अन्वय सावंत
भारतातील खेळपट्ट्यांबाबत कायमच चर्चा होत असते. विशेषत: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांसारखे संघ भारतात येऊन पराभूत झाले, तर त्यांच्या आजी-माजी क्रिकेटपटूंकडून खेळपट्ट्यांना लक्ष्य केले जाते. याच वर्षी भारतात झालेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे काही माजी खेळाडू आणि प्रसारमाध्यमांकडून भारतातील खेळपट्ट्यांवर टीका करण्यात आली होती. आता याच टीकाकारांचे घर असलेल्या ऑस्ट्रेलियातील एक खेळपट्टी चर्चेचा विषय ठरली आहे. जिलॉन्ग येथील असुरक्षित खेळपट्टीमुळे बिग बॅश लीग ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सामना रद्द करावा लागला आहे.
बिग बॅश लीगमध्ये नक्की काय घडले?
बिग बॅश लीगमध्ये रविवारी (१० डिसेंबर) मेलबर्न रेनेगेड्स आणि पर्थ स्कॉर्चर्स हा सामना असुरक्षित खेळपट्टीमुळे रद्द करावा लागला. व्हिक्टोरिया राज्यातील जिलॉन्ग येथे शनिवारपासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रात्रभर हे मैदान आच्छादित ठेवण्यात आले होते. त्यानंतरही सामना व्हावा यासाठी येथील मैदान कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. रविवारी ठरल्याप्रमाणे सामन्याला सुरुवातही झाली. मात्र, पर्थ स्कॉर्चर्स संघाच्या डावातील ६.५ षटके झाल्यानंतर पंचांनी खेळ थांबवला आणि खेळपट्टीची पाहणी केली. अखेर ही खेळपट्टी खेळण्यासाठी असुरक्षित असल्याचे वाटल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
आणखी वाचा-विश्लेषण : जीवाश्म इंधनांचा वापर थांबवणे खरेच शक्य आहे का? कॉप २८मध्ये हा वादाचा विषय का ठरला?
खेळाडूंची काय प्रतिक्रिया होती?
नाणेफेकीच्या वेळी मेलबर्न रेनेगेड्स संघाचा कर्णधार निक मॅडिसनने खेळपट्टी फारशी चांगल्या स्थितीत नसल्याचे म्हटले होते. असे असतानाही सामन्याला सुरुवात करण्यात आली होती. सामन्यादरम्यान चेंडूला कधी अतिरिक्त उसळी मिळत असल्याचे, तर चेंडू कधी फार खाली राहत असल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे पर्थ स्कॉर्चर्सच्या फलंदाजांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता. ‘‘पर्थ संघाचा फलंदाज जोश इंग्लिसला या खेळपट्टीवर खेळताना सुरक्षित वाटत नव्हते. चेंडू विचित्रपणे उसळी घेत असल्याचे त्याला जाणवले. अशा खेळपट्टीवर फलंदाजांना गंभीर दुखापतीचा धोका होता. सुदैवाने कोणत्या फलंदाजाला चेंडू लागला नाही,’’ असे मेलबर्न संघाचा अनुभवी खेळाडू आरोन फिंच म्हणाला.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची भूमिका काय?
सामना रद्द करावा लागल्याने चाहते आणि खेळाडूंचा हिरमोड झाला आहे. ही परिस्थिती का ओढवली याची सखोल चौकशी केली जाईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले. खेळपट्टी अशा स्थितीत का होती आणि खेळपट्टी सुरक्षित नसतानाही सामन्याला का सुरुवात करण्यात आली, याची क्रिकेट ऑस्ट्रेलिया माहिती घेणार आहे.
आणखी वाचा-Sharad Pawar त्यामुळेच कर्करोगही हादरवू शकला नाही- असं शरद पवार का म्हणतात?
असुरक्षित किंवा निकृष्ट खेळपट्टीमुळे यापूर्वी सामने रद्द करावे लागले आहेत का?
२००९मध्ये दिल्लीच्या फिरोझ शाह कोटला स्टेडियमची खेळपट्टी चर्चेचा विषय ठरली होती. भारत आणि श्रीलंका या संघांमधील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना कोटलावर झाला होता. या सामन्यात श्रीलंकेची २३.३ षटकांत ५ बाद ८३ अशी स्थिती होती. त्यानंतर पंचांनी असुरक्षित खेळपट्टीमुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या खेळपट्टीवर चेंडू अनपेक्षित उसळी घेत होता. श्रीलंकेचे फलंदाज तिलकरत्ने दिलशान आणि सनथ जयसूर्या यांच्या हाताला बरेचदा चेंडू लागला होता. त्यामुळे ही खेळपट्टी खेळण्यासाठी योग्य नसल्याचा निष्कर्ष पंच, सामनाधिकारी आणि दोन्ही संघांच्या व्यवस्थापनांनी काढला होता. त्यानंतर ‘आयसीसी’ने कोटलावर एका वर्षाची बंदी घातली होती.
त्याचप्रमाणे १९९७मध्ये इंदूर येथील नेहरू स्टेडियमच्या धोकादायक खेळपट्टीमुळे भारत-श्रीलंका सामनाही रद्द करावा लागला होता. या सामन्यात तीन षटकांचाही खेळ झाला नव्हता. १९९७-९८मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील सबायना पार्क, जमैका येथे झालेला कसोटी सामनाही निकृष्ट खेळपट्टीमुळे केवळ १०.१ षटकांनंतर थांबवण्यात आला होता. इंग्लंडच्या फलंदाजांना बरेचदा चेंडू लागल्यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडच्या काळात ऑस्ट्रेलियातील शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील एक सामनाही धोकादायक खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला होता. २०१९च्या हंगामात ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर व्हिक्टोरिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये हा सामना झाला होता. चार दिवसीय सामन्याच्या पहिल्या दिवशीच केवळ ४० षटकांनंतर हा सामना थांबवण्यात आला होता.