मुंबईतील पहिल्या ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – बीकेसीदरम्यानचा पहिला टप्पा ७ ऑक्टोबर रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला. त्यामुळे मुंबईकरांचे भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण झाले. मुंबईतील ही पहिलीच भुयारी मेट्रो. या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे. एकीकडे प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसतानाच दुसरीकडे हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून तांत्रिक अडचणींची मालिका सुरूच आहे. त्यामुळे या मार्गिकेच्या लोकार्पणाची घाई मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या अंगलट आली का, मेट्रो स्थानकांबाहेर आवश्यक सुविधा नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही का, असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्या अनुषंगाने घेतलेला हा आढावा…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कशी आहे ‘मेट्रो ३’ मार्गिका?

‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेची लांबी ३३.५ किमी आहे. या मार्गिकेसाठी २३ हजार १३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र या खर्चात वाढ होऊन आता तो थेट ३७ हजार २७६ कोटी रुपयांवर पोहचला आहे. ‘एमएमआरसीएल’ने ‘जायका’च्या मदतीने कर्ज आणि दुय्यम कर्जाच्या माध्यमातून ‘मेट्रो ३’ मार्गिकेसाठी निधी उभारला. ‘मेट्रो ३’ मार्गिकेवर २७ मेट्रो स्थानके असून ही संपूर्ण मार्गिका भुयारी आहे. या मार्गिकेवरील मेट्रो गाड्या पूर्ण वातानुकूलित, स्वदेशी बनावटीच्या आणि वाहनचालकविरहित असणार आहेत. मेट्रो गाड्या वाहनचालकविरहित असल्या तरी या गाड्यांमध्ये मेट्रो पायलट कार्यरत असणार आहेत. ३३५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गासाठी ३१ मेट्रो गाड्यांची आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथे बांधणी करण्यात आली असून आतापर्यंत १३ गाड्या आरे कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत. यापैकी ९ गाड्या दररोज आरे – बीकेसीदरम्यान धावत आहेत. या मार्गिकेचे काम आरे – बीकेसी आणि बीकेसी – कफ परेड अशा दोन टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी आरे – बीकेसी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा: विश्लेषण : माजी जगज्जेता माइक टायसन यू-ट्यूब इन्फ्लुएन्सरकरडून पराभूत! लढत खरी होती की लुटुपुटूची? फायदा नेटफ्लिक्सचाच?

दुसरा टप्पा वाहतूक सेवेत केव्हा?

आरे – बीकेसी दरम्यानच्या १२.५ किमी मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ५ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. लोकार्पणानंतर तात्काळ ही मार्गिका सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र लोकार्पणानंतर दोन दिवसांनी आरे – बीकेसी टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पहिली भुयारी मेट्रो धावली. हा टप्पा कार्यान्वित होऊन आता एक महिना उलटला. आता या मार्गिकेतील बीकेसी – कफ परेड टप्प्याच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा आहे. हा टप्पा केव्हा पूर्ण होणार आणि वाहतूक सेवेत दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरे – बीकेसी टप्पा केवळ १२.५ किमी लांबीचा असल्याने त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. पण कफ परेड – बीकेसीदरम्यान भुयारी मेट्रो धावू लागल्यास प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र यासाठी आणखी किमान सहा महिने वाट पाहावी लागणार आहे. बीकेसी – कफ परेड टप्प्याचे काम एप्रिल २०२५ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र मिळवून हा टप्पा जून २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

भुयारी मेट्रोला प्रतिसाद नाही?

आरे – बीकेसी मार्गिकेवर प्रतिदिन ९२ फेऱ्या धावत आहेत. दरम्यान आरे – बीकेसी मार्गिकेवरून दररोज साडेचार लाख प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा ‘एमएमआरसी’ला आहे. मात्र प्रत्यक्षात दर दिवशी केवळ २० हजार प्रवासी या मार्गिकेवरून प्रवास करीत आहेत. पहिल्या दिवशी ७ ऑक्टोबर रोजी १८ हजार ०१५ प्रवाशांनी भुयारी मेट्रोतून प्रवास केला होता. त्यानंतर हळूहळू प्रवासी संख्या वाढेल अशी ‘एमएमआरसी’ला आशा होती. मात्र अद्याप या मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढलेली नाही. दररोज सरासरी २० हजार प्रवासी भुयारी मेट्रोतून प्रवास करीत आहेत. या मार्गिकेवरून ७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या काळात ६ लाख ३३ हजार प्रवाशांनी प्रवास केला. प्रवाशांचा प्रतिसाद अत्यंत कमी असून यामुळे ‘एमएमआरसी’ची चिंता वाढली आहे.

हेही वाचा: Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? इर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?

तांत्रिक बिघाडाने प्रवासी हैराण?

पहिल्या टप्प्याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसतानाच दुसरीकडे प्रवासी मेट्रो गाड्यातील तांत्रिक बिघाड आणि वाहतूक सेवा विस्कळीत होण्याच्या समस्येने महिन्याभरातच हैराण झाले आहेत. आरे – बीकेसी टप्पा वाहतूक सेवेत दाखल होऊन दोन दिवस होत नाहीत तोच या मार्गिकेवरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. अचानक मेट्रो गाडी बंद पडली आणि ही गाडी एकाच ठिकाणी ३० मिनिटे उभी होती. त्यामुळे वाहतूक सेवेवर परिणाम झाला. या घटनेनंतर ११ ऑक्टोबर रोजी या टप्प्यातील एका मेट्रो स्थानकात पाण्याची मोठी गळती झाली. यामुळे मेट्रोच्या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. यानंतरही समस्या आणि बिघाडांची मालिका सुरूच आहे. गेल्या आठवड्यात रात्री पावणेआठच्या सुमारास अचानक मेट्रो गाडी दोन मेट्रो स्थानकांदरम्यान भुयारात बंद पडली. भुयारात मेट्रो गाडी बंद पडल्याने प्रवासी गोंधळले, काही प्रवासी घाबरलेही. तब्बल अर्ध्या तासानंतर ‘एमएमआरसी’ने प्रवाशांची सुखरुप सुटका केली. पण यामुळे प्रवाशांच्या, मेट्रो गाड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तांत्रिक बिघाडाचे प्रकार सुरू असतानाच १५ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील बीकेसी मेट्रो स्थानकामधील निर्माणाधीण कामाला आग लागली. आग लागल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रो सेवा तात्काळ बंद करण्यात आली. एकूणच या सर्व घटनांमुळे आता ‘एमएमआरसी’चा कारभार आणि मेट्रो मार्गिकेच्या बांधकामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

समस्याच समस्या…

अपेक्षित प्रवासी संख्या नाही, त्यातच तांत्रिक बिघाड, आगीसारख्या दुर्घटनांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. ‘एमएमआरसी’च्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांच्या अडचणीत वाढ होत आहे. ‘मेट्रो ३’मधून प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत, मेट्रो स्थानकांपासून इच्छितस्थळी पोहचता यावे यासाठीही विशेष काळजी घेण्यात आली आहे, असे सातत्याने ‘एमएमआरसी’कडून सांगितले जात होते. मात्र आरे – बीकेसी टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर ‘एमएमआरसी’चा हा दावा फोल ठरला. कोणत्याही मेट्रो स्थानकावर पोहचण्यासाठी वा मेट्रो स्थानकावरून इच्छितस्थळी जाण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. मेट्रो स्थानकाबाहेर बेस्ट बस थांबा, रिक्षा, टॅक्सीची व्यवस्था नसल्याने प्रवासी ‘मेट्रो ३’कडे वळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. विमानतळ मेट्रो स्थानक ते विमानतळ टर्मिनल दरम्यानचा प्रवास प्रवाशांसाठी गैरसोयीचा ठरत आहे. अनेकदा विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठमोठ्या बॅगा घेऊन मेट्रो स्थानकापासून विमानतळ टर्मिनलपर्यंत पायपीट करावी लागत आहे. दरम्यान बेस्ट बस आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ‘एमएमआरसी’कडून सांगण्यात येत आहे. पण या सुविधा मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होण्यापूर्वीच उपलब्ध करणे गरेजेचे होते.

हेही वाचा:विश्लेषण: परदेशी गुंतवणूकदारांचे निर्गमन हे बाजार पडझडीचे कारण?

लोकार्पणाची घाई?

‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या पूर्णत्वाला अनेक कारणांमुळे विलंब झाला आहे. त्यामुळे ‘मेट्रो ३’च्या कामावर टीका होत होती. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने काही तरी मोठे विकासकाम मतदारांपर्यंत पोहचवता यावे यासाठी राज्य सरकारची धडपड सुरू होती. आचासंहिता लागू होण्याआधी आरे – बीकेसी टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी राज्य सरकारची धावपळ सुरू केली. त्यामुळेच अनेक मेट्रो स्थानकांची कामे १०० टक्के पूर्ण झालेली नसताना पहिला टप्पा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रियाही अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आली. त्याचवेळी सर्व स्थानकांबाहेर बेस्ट बस थांबा, रिक्षा, टॅक्सी स्टॅण्ड वा इतर सुविधा उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे होते. मात्र आरे – बीकेसी टप्प्याचे या सुविधांशिवायच लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे लोकार्पणाची घाई अंगलट आली का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why series of problems for mumbai underground metro project not ending mmrc print exp css