पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये २१ नोव्हेंबरला अतिरेक्यांनी बसमधून प्रवास करणाऱ्या शिया नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये किमान ४५ शिया ठार झाले. त्यानंतर कुर्रम भागात सुरू झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत किमान ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२१ नोव्हेंबरला काय घडले? 

खैबर पख्तुनख्वा प्रांतामधील कुर्रम या डोंगरवासीबहुल जिल्ह्यात शिया यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर अतिरेक्यांनी गोळीबार केला. सुमारे पाच मिनिटे चाललेल्या या गोळीबारात किमान ४५ जणांचा मृत्यू झाला आणि २० जण जखमी झाले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. मात्र, त्या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारली नाही. हे सर्व यात्रेकरू पाराचिनार येथून पेशावरला जात होते. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या कुर्रम जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यापासून सांप्रदायिक हिंसाचार अधिक वाढला आहे. वादाचे मुख्य कारण जमीन हे आहे. 

हेही वाचा >>>जामा मशीद की हरिहर मंदिर? मशिदीच्या सर्वेक्षणावरून उफाळला हिंसाचार; प्रकरण काय?

हल्ल्यानंतरच्या घडामोडी

या हल्ल्यानंतर कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पुन्हा उसळला. दुसऱ्या दिवशी सुरू झालेल्या या हिंसाचारात २४ तासांच्या कालावधीत किमान ३७ जणांचा मृत्यू झाला आणि तर जखमींचा आकडा ३०पेक्षा जास्त होता. अलिझै आणि बागान या दोन जमातींमधील हा हिंसाचार थांबवण्यासाठी स्थानिक आणि दोन्ही जमातींच्या वडीलधाऱ्यांदरम्यान वाटाघाटी करण्यासाठी सरकारी अधिकारी प्रयत्न करत होते. मात्र, त्यादरम्यान बराच रक्तपात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंकडून अवजड आणि स्वयंचलित शस्त्रांचाही वापर करण्यात आला. अनेक वर्षांच्या हिंसाचारात विविध गटांकडे असलेली अत्याधुनिक शस्त्रे ही सुरक्षा दलांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे यापूर्वीही दिसले आहे. बालिश्खेल, खार कली, कुंज अलिझै आणि मकबल या ठिकाणी हा हिंसाचार झाला. 

कुर्रमची भूराजकीय स्थिती

कुर्रम जिल्हा अफगाणिस्तानच्या सीमेला लागून आहे. अफगाणिस्तानच्या खोस्त, पक्तिया, लोगर आणि नांगरहर या प्रांतांच्या सीमा भिडलेल्या आहेत. हे भाग ‘आयसिस’ आणि पाकिस्तान तालिबानचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. त्याशिवाय १९२ किलोमीटर लांबीच्या ड्युरांड रेषेला अनेक ठिकाणी कुर्रमच्या सीमा छेद देतात. त्यामध्ये ऐतिहासिक पिवार कोटल खिंडीचाही समावेश आहे. ही खिंड कुर्रमहून काबुलला जाण्यासाठी सर्वात जवळचा रस्ता आहे. २०२३च्या जनगणनेनुसार कुर्रमची लोकसंख्या ७.८५ लाख असून त्यापैकी ९९ टक्क्यांहून अधिक नागरिक पश्तून आहेत. त्यांच्या तुरी, बंगाश, झैमुश्त. मंगल, मुकबल, मसुझै आणि पाराचमकानी या प्रमुख जमाती आहेत. यापैकी तुरी आणि काही बंगाश शियापंथीय आणि उर्वरित सुन्नीपंथीय आहेत. जिल्ह्याचा वरील भाग शियाबहुल तर मध्य आणि खालील भाग सुन्नीबहुल आहे. सुन्नींच्या तुलनेत शियांमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. तसेच आर्थिक विकासाच्या निकषांवरही शियाबहुल तालुके आघाडीवर आहेत. 

हिंसाचारग्रस्त प्रदेश

कुर्रम जिल्ह्यात जुलैमध्ये शिया आणि सुन्नींदरम्यान झालेल्या हिंसाचारात किमान ४६ जणांचा मृत्यू झाला होता आणि २२५पेक्षा जास्त जखमी झाले होते. येथील ४५ टक्के शियांना सुरक्षा मिळावी यासाठी याच महिन्याच्या सुरुवातीला पाराचिनार येथे हजारो लोक शांतता मोर्चात सहभागी झाले होते.

हेही वाचा >>> विश्लेषण : हेमंत सोरेन यांच्या करिष्म्यासमोर झारखंडमध्ये भाजप निष्प्रभ!

