामुळे उद्भवतात. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनचे वातावरणीय रसायनशास्त्रज्ञ कॉनर बार्कर आणि इतरांना असे आढळून आले की, सॅटेलाइट रीएंट्रीजमधून ॲल्युमिनियम आणि नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन २०२० मध्ये ३.३ अब्ज ग्रॅम होते, जे २०२२ पर्यंत ५.६ अब्ज ग्रॅम इतके वाढले आहे. तसेच रॉकेटमधून उत्सर्जनही वाढले आहे, जे ब्लॅक कार्बन, ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि विविध प्रकारचे क्लोरीन वायू आणि नायट्रोजनसारखे प्रदूषक सोडतात.
उपग्रह प्रदूषणाचा परिणाम काय?
जळालेल्या उपग्रहांचे वातावरणातील प्रदूषण ही मानवासाठी दूरच्या काळापर्यंत चिंतेची बाब वाटत नाही; परंतु या प्रदूषणामुळे वातावरणातील लहरींवर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अर्थातच ही चांगली बातमी नाही. एखाद्या ग्रहाच्या विशिष्ट वातावरणाशी जुळवून घेताना पृथ्वीवरील जीवनाला विकसित होण्यास अब्जावधी वर्षे लागली आहेत. ही गोष्ट लक्षात घेता, अगदी लहान बदलांमुळेही एखाद्या ग्रहावर प्रचंड अराजकता निर्माण होऊ शकते. पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फियरमधील ओझोन थरावर पडणाऱ्या या प्रदूषणाच्या प्रभावामुळे शास्त्रज्ञ विशेष चिंतेत आहेत. हा थर सूर्यापासून ९९ टक्क्यांपर्यंत अतिनील किरण शोषून घेतो; अन्यथा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सजीवांना हानी पोहोचली असतीत. परंतु, ॲल्युमिनियम ऑक्साईड ओझोन थरावर परिणाम करतो.
डॅनियल मर्फी इतरही अनेक गोष्टी स्पष्ट करतात. त्यामध्ये अंतराळयानाशी निगडित प्रदूषक वातावरणाच्या रचनेवर परिणाम करू शकतात. त्यांनी ‘सायन्स न्यूज’ला सांगितले, “रॉकेट इंजिनामधून उत्सर्जित होणारी काजळी सौरऊर्जा शोषून घेते; ज्यामुळे वातावरण उबदार होऊ शकते. स्पेसक्राफ्ट वायरिंग आणि मिश्र धातू जाळण्याच्या वेळी सोडलेले तांबे आणि इतर धातू वातावरणातील रासायनिक अभिक्रियांसाठी शक्तिशाली उत्प्रेरक ठरतात. इतर गोष्टींबरोबरच ते धातू लहान कणांच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊ शकतात; जे ढगांच्या बीजासारखे कार्य करतात.”