आसिफ बागवान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानवसदृश बुद्धिमत्तेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन इंटरनेट विश्वाचे केंद्र बनू पाहात असलेल्या चॅट जीपीटी तंत्रज्ञानाचा पुढचा अवतार असलेले ‘जीपीटी-४’ वापरण्यासाठी सज्ज झाले आहे. आधीच्या तंत्रज्ञानापेक्षा प्रगल्भ, प्रगत असलेल्या ‘जीपीटी ४’ने तंत्रज्ञान क्षेत्रात काय काय बदल घडतील, याविषयी चर्चा सुरू असतानाच या क्षेत्रातील दिग्गज कंपन्या आणि मातब्बर उद्योगपतींनी त्याला विरोध दर्शवला आहे.

‘जीपीटी ४’ काय आहे?

मानव आणि संगणक यांच्यात ‘मानवीय’ पद्धतीने संवाद घडवून आणताना विविध प्रकारच्या क्रिया सहज पार पाडू शकणाऱ्या ‘चॅट जीपीटी’ची सुधारित आवृत्ती ‘जीपीटी ४’ आहे. ‘जीपीटी ३.५’ पेक्षा दहापट अधिक वेगवान असलेल्या या नव्या तंत्रज्ञानात मानवाशी मानवासारखा संवाद साधण्याची क्षमताही अधिक आहे. ‘जीपीटी ३.५’ची शाब्दिक प्रतिसाद क्षमता साडेतीन हजार शब्दांची असताना ‘जीपीटी ४.०’मधून एका वेळी २५ हजार शब्दांचा प्रतिसाद मिळू शकतो. ‘जीपीटी ४’ला अवगत विषयांची यादीही विस्तारली असून अचूकतेतही ४० टक्क्यांहून अधिक सुधारणा झाल्याचा दावा हे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या ‘ओपन एआय’ संस्थेने केला आहे. ‘जीपीटी ४’ केवळ उत्तरेच देते, असे नव्हे तर एखाद्या प्रश्नाला तात्त्विक प्रतिप्रश्न विचारून मुद्दय़ांमध्ये अधिक स्पष्टताही आणू शकते.

‘जीपीटी ४’चे फायदे काय?

हे तंत्रज्ञान केवळ शाब्दिक प्रश्नांनाच नव्हे तर दृश्य अर्थात छायाचित्र वा चित्रफितीच्या साह्याने विचारलेल्या प्रश्नांनाही व्यवस्थित उत्तरे देते. उदा. एखाद्या खाद्यपदार्थाचे छायाचित्र टाकून त्याच्या पाककृतीची विचारणा केल्यास हे तंत्रज्ञान सविस्तर पाककृती पुरवते. ‘जीपीटी’च्