जमिनीचा शिया वि. सुन्नी वाद

जिल्ह्याच्या वरील आणि खालील भागातील बहुसंख्य जमीन एकेकाळी तुरी शियांच्या ताब्यात होती. मात्र, सध्या जिल्ह्याच्या खालील भागातील जमीन तुरींकडे राहिलेली नाही. डोंगरवासी जमातींची आपापसातील ईर्षा आणि तुटपुंज्या नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी स्पर्धा ही अजूनही कायम आहे. काळाच्या ओघात त्याला शिया विरुद्ध सुन्नी असे स्वरूप मिळाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात वायव्य सरहद्द प्रांतावर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश राजवटीने विशिष्ट जमाती आणि कुळांना आश्रय आणि लाचखोरीचा वापर केला. त्यामुळे उर्वरित जमातींमध्ये नाराजी निर्माण झाली, ती अजूनही कायम असून जमिनींच्या वादाच्या निमित्ताने डोके वर काढत असते. स्वातंत्र्यानंतर, आणि स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही, फारसे काही बदलले नाही. कुर्रम हा भाग संघराज्य प्रशासित डोंगरवासी क्षेत्रात (फाटा) समाविष्ट झाला. तिथे ब्रिटिशकालीन कायदे २०१८पर्यंत लागू होते. ‘फाटा’ भाग २०१८मध्ये खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये विलिन झाला, त्यानंतर तेथील कायद्यांमध्ये बदल झाला. 

शीतयुद्धाच्या काळातच सुरुवात?

कुर्रममघील आजच्या तणावाची पाळेमुळे थेट शीतयुद्धाच्या काळात सापडतात. त्यावेळी जवळपास एकाच वेळी घडलेल्या तीन घडामोडींचे परिणाम आजही येथे पाहायला मिळत आहेत. इराणमध्ये १९७९मध्ये इस्लामिक क्रांती घडली आणि तिथे शिया धर्मसत्तेचा अंमल सुरू झाला. त्यामुळे सुन्नीबहुल सौदी अरेबिया आणि शियाबहुल इराणदरम्यान भूराजकीय स्पर्धा सुरू झाली. दोघांच्या संघर्षामध्ये कुर्रमच्या भूमीचा वापर करण्यात आला किंवा करू दिला गेला. या कालावधीत आतापर्यंत दोन जमातींदरम्यान असलेल्या जमीन संघर्षाला आता पंथांमधील संघर्षाचे स्वरूप आले. 

रशिया-अफगाणिस्तान युद्धाचे परिणाम

सोव्हिएत रशिया आणि अफगाणिस्तानदरम्यान १९७९ ते १९८९ या दरम्यान दशकभर सुरू असलेल्या युद्धादरम्यान अमेरिकेचे समर्थन असलेल्या मुजाहिदीनांना उतरवण्यासाठी कुर्रमच्या जमिनीचा वापर करण्यात आला. युद्धभूमी सोडून आलेल्या बहुतांश सुन्नी अफगाणांनी कुर्रममध्ये आश्रय घेतला. युद्धात येथील अनेक आदिवासी जमाती ओढल्या गेल्या. त्यांच्याकडे शस्त्रे आली आणि त्यांचे सशस्त्र गट निर्माण झाले. 

तालिबानच्या निर्मितीचा फटका

९०च्या दशकापासून उदयाला आलेल्या तालिबान आणि नंतरच्या काळातील ‘आयसिस’ या जहाल दहशतवादी संघटनांसह अनेक अतिरेकी संघटनांसाठी कुर्रम हा जिल्हा महत्त्वाचा तळ राहिला. अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमा ओलांडण्यासाठी हा जिल्हा महत्त्वाचा आहे. त्याशिवाय येथील दुर्गम पर्वतरांगादेखील दहशतवाद्यांच्या दृष्टीने फायद्याच्या ठरल्या. त्यापूर्वी पाकिस्तानात १९७७ ते १९८८ या कालावधीत पाकिस्तानची सत्ता ताब्यात ठेवणाऱ्या जनरल झिया उल हक यांच्या धोरणांचाही कुर्रमच्या सध्याची स्थितीला मोलाचा हातभार लागला आहे. पाकिस्तानची विविधपंथीय मुस्लीम लोकसंख्या सरसकट सुन्नीबहुल करण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे तेथील इतर पंथीय मुस्लीम एकतर उद्ध्वस्त झाले किंवा थेट हिंसाचाराकडे वळाले. कुर्रमला हिंसाचाराकडे ढकलणारे घटक आता एकतर लयाला गेले आहेत किंवा कालबाह्य झाले आहेत किंवा त्यामध्ये पूर्ण बदल झाला आहे. त्याचवेळी तेथील जमातींना हिंसाचारातून बाहेर काढणाऱ्या शक्ती मात्र दिसत नाहीत. 

nima.patil@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why shia vs sunni conflict start again in pakistan print exp amy