फुटबॉलच्या शिखर संघटनेने (फिफा) २०३४ मधील विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाचा मान सौदी अरेबियाला दिला आहे. अवघ्या १२ वर्षांत विश्वचषक फुटबॉल स्पर्धा पुन्हा एकदा या निमित्ताने अरबी आणि वाळवंटी देशात परतली आहे. यापूर्वी कतारने २०२२ मध्ये विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल, विश्वचषक अशा प्रमुख स्पर्धांचा आयोजन खर्च सातत्याने वाढत आहे. त्यामुळे केवळ एका राष्ट्राला इतका मोठा आर्थिक भार पेलणे अवघड जात आहे. मात्र, तेलउत्पादक सौदी अरेबिया याला अपवाद ठरत असून प्रायोजकत्व, सामंजस्य करार आणि सर्वांत मोठी सुरक्षित गुंतवणूक अशा विविध पातळ्यांवर त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे त्यांना विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाची संधी लाभणार आहे. सौदी अरेबियाने गेल्या काही काळात क्रीडाक्षेत्रात वेगळा दरारा निर्माण केला आहे. तो कसा आणि विश्वचषक यजमानपदासाठी त्यांचे नाव पुढे कसे आले याचा आढावा.
यजमानपदासाठी सौदी अरेबियाच…
फिफाने ऑक्टोबर २०२३ मध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदासाठी स्वारस्य दाखवण्यासाठी २५ दिवसांची मुदत दिली होती. या घोषणेनंतर अवघ्या दोन तासांत सौदी अरेबियाने अधिकृतपणे आपली बोली जाहीर केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने या शर्यतीत उडी घेतली. मात्र, पुढे जाऊन २०२६ महिला आशिया चषक आणि २०२९ फिफा क्लब विश्वचषक स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे २०३४ स्पर्धेच्या यजमानपदासाठी बोली लावणारा सौदी अरेबिया एकमेव देश ठरला.
हेही वाचा : सुरक्षित घरे, मदतीसाठी हेल्पलाइन, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सरकारची योजना काय?
सौदी अरेबियाचा दरारा कशामुळे?
सौदी अरेबियाने क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा जणू ध्यासच घेतला आहे. मोठ्या स्पर्धांचे आयोजन करताना ते एकापेक्षा अधिक प्रायोजकांना आकर्षित करत आहेत. अलीकडच्या संशोधनानुसार, २८ क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या सौदी अरेबियाच्या क्रीडा स्पर्धेत तब्बल ९१० प्रायोजकत्व करार केले आहेत. विशेष म्हणजे यातील १९४ प्रायोजक केवळ फुटबॉलमध्ये आहेत. एकूण प्रायोजकांच्या ३४६ करारात अब्जावधी डॉलरच्या पब्लिक इनव्हेस्टमेंट फंड आणि सौदी अरेबियाच्या सार्वभौम संपत्ती निधीचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात गुंतवणूक करताना सौदी अरेबियाने ४८ सामंजस्य करार केले असून, यात सर्व खंडांमधील देशांचा समावेश आहे. हे सर्व करार शक्तिशाली धोरणात्मक संबंध दर्शवतात. सामंजस्य कराराचा वाढीव सहयोग, विकास उपक्रम यामुळे ते थेट क्रीडा महासंघांच्या निर्णयकर्त्यांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे त्यांना विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यजमानपद मिळविणे शक्य होते.
सौदी अरेबियाची खेळात गुंतवणूक का?
देशातील तरुण लोकसंख्येला शारीरिक तंदुरुस्ती आणि व्यायामास प्रेरित करण्यासाठी या देशाने खेळाला महत्त्व देण्यास सुरुवात केली. त्यानंतर क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातून पर्यटनाला चालना देणे, रोजगार निर्माण करणे आणि क्रीडा महासंघांना वाढीची क्षमता प्रदान करणे हा त्यांचा उद्देश आहे. खेळामुळे देशाच्या विकासाची गती वाढल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी क्रीडा क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित केले. त्याचबरोबर केवळ तेलावरील अवलंबित्वापासून दूर राहण्यासाठी देखील ते खेळाचा वापर करत आहेत. सध्या सौदी अरेबिया तब्बल ८५ क्रीडा प्रकारांत गुंतवणूक करत आहे.
