वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सेमी फायनलच्या मुकाबल्यात भारतीय संघाने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. विक्रमांचा पाऊस पडलेल्या या लढतीत क्रिकेटपटूंना क्रॅम्पसचा (पायात गोळे येणं, पेटके, पेटगा) त्रास जाणवला. युवा सलामीवीर शुबमन गिलला क्रॅम्पसच्या त्रासामुळे तंबूत परतावं लागलं. ५०व्या वनडे शतकासह नवा शतकाधीश झालेल्या विराट कोहलीलाही क्रॅम्पसनी सतावलं. प्रचंड धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेलने दिमाखदार शतकी खेळी साकारली. पण त्यालाही क्रॅम्पने सतावलं. याच मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यादरम्यान झालेल्या लढतीत ग्लेन मॅक्सवेलने वादळी द्विशतक झळकावलं. पण या खेळीदरम्यान क्रॅम्पसमुळे मॅक्सवेलला धावणं सोडा चालताही येईना. अक्षरक्ष: एका पायावर संघर्ष करत मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला थरारक विजय मिळवून दिला.
सामन्यानंतर न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सायमन डूल यांनी न्यूझीलंडच्या डावपेचांवर टीका केली. खेळभावनेचा आदर करणं समजू शकतो पण समोरचा खेळाडू खोऱ्याने धावा करत असताना त्याला रोखणं आवश्यक आहे. विराट कोहलीला क्रॅम्पचा त्रास होत होता. त्याला धावणं कठीण झालं होतं. भारतीय संघ ४०० धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत होता. अशावेळी क्षेत्ररक्षणात बदल करुन त्याला रोखता आलं असतं. यात काही वावगं किंवा चुकीचं नाही. विराट कोहलीला थोडीशी संधी दिली तरी ते महागात पडू शकतं. तेच झालं.
भारताच्या श्रेयस अय्यरला नेदरलँड्सविरुद्धच्या लढतीत क्रॅम्पचा त्रास झाला होता. दक्षिण आफ्रिकेचा हेनरिच क्लासन झंझावाती फॉर्मात आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर क्लासनने स्फोटक खेळी साकारली. प्रचंड उष्णता आणि आर्द्रतेमुळे क्लासनला या सामन्यात त्रास झाला होता. कोलकाता इथे पाकिस्तान-इंग्लंड यांच्यातील लढतीदरम्यान पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानले क्रॅम्पचा त्रास होत असल्याबद्दल पंचांना सांगितलं. त्यासाठी उपचार घेतले. सामन्यानंतर त्याला विचारलं असता तो गंमतीत म्हणाला, काही वेळेला खरंच त्रास होतो, काही वेळेस अभिनय करतो.
आणखी वाचा: मोहम्मद शमी: हिंसाचाराचा आरोप, पत्नीविरुद्ध कायदेशीर लढा, अपघात आणि समस्यांचे गर्ते
फक्त क्रिकेटपटूंना क्रॅम्पचा त्रास होतो असं नाही. शारीरिक दमसासाची परीक्षा पाहणाऱ्या कोणत्याही खेळात खेळाडूंची परीक्षा असते. युवा टेनिसपटू कार्लोस अल्काराझला फ्रेंच ओपनच्या फायनलदरम्यान सातत्याने हा त्रास झाला होता. शरीरातली बरीच ऊर्जा खर्ची पडल्याने अल्काराझला नेहमीसारखा खेळ करता आला नाही.
गिल आणि कोहली हे दोघेच क्रॅम्पचा शिकार ठरले असं नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान असंख्य खेळाडूंना या त्रासाला सामोरं जावं लागलं. उत्तम फिटनेस असणाऱ्या खेळाडूंनाही याचा त्रास झाला. वर्ल्डकप आता अंतिम टप्प्यात आला आहे. यानिमित्ताने स्पर्धेदरम्यान सातत्याने पाहायला मिळालेल्या क्रॅम्पबद्दल जाणून घेऊया.
प्रचंड आर्द्रतेमुळे प्रचंड घाम येतो आणि ऊर्जा खर्च होते. सतत धावण्यामुळे स्नायूंवर परिणाम होत असतो. वर्ल्डकप सुरू होण्याआधी शुबमन गिलला डेंग्यू झाला होता. डेंग्यूतून बरं होत गिलने पुनरागमन केलं. डेंग्यूमुळे अशक्तपणा येतो. त्यामुळेही क्रॅम्प येत असावेत असं त्याने सांगितलं.
