१९१९ मध्ये सुरू झालेली ‘एमडीएच’ आणि १९६७ मध्ये स्थापन झालेली ‘एव्हरेस्ट’ या कंपन्यांच्या मसाल्यांना प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात महत्त्वपूर्ण स्थान आहे. भारतीयच नव्हे तर जागतिक बाजारपेठेतही दोन कंपन्यांचे मसाले लोकप्रिय आहेत. मात्र, हाँगकाँग, सिंगापूर आणि आता अमेरिका अशा देशांनी अलीकडेच या दोन्ही कंपन्यांनी उत्पादित केलेल्या काही मसाल्यांमध्ये कर्करोगास कारणीभूत कीटकनाशके असल्याचे सांगत बंदी घातली आहे. त्याची कारणे आणि त्याबाबत या कंपन्यांचे म्हणणे काय ते जाणून घेऊयात.
‘एमडीएच’ आणि ‘एव्हरेस्ट’च्या काही मसाल्यांवर बंदी का?
अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनने या कंपन्यांच्या काही उत्पादनांत कीटकनाशकांचे अंश घातक प्रमाणात असल्याचे म्हटले आहे. हाँगकाँगच्या ‘फूड ॲण्ड एन्व्हायर्न्मेंट हायजिन’ विभागाच्या अन्न सुरक्षा केंद्राने (सीएफएस) नुकतेच एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की त्यांनी नियमित अन्न पर्यवेक्षण कार्यक्रमांतर्गत चाचणीसाठी किरकोळ विक्री केंद्रातून मसाल्यांचे नमुने गोळा केले. या नमुन्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड असल्याचे आढळून आले. त्यामुळे सीएफएसने विक्रेत्यांना या मसाल्यांची विक्री थांबवण्याची आणि उत्पादने विक्री केंद्रातून काढून टाकण्याच्या सूचना केल्या. सिंगापूर फूड एजन्सीने देखील ‘मर्यादेपेक्षा जास्त’ प्रमाणात इथिलीन ऑक्साईड आढळून आल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : रस्त्यांवरचे खड्डे आपोआप भरणार; काय आहे ‘सेल्फ हीलिंग’ तंत्रज्ञान?
इथिलीन ऑक्साईडबाबत आक्षेप का?
अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नुसार, सामान्य तापमानावर, इथिलीन ऑक्साईड हा गोड गंध असलेला ज्वलनशील रंगहीन वायू आहे. इथिलीन ऑक्साईड प्रामुख्याने इतर रसायने तयार करण्यासाठी वापरले जाते. कमी प्रमाणात, ते कीटकनाशक आणि निर्जंतुकीकरणासाठी म्हणून वापरले जाते. हे कापड, डिटर्जंट, पॉलीयुरेथेन फोम, औषध, गोंद तयार करण्यासाठीदेखील वापरले जाते. इथिलीन ऑक्साईडचा वापर मसाल्यांमध्ये ई-कोलाय आणि साल्मोनेला सारख्या सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फ्युमिगंट म्हणून म्हणजेच निर्जंतुकीकरणासाठी केला जातो. इथिलीन ऑक्साईडला गट १ कार्सिनोजेन म्हणून वर्गीकृत केले गेले आहे, असे इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने निदर्शनास आणून दिले आहे. जे कर्करोगस कारणीभूत ठरू शकते. दीर्घकाळ रसायनाच्या संपर्कात राहणाऱ्यांच्या डोळे, त्वचा, नाक, घसा आणि फुफ्फुसांना त्रास होऊ शकतो आणि मेंदू आणि मज्जासंस्थेचे नुकसान होऊ शकते.
कोणत्या उत्पादनांवर बंदी?
हाँगकाँगने ‘एमडीएच’चे मद्रास करी पावडर, सांबार मसाला पावडर आणि करी पावडर तसेच ‘एव्हरेस्ट’ ग्रुपचा फिश करी मसाला या चार मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तर सिंगापूरने एव्हरेस्टचा फिश करी मसाल्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
हेही वाचा : काश्मीरमधील अनंतनाग-राजौरीची निवडणूक पुढे ढकलली जाणार? नेमके कारण काय?
मसाला कंपन्यांचे म्हणणे काय?
एव्हरेस्टचे म्हणणे आहे की, हे अहवाल खोटे आहेत. एव्हरेस्टवर कोणत्याही देशात बंदी नाही. एव्हरेस्टच्या ६० उत्पादनांपैकी फक्त एकच उत्पादनाचे परीक्षण करण्यात आले आहे. कंपनीची सर्व उत्पादने ‘सुरक्षित आणि उच्च दर्जाची’ आहेत. एव्हरेस्ट स्वच्छता आणि सर्व सुरक्षा मानकांचे पालन करते. भारतीय मसाला मंडळाच्या प्रयोगशाळांकडून आवश्यक परवानगी आणि मंजुरी मिळाल्यानंतरच उत्पादने निर्यात केली जातात, असे एव्हरेस्ट कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. तर सिंगापूर आणि हाँगकाँगच्या नियामक प्राधिकरणांनी बंदीबाबत अद्याप सूचित केलेले नाही, असे सांगत एमडीएचने, “आम्ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणि सुरक्षा मानकांचे पालन करतो,” असे म्हटले आहे.
भारताची भूमिका काय?
या विक्रीबंदीबाबत स्पाइसेस बोर्ड ऑफ इंडिया अधिक माहिती मिळविण्यासाठी सिंगापूर आणि हाँगकाँगमधील भारतीय मिशनच्या संपर्कात आहे. तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने देशातील राज्यांना या कंपन्यांनी उत्पादित केलेल्या विविध मसाल्यांचे नमुने गोळा करण्याचे आणि गुणवत्ता तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही कंपन्या चौकशीच्या कक्षेत असून दोषी आढळल्यास त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा : विश्लेषण: राजस्थानात सापडली हडप्पाकालीन औद्योगिक वसाहत; पुरावे काय सांगतात?
भारतीय मसाल्यांबाबत पूर्वीही वाद?
जून २०२३ मध्ये, अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने साल्मोनेला बॅक्टेरियाची चाचणी सकारात्मक झाल्यामुळे ११ राज्यांमधून नेस्लेच्या मॅगी मसाला-ए-मॅजिकसह एव्हरेस्टचा सांबार मसाला आणि गरम मसाला बाजारातून मागे घेण्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे, सप्टेंबर २०१९ मध्ये, फूड अँड ड्रग असोसिएशनने सॅल्मोनेला जीवाणू आढळल्यामुळे एमडीएचला उत्तर कॅलिफोर्नियातील सांबार मसाला परत घेण्याची विनंती केली होती. सॅल्मोनेला या जीवाणूमुळे अतिसार आणि मळमळ होण्याची शक्यता असते.