तमिळनाडूच्या कल्लाकुरिचीमध्ये हूच म्हणजेच बनावट दारू प्यायल्याने ४७ जणांचा मृत्यू झाला आणि जवळ जवळ १०० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांनी सांगितले की, मृतांचा आकडा कमी असता, परंतु रुग्णालयात येण्याच्या आधीच काहींचा मृत्यू झाला. हूच म्हणजे काय? बनावट दारू कशी तयार केली जाते? त्यामुळे पिणार्यांचा मृत्यू कसा होतो? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
हूच म्हणजे काय?
हूच हा सामान्यतः निकृष्ट दर्जाच्या दारूसाठी वापरला जाणारा शब्द आहे; जो हुचिनू या मूळ अलास्कन जमातीपासून आला आहे. ब्रॅण्डेड दारू अत्याधुनिक उपकरणांचा वापर आणि उच्च गुणवत्ता यांचे पालन करून तयार होते; तर ही बनावट दारू अतिशय जुनी पद्धत वापरून तयार केली जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर, हूच म्हणजे नशा करण्यासाठी घेण्यात येणारी दारू. परंतु, ही दारू जर चुकीच्या पद्धतीने तयार केली गेली, तर पिणार्यांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो. दुर्दैवाने हूच प्रत्यक्षात प्यायल्याशिवाय त्याचे सेवन करणे सुरक्षित आहे की नाही हे सांगणे जवळजवळ अशक्य आहे.
हेही वाचा : नेट परीक्षा नेमकी असते कशासाठी? काय विचारलं जातं आणि या परीक्षेला एवढी मागणी का? जाणून घ्या…
हूच कशी तयार केली जाते?
सर्व प्रकारचे अल्कोहोल फर्मेंटेशन आणि डिस्टिलेशन अशा दोन मूलभूत प्रक्रिया वापरून तयार केले जाते.
फर्मेंटेशन : दारू तयार करण्यासाठी सर्वप्रथम फर्मेंटेशनची प्रक्रिया केली जाते. या फर्मेंटेशनमध्ये यीस्ट व साखर यांच्यात प्रक्रिया होते. ऊस किंवा खजुराचा रस, साखर, जवस, मका, सडलेली द्राक्षे, बटाटा, तांदूळ, खराब झालेले संत्रे आदींमध्ये साखर असते. त्यांना फर्मेंट करून अल्कोहोलयुक्त मिश्रण तयार केले जाते. ही एक जुनी प्रक्रिया आहे; जी बीअर किंवा वाइन यांसारखी पेये तयार करण्यासाठी वापरली जाते. फर्मेंटेशन प्रक्रिया सुरू राहिल्याने अल्कोहोलचे प्रमाण वाढते. जास्त फर्मेंट केल्याने मिश्रण विषारी होऊ शकते. त्यामुळे या मिश्रणाचे डिस्टिलेशन आवश्यक असते.
डिस्टिलेशन : बाष्पीभवन करून फर्मेंट झालेल्या मिश्रणापासून अल्कोहोल भौतिकरीत्या वेगळे करण्याची ही प्रक्रिया आहे. मिश्रणाला वेगवेगळ्या बिंदूंवर उकळले जाते. हे मिश्रण योग्य तापमानापर्यंत गरम केल्यानंतर अल्कोहोल हे पाणी आणि इतर गोष्टींपासून वेगळे केले जाते. डिस्टिल्ड शीतपेये किंवा स्पिरिट्स कोणत्याही आंबलेल्या पेयापेक्षा कितीतरी जास्त शक्तिशाली असतात.
हूच हे आंबवलेले मिश्रण, सामान्यत: स्थानिकरीत्या उपलब्ध यीस्ट आणि साखर किंवा फळ (बहुतेकदा फळांचा कचरा) वापरून तयार केले जाते. परंतु, ही प्रक्रिया अत्यंत निकृष्ट ठिकाणी केली जाते. अल्कोहोलचे प्रमाण वाढविण्यासाठी मिश्रणावार डिस्टिलेशनच्या अनेक फेऱ्या केल्या जातात.
हूच धोकादायक कधी होते?
डिस्टिल्ड केलेल्या आणि आंबलेल्या मिश्रणात अधिक नशा येण्यासाठी मिथेनॉल मिसळले जाते. मिथेनॉल हे मानवी शरीरासाठी अत्यंत विषारी आहे. वाइनसारख्या नॉन-डिस्टिल्ड अल्कोहोलिक पेयांमध्ये फार कमी प्रमाणात मिथेनॉल असते; परंतु डिस्टिलेशन प्रक्रियेदरम्यान मिथेनॉल मिश्रणात टाकल्यास मिश्रण अधिक विषारी होते. मिथेनॉलचा उत्कलन बिंदू ६४.७ डिग्री सेल्सिअस आहे; तर इथेनॉलचा उत्कलन बिंदू ७८.३७ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आहे. डिस्टिलेशन करताना जेव्हा मिश्रणाचे तापमान ६७.७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचते, तेव्हा एकवटलेले अल्कोहोल गोळा करणारे भांडे अत्यंत विषारी रसायनाने भरू लागते.
दारू विषारी होऊ नये यासाठी तापमान ७८.३७ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त; परंतु १०० डिग्री सेल्सिअस (पाण्याचा उत्कलन बिंदू)पेक्षा कमी असणे महत्त्वाचे आहे. प्रक्रियेची अचूकता राखण्यासाठी व्यावसायिक डिस्टिलर्सकडे अत्याधुनिक उपकरणे असतात आणि त्याद्वारे अनेक तपासण्याही केल्या जातात. परंतु, हूच निर्मात्यांकडे तापमान नियंत्रणात नसते.
हूचमुळे इतर कोणते धोके निर्माण होतात?
चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या दारूमध्ये भेसळीचे प्रमाण जास्त असते. हूच निर्माते बऱ्याचदा दारू तयार करताना सावधगिरी बाळगत नाहीत. मद्याचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यात भेसळ केली जाते. त्यात सेंद्रिय कचरा, बॅटरी ऍसिड आणि इंडस्ट्री ग्रेड मिथेनॉल टाकले जाते, जे मानवी शरीरासाठी अत्यंत विषारी आहे. या भेसळीमुळे मृत्युची जोखीम वाढते. हे सर्व विषारी पदार्थ हूचला अधिक मादक करतात; ज्यामुळे कमी प्रमाणात दारू प्यायल्यावरही दृष्टी कमजोर होणे, स्मृती कमी होणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. ज्या दारूमध्ये मिथेनॉलसारखे भेसळजनक पदार्थ जास्त प्रमाणात असतात, त्याचे सेवन करणे प्राणघातक ठरू शकते.
हूचचा शरीरावर कसा परिणाम होतो?
मिथेनॉल किंवा मिथाइल शरीरात गेल्याने शरीरात जास्त प्रमाणात ऍसिड तयार होते जे मूत्रपिंडांद्वारे बाहेर निघू शकत नाही. यावरील उपचार म्हणजे इंट्राव्हेनस फोमेपिझोल. इंट्राव्हेनस फोमेपिझोल महागडे असते आणि भारतातील अनेक भागात इंट्राव्हेनस फोमेपिझोल उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत, डॉक्टर इथेनॉल आणि पाण्याचे मिश्रण देतात. इथेनॉल मिथेनॉलचे विषामध्ये रुपांतर होण्यास प्रतिबंधित करते आणि नैसर्गिकरित्या किंवा डायलिसिसद्वारे ते शरीरातून बाहेर काढण्यास मदत करते.