बाजार नियामक मंडळाने (सेबी) गुरुवारी (२ मार्च) रोजी अभिनेता अर्शद वारसी, त्याची पत्नी मारिया गोरेटी, यूट्यूबर मनीष मिश्रा आणि साधना ब्रॉडकास्टचे प्रवर्तक श्रेया गुप्ता, गौरव गुप्ता, सौरभ गुप्ता, पूजा अग्रवाल आणि वरुण मीडिया यांच्यासह ३१ संस्थांवर बंदीची कारवाई केली. यूट्यूबवर दिशाभूल करणारा व्हिडीओ प्रसारित करून गुंतवणूकदारांना कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीर दखल सेबीने घेतली आहे. आरोपींनी ‘पंप आणि डंप’ अशी नीती वापरत ४१.८५ कोटींचा नफा कमावला होता, या बेकायदेशीर नफ्यावरदेखील सेबीने जप्तीची कारवाई केली आहे. सर्व ३१ व्यक्तींना अनुसूचित व्यावसायिक बँकेत एस्क्रो खाते उघडून नफ्यातील रक्कम १५ दिवसांच्या आत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे घोटाळा?

सेबीने आपल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, टीव्ही वृत्तवाहिनी साधना ब्रॉडकास्टच्या शेअर्सच्या किमतीमध्ये फेरफार करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गुंतवणूकदारांना आमिष दाखवण्यासाठी दोन कंपन्यांबद्दल खोटी सामग्री असलेले यूटयूब व्हिडीओ तयार करून प्रसारित करण्यात आल्याचा आरोप तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. चांगला नफा कमाविण्यासाठी साधनाचे शेअर्स विकत घेण्याचा सल्ला काही युट्यूब व्हिडिओंच्या माध्यमातून देण्यात आला होता. ही माहिती दिशाभूल करणारी होती, असा आरोप होत आहे.

या प्रकरणाचा तपास करत असताना सेबीला आढळून आले की, जुलै २०२२ मध्ये ‘द ॲडव्हायजर’ आणि ‘मनीवाइज’ या दोन यूट्यूब चॅनेलवर खोटे आणि दिशाभूल करणारे व्हिडीओ प्रसारीत करण्यात आले होते. हे दोन्ही चॅनेल्स मनीष मिश्राद्वारा चालविण्यात येत होते. साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड ही कंपनी लवकरच अदानी समूह विकत घेईल. ही कंपनी टीव्ही प्रॉडक्शनमधून चित्रपटनिर्मितीकडे वळणार आहे, त्यासाठी एका मोठ्या अमेरिकन कंपनीसोबत ११००कोटी रुपयांचा करार झाला असून त्याद्वारे चार धार्मिक चित्रपटांची निर्मिती केली जाईल, असे निराधार वृत्त यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आले.

दिशाभूल करणारे व्हिडीओ यूट्यूबवर प्रसारीत होताच साधनाच्या शेअर्सची किंमत आणि त्याच्या व्यवहारांमध्ये वाढ झाली. सेबीने या कारवाईनंतर म्हटले की, खोट्या व्हिडीओमुळे कंपनीच्या लहान भागधारकांमध्ये मोठी वाढ झाली. (२,१६७ वरुन थेट ५५,३४३) या भागधारकांनी फुगविलेल्या किमतीत शेअर्स विकत घेतले.

दरम्यान, जेव्हा शेअर्सच्या किमती वाढल्या होत्या, तेव्हा साधनाचे काही भागधारक प्रवर्तक, व्यवस्थापनातले काही महत्त्वाचे अधिकारी आणि प्रवर्तक नसलेल्या काही समभागधारकांनी स्वतःजवळ असलेल्या शेअर्सचा मोठा भाग फुगविलेल्या किमतीमध्ये विकून टाकला आणि बक्कळ नफा कमविला. सेबीने या व्यवहारावर बोट ठेवले असून हे सेबीच्या नियमांचे आणि फसवणूक व अनुचित व्यवहार प्रतिबंधक कायद्याचे थेट उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

अभिनेता अर्शद वारसीची यात काय भूमिका होती?