आणखी वाचा: सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली-शतकी दीपस्तंभाचे मनसबदार
काही खेळाडूंच्या बाबतीत डिहायड्रेशन म्हणजेच शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने क्रॅम्प येतात. स्नायूंच्या हालचालीसाठी पाणी आणि इलेक्ट्रोलाईट्स यांचं संतुलन आवश्यक असतं. खेळाडूने अतिरिक्त पाणी किंवा एनर्जी ड्रिंक प्यायलं तर इलेक्ट्रोलाईट्स आणि पाणी यांचं समीकरण बिघडतं. यामुळे स्नायू आखडतात. त्यामुळे खेळाडूंच्या हालचालीवर मर्यादा येतात.
व्हर्जिनिया विद्यापीठातील स्पोर्ट्स न्युट्रिशन विभागाचे संचालक रँडी बर्ड यांनी वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना सांगितलं की, ‘असंख्य खेळाडू डिहायड्रेटेड स्थितीत खेळतात. क्रॅम्प ही गंभीर समस्या नाही. प्रचंड उष्णता आणि आर्द्रतेमुळे ही समस्या बळावते. सराव, खेळ, पाणी-एनर्जी ड्रिंक यांचं शिस्तबद्ध वेळापत्रकाचं पालन केलं तर याचा त्रास कमी होतो. आर्द्रतेमुळे घाम निथळून जायला वेळ लागतो. शरीराचं तापमान थंड राहावं यासाठी घाम मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतं. यामुळे शरीरातलं पाणी आणि द्रवाची पातळी कमी होत जाते’.
न्यूरोमस्क्युलर फटिगमुळेही क्रॅम्पचा त्रास होतो असं विशेषज्ञ सांगतात. मज्जास्नायूंमध्ये आलेला थकवा हा गोळे येण्याचं आणखी एक कारण आहे असं तज्ज्ञ सांगतात. यामागची कारणीमीमांसा अशी आहे की थकव्यामुळे अचानक उत्साहात येऊन लगेच कोणतीही कृती करता येत नाही. त्यामुळे स्नायूच्या विशिष्ट भागात गोळा येतो.
स्पोर्ट्स थेरपिस्टच्या मते, रक्ताभिसरणाची पातळी नियंत्रित नसल्यामुळेही क्रॅम्प येऊ शकतात. पायाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे पायात गोळे येणं, अतीव वेदना जाणवणं असे त्रास होतात.
क्रॅम्प्स रोखणं पूर्णत: शक्य नाही. पण काही उपाय करता येतात. खेळाडूंना प्रदीर्घ काळ शारीरिक श्रमाचं काम असतं. त्यांनी सतत पाणी आणि एनर्जी ड्रिंक पित राहणं अत्यावश्यक आहे. जेणेकरुन शरीरातली पाण्याची पातळी नियंत्रित राहते. खेळताना क्रॅम्प्सचा त्रास झाला तर हलका मसाज करावा आणि पुरेसं पाणी, एनर्जी ड्रिंक प्यावं. काही डॉक्टरांच्या मते मॅग्नेशियम किंवा कॅल्शियम घ्यावं.
अलीकडे अनेक क्रीडापटू पिकल ज्यूसचा वापर करतात. शेफील्ड हालम विद्यापीठात स्पोर्ट्स न्यूट्रिशन विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ.मयुर रणछोडदास यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, ‘पिकल ज्यूसमध्ये सोडियम, पोटॅशियम आणि व्हिनेगार असतं. शरीराने सोडियम आणि मीठ गमावलेलं असतं ते पिकल ज्यूसद्वारे परत मिळवता येतं. पिकल ज्यूस प्यायलानंतर तोंडात एक विशिष्ट संवेदना निर्माण होते. याद्वारे स्नायूंना संदेश जातो. क्रॅम्प येतील असं वाटू लागतं तेव्हाच खेळाडू हा ज्यूस पितात. पाण्याच्या तुलनेत ४० टक्के वेगाने हा ज्यूस क्रॅम्प कमी करतो’.