संदीप कदम
सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या तारांकित पुरुष दुहेरी जोडीने इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद मिळवले. गेल्या काही काळात या जोडीने सातत्यपूर्ण कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. या जोडीची ही कामगिरी विशेष का? यापूर्वी कोणत्या भारतीय बॅडमिंटनपटूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमक दाखवली आहे, याचा घेतलेला हा आढावा
इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेतील सात्त्विक-चिराग जोडीची कामगिरी कशी राहिली?
संदीप कदम
इंडोनशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा (सुपर १००० दर्जा) ही उच्च स्तरावरची स्पर्धा समजली जाते. जगातील सर्वोत्तम खेळाडू यामध्ये सहभागी होतात. त्यामुळे स्पर्धेत जेतेपद मिळवणे आव्हानात्मक समजले जाते. सात्त्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या फजर अल्फिआन व मोहम्मद रिआन आर्दिआंतो या अग्रमानांकित जोडीला २१-१३, २१-१३ अशा फरकाने पराभूत केले. उपांत्य फेरीत भारतीय जोडीने कोरियाच्या कांग मिन ह्यूक व सेओ सेऊंग जाइ जोडीला तीन गेमपर्यंत झालेल्या सामन्यात १७-२१, २१-१९, २१-१८ असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात भारतीय जोडीने मलेशियाच्या आरोन चिया व सोह वूई यिक या जागतिक विजेत्या जोडीला २१-१७, २१-१८ असे सरळ गेममध्ये पराभूत करत प्रथमच ‘सुपर १०००’ दर्जा असणारी स्पर्धा जिंकली. सात्त्विक-चिराग जोडीने आपल्या कारकीर्दीत नऊ प्रयत्नांत प्रथमच मलेशियन जोडीला पराभूत केले.
सात्त्विक-चिराग जोडीच्या जेतेपदाचे वैशिष्ट्य काय?
सात्त्विक-चिराग ही जोडी भारताची सर्वात यशस्वी पुरुष दुहेरी जोडी समजली जाते. सात्त्विक-चिराग जोडीने सुपर १००, सुपर ३००, सुपर ५००, सुपर ७५० आणि सुपर १००० दर्जा असणाऱ्या स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय जोडी बनण्याचा मान मिळवला. सात्त्विक-चिराग जोडीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत या जोडीने कांस्यपदकाची कमाई केली. तर, भारताने मिळालेल्या ऐतिहासिक थॉमस चषक जेतेपदातही त्यांनी निर्णायक भूमिका पार पाडली. तसेच, त्यांनी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्ण कामगिरी केली आहे. यासह इंडोनेशिया खुली स्पर्धा (सुपर १००० दर्जा, २०२३), फ्रेंच खुली स्पर्धा (सुपर ७५० दर्जा, २०२२), थायलंड आणि भारतीय खुली स्पर्धा (सुपर ५०० दर्जा, २०१९ व २०२२), स्विस खुली स्पर्धा (सुपर ३०० दर्जा, २०२३) व हैदराबाद खुली स्पर्धा (सुपर १०० दर्जा, २०१८) या ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक दौरा कार्यक्रमातील स्पर्धा या जोडीने जिंकल्या आहेत. ‘बीडब्ल्यूएफ’ स्पर्धांत सात्त्विक-चिराग जोडीने १७ पैकी १४ अंतिम सामने जिंकण्याची अलौकिक कामगिरी केली आहे. त्यांनी तब्बल ८२.३५ टक्के अंतिम सामने जिंकले आहेत. मात्र, यापूर्वी झालेल्या सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत या जोडीला पहिल्या फेरीत, थायलंड खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पराभूत व्हावे लागले. तसेच, सुदीरमन चषकातही त्यांना फारशी चुणूक दाखवता आली नाही.
सात्त्विक-चिरागच्या कामगिरीत माथियास बो ची भूमिका महत्त्वाची का?
गेल्या काही वर्षांत सात्त्विक-चिराग जोडीने सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्यामध्ये सध्याचे भारतीय संघाचे दुहेरी प्रशिक्षक डेन्मार्कच्या माथियास बो यांचेही योगदान आहे. स्वत: यशस्वी खेळाडू राहिल्यानंतर त्यांनी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ऑलिम्पिकपर्यंत बो हे केवळ चिराग व सात्त्विक यांना मार्गदर्शन करायचे. त्यांचा करार संपुष्टात आल्यानंतर जवळपास वर्षभर भारताकडे प्रशिक्षक नव्हता. त्यानंतर पुन्हा एकदा बो यांची निवड करण्यात आली. मात्र, या वेळी त्यांच्यावर सर्व दुहेरी खेळाडूंची जबाबदारी सोपवण्यात आली. बो यांच्या काळातच सात्त्विक व चिराग जोडीची कारकीर्द बहरली. गेल्या वर्षापासून या जोडीने चार जेतेपदे मिळवली आहेत. तसेच, त्यांनी आशियाई अजिंक्यपद व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही चमक दाखवली.
बॅडमिंटनमध्ये भारताच्या लक्षवेधक कामगिऱ्या कोणत्या?
ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत बॅडमिंटनमध्ये तीन पदकांची कमाई केली आहे. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत सायना नेहवालने कांस्यपदक मिळवून दिले. हे भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक ठरले. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये पी.व्ही. सिंधूने रौप्यपदक जिंकले. यानंतर २०२० टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीत सातत्य राखताना तिने कांस्यपदक जिंकले. त्यानंतर गेल्या वर्षी भारताने ७३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा थॉमस चषक स्पर्धा जिंकली. त्यापूर्वी, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताकडून प्रकाश पदुकोण (कांस्य, १९८३), ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा (कांस्य, २०११), पी.व्ही. सिंधू (सुवर्ण २०१९, दोन राैप्य, २०१७, २०१८, दोन कांस्य २०१३, २०१४), सायना नेहवाल ( रौप्य २०१५, कांस्य २०१७), बी. साईप्रणीत (कांस्य, २०१९), किदम्बी श्रीकांत (रौप्य २०२१) आणि लक्ष्य सेन (कांस्य, २०२१) यांनी चमकदार कामगिरी केली. यासह भारताच्या काही बॅडमिंटनपटूंनी प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत चुणूक दाखवली. यामध्ये प्रकाश पदुकोण (सुवर्ण १९८०, रौप्य १९८१), पुलेला गोपीचंद (सुवर्ण २००१), सायना नेहवाल (रौप्य २०१५) आणि लक्ष्य सेन (रौप्य २०२२) यांचा समावेश आहे.