क्रीडा क्षेत्रात पाय कसे रोवले?
सौदी अरेबियात सगळ्यात आधी अश्वशर्यतींचे अस्तित्व होते. त्यानंतर त्यांनी गोल्फमध्ये पाय रोवायला सुरुवात केली. मग, फुटबॉल, बॉक्सिंग, फॉर्म्युला वन अशा क्रीडा प्रकारांचा समावेश झाला. फुटबॉलमध्ये पाऊल टाकताना त्यांनी सौदी प्रो लीग फुटबॉल स्पर्धा सुरू केली. त्यासाठी ख्रिस्तियानो रोनाल्डोसारख्या विख्यात फुटबॉलपटूला आकर्षित केले. अल नासर एफसीने रोनाल्डोला करारबद्ध केले तेव्हा क्रीडाक्षेत्रात याची खूप मोठी चर्चा झाली. पाठोपाठ फ्रेंच फुटबॉलपटू करीम बेन्झिमाला करारबद्ध केले. मेसीलाही करारबद्ध करण्याची त्यांनी तयारी ठेवली होती. त्याचबरोबर युरोपमधील विविध संघांची मालकी मिळविण्याचा सपाटा लावला. रियाध विमानसेवेने स्पॅनिश लीगमधील ॲटलेटिको माद्रिद क्लबला प्रायोजकत्व दिले. रियाध सीझन इटलीतील सेरी ए स्पर्धेमधील एएस रोमा संघाचे प्रायोजक आहे. पीआयएफ इंग्लिश प्रीमियर लीगमधील न्यूकॅसल युनायटेडचा मालक आहे. याशिवाय सौदी राजघराण्याचे सदस्य अब्दुल्ला बिन मुसेद अल सौद यांच्याकडे बेल्जियन क्लब बीअरशॉट व्हीए, अमिरातीमधील अल हिलाल युनायटेड, फ्रान्सच्या एलबी चाटेरौ, इंग्लंडच्या शेफिल्ड युनायटेड अशा विविध संघांची मालकी आहे. अल सौदने भारतातील केरळ युनायटेड संघात गुंतवणूक केली आहे. आता त्यांचा कल टेनिसकडेही आहे. दोन्ही व्यावसायिक टेनिस संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
२०३० आणि २०३४ स्पर्धेत फरक काय?
या दोन विश्वचषक स्पर्धांच्या यजमानपदाच्या अधिकारातील सर्वांत महत्त्वाचा फरक म्हणजे २०३० मधील स्पर्धा एकाच वेळी सहा देशांत संयुक्तपणे आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा मोरोक्को, स्पेन, पोर्तुगाल, अर्जेंटिना, पॅराग्वे, उरुग्वे या देशांमध्ये होणार आहे. यामध्ये प्रथमच दोन खंडांतील तीन देश मुख्य आयोजक असतील. विश्वचषक स्पर्धेचे शंभरावे वर्ष म्हणून अर्जेंटिना, पॅराग्वे, उरुग्वे हे देश यात जोडले गेले. या तीनही देशांत पहिले तीन सामने होतील. उर्वरित सामने स्पेन, मोरोक्को, पोर्तुगालमध्ये खेळविण्यात येतील. याउलट २०३४ मधील स्पर्धेत सर्व सामने सौदी अरेबियातच आयोजित केले जाणार आहेत. सौदी अरेबियात यासाठी पूर्ण क्षमतेची मैदानेदेखील उभी करण्यात येणार आहेत.
हेही वाचा : विश्लेषण : माहिती अधिकार कायदा लालफीतशाहीत अडकला आहे का?
ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारताशी स्पर्धा
भारताने २०३६ मधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी कंबर कसली आहे. मात्र, सौदी अरेबिया आणि कतार या आखाती देशांशी त्यांना प्रामुख्याने स्पर्धा करावी लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. सौदी अरेबिया २०३४ मध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धेबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणार आहे. कतार २०३० च्या आशियाई स्पर्धेचे यजमान आहेत. यापुढे जाऊन दोन्ही देशांनी २०३६ ऑलिम्पिकसाठी देखील तयारी दर्शवली आहे. सौदीने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे हक्क प्रचंड ताकद लावून बिनविरोध जिंकले आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने त्यांच्याशी पहिल्या ई-ऑलिम्पिकच्याही आयोजनाचा करार केला आहे.