सेबीने यात गुंतलेल्या ३१ संस्थांचे काही गटांत वर्गीकरण केले आहे. यूट्यूब चॅनेलचे निर्माते (मनीष मिश्रा), निव्वळ नफा कमविणारे विक्रेते / प्रवर्तक (NSs), म्हणजेच ज्यांनी साधनाच्या सुरुवातीच्या काळात ज्यांनी शेअर्स विकत घेतले होते आणि ज्या वेळी किंमत फुगवली गेली त्या काळात विक्री केली होती. तसेच व्हॉल्यूम क्रिएटर्स (VCs), म्हणजेच जे लोक प्रवर्तक (NSs) नाहीत मात्र त्यांनी फुगवट्याच्या काळात शेअर्स विकत घेतले आणि (ICs) म्हणजेच ज्यांनी चुकीच्या माहितीचे प्रसारण केले.

अभिनेता अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेटी हे व्हॉल्यूम क्रिएटर्स (VCs) या गटात मोडतात. या दोघांनीही साधानाचे शेअर्स खरेदी करून विकले. दोघांनीही ट्रेडिंग व्हॅल्यू वाढण्यासाठी हातभार लावला. या व्यवहारातून अर्शद वारसीला २९.४३ लाख रुपयांचा नफा झाला आणि त्याच्या पत्नीला ३७.५६ लाख रुपयांचा नफा झाला आहे, तसेच त्याचा भाऊ इक्बाल हुसैन वारसीला ९.३४ लाखांची कमाई झाली आहे, असे सेबीने नमूद केले आहे.

साधना ब्रॉडकास्ट काय आहे?

साधना ब्रॉडकास्टची स्थापना १९९४ मध्ये करण्यात आली. माध्यमांशी निगडित अनेक व्यवसाय या कंपनीकडून केले जातात. साधना टीव्ही ही लोकप्रिय धार्मिक वृत्तवाहिनी साधना ब्रॉडकास्टकडून चालविली जाते. मोठे धार्मिक कार्यक्रम, प्रवचन आणि धार्मिक समारंभांचे थेट प्रसारण साधना टीव्हीवर केले जाते. २००३ मध्ये जेव्हा ही वृत्तवाहिनी लाँच करण्यात आली तेव्हा या नावीन्यपूर्ण कल्पनेमुळे कंपनीची भरभराट होत गेली.

साधना टीव्हीसोबतच साधना ब्रॉडकास्टकडून अनेक वृत्तवाहिन्या चालविल्या जातात. तसेच जाहिरात आणि प्रकाशनाच्या व्यवसायातदेखील कंपनी काम करते. कंपनीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार साधनाची दोन कार्यालये आहेत, एक नवी दिल्ली येथील झंडेवालान येथे असून दुसरे कार्यालय नोएडामध्ये आहे.

या घोटाळ्यावर प्रतिक्रिया काय आहेत?

सेबीच्या कारवाईनंतर ‘द ॲडव्हायजर’ आणि ‘मनीवाइज’ या दोन यूट्यूब चॅनेल्सवरील सर्व व्हिडीओ काढून टाकण्यात आले आहेत. ‘द ॲडव्हायजर’चे यूट्यूबवर ८ लाख ४० हजार एवढे सबस्क्रायबर आहेत, तर मनीवाइज चॅनेलचे ७ लाख ६७ हजार सबस्क्रायबर आहेत.

या कारवाईनंतर अभिनेता अर्शद वारसीने ट्विट करत आपली बाजू मांडली आहे. “मला या व्यवहारात बळी करण्यात आले आहे. कृपया बातम्यांमध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मारिया आणि माझी स्टॉक मार्केटबद्दलचे ज्ञान शून्य आहे. आम्ही सल्ला घेऊन शारदा (sic) मध्ये पैसे गुंतविले आणि इतरांप्रमाणे आम्हीदेखील कष्टाचे सर्व पैसे गमावून बसलो.”, असे ट्विट अर्शद वारसी याने केले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why sebi barred actor arshad warsi and others from the securities market kvg