कित्येक वर्षांपासून शाहरुख खान बॉलीवूडवर राज्य करीत आहे. ‘मन्नत’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्याच्या घराबाहेर त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते हजारोंच्या संख्येने जमतात. मात्र, सध्या ‘मन्नत’ एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. अभिनेता शाहरुख खानने मन्नत या त्याच्या २७ हजार स्क्वेअर फूट सी-फेसिंग बंगल्याचे नूतनीकरणाची योजना आखली आहे. त्यासाठी तो आपल्या परिवारासह भाड्याच्या एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार असल्याची माहिती आहे. १९१४ मध्ये बांधलेला हा बंगला मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँडवरील श्रेणी २-ब ची वारसा मालमत्ता आहे. मुख्य म्हणजे शाहरुख खानला नूतनीकरण सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (एमसीझेडएमए)ची परवानगी घ्यावी लागणार आहे. काय आहे यामागील कारण? मुंबईतील वारसा मालमत्तेचे नियम काय? आणि शाहरुख खानला कोणत्या परवानग्या घेणे आवश्यक असणार आहेत? जाणून घेऊ.
वारसा मालमत्तेच्या ‘श्रेणी २-ब’चा अर्थ काय?
एखादी मालमत्ता, आस्थापना, स्थळ किंवा जागा यांना सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक महत्त्व असल्यास वारसा दर्जा प्राप्त होतो. १९९५ मध्ये प्रकाशित झालेल्या बृहन्मुंबईतील वारसा स्थळांच्या पहिल्या सूचीमध्ये शाहरुख खानच्या या मालमत्तेची नोंद होती. या वारसा मालमत्तेला पूर्वी ‘व्हिला व्हिएन्ना’ म्हणून ओळखले जात होते. तेव्हा या मालमत्तेला श्रेणी-३ वारसा मालमत्तेचा दर्जा देण्यात आला होता. २००६ मध्ये नवीन यादीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) मुंबई हेरिटेज संवर्धन समितीने (एमएचसीइज) या मालमत्तेला ग्रेड २-ब चा दर्जा दिला. २००६ मध्ये मुंबई हेरिटेज संवर्धन समितीकडे सादर केल्या गेलेल्या अहवालावरील पुनरावलोकनानुसार ही मालमत्ता समुद्रकिनारी असल्यामुळे याला वास्तुशास्त्रीय महत्त्व आहे, असे नमूद करण्यात आले होते.

मुंबईतील वारसा मालमत्तांचे वर्गीकरण कसे केले जाते?
वारसा मालमत्ता-३ मुख्य श्रेणींमध्ये वर्गीकृत केली जाते. त्या म्हणजे श्रेणी १, श्रेणी २ व श्रेणी ३. श्रेणी २ मध्ये श्रेणी २-अ व श्रेणी २-ब अशा दोन उपश्रेणी आहेत. या श्रेणींचे वर्गीकरण हे वास्तुशास्त्रीय महत्त्व आणि ऐतिहासिक महत्त्व अशा दोन्हींवर आधारित आहे. श्रेणी १ मालमत्ता म्हणजे राष्ट्रीय किंवा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या इमारती किंवा स्थळे, ज्यात उत्कृष्ट वास्तुशिल्प रचनांचादेखील समावेश होतो.
नियमांनुसार, या संरचनांचे काळजीपूर्वक जतन करणे आवश्यक आहे. श्रेणी २ मालमत्तेमध्ये विशेष वास्तुशिल्प आणि सांस्कृतिक गुणवत्ता असलेल्या स्थानिक आणि प्रादेशिक इमारती व परिसर समाविष्ट आहेत. तसेच टाउनस्केपसाठी श्रेणी ३ इमारती व साइट महत्त्वाच्या आहेत. शाहरुख खान याने २००१ मध्ये मालमत्ता विकत घेतली होती आणि त्यांना कोणतेही संरचनात्मक बदल करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्याने मूळ बंगल्याच्या मागे सहा मजली इमारत बांधली आणि त्याला ‘मन्नत’, असे नाव दिले.
शाहरुख खान याला नूतनीकरणासाठी मंजुरी का आवश्यक आहे?
शाहरुख खान राहत असलेली ही मालमत्ता वांद्र्याच्या दक्षिणेकडील टोकाला, लँड्स एंड नावाच्या एका द्वीपकल्पीय पट्टीवर आहे, जी अरबी समुद्रापर्यंत पसरलेली आहे. या पट्टीच्या अगदी दक्षिणेकडील टोकाला वांद्रे किल्ल्याचे अवशेष आहेत. हे क्षेत्र समुद्राच्या किती जवळ आहे हे लक्षात घेता, मालमत्तेच्या मालकांना महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून मंजुरी घ्यावी लागते. ही किनारपट्टी विभागातील विकास मंजुरींचे नियमन करण्यासाठी राज्याची नोडल एजन्सी आहे.
शाहरुख खानच्या मालमत्तेतील नियोजित पुनर्विकासाच्या कामामुळे त्याने नंतर बांधलेल्या ॲनेक्सीमध्ये दोन अतिरिक्त मजले जोडले जातील; ज्यामुळे इमारतीची उंची ६१६.०२ चौरस मीटरने वाढेल. मालमत्तेची उंची वाढणार असल्याने, महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून मंजुरी आवश्यक आहे. “कोणत्याही प्रकारच्या मालमत्ता बांधकाम किंवा पुनर्विकासाच्या कामासाठी पूर्वपरवानगी आवश्यक असते.
कारण- मालमत्तेची उंची, तसेच विस्तार काही परवानगीयोग्य मर्यादेतच राहणे आवश्यक आहे,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच, नूतनीकरण शाश्वत पद्धतीने केले पाहिजे, असेही अधिकाऱ्याने सांगितले. “उदाहरणार्थ- इमारतीच्या तोडलेल्या भागाचा ढिगारा (मलबा) समुद्रात टाकला जाऊ शकत नाही. या कारणांसाठीच, महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून पूर्वपरवानगी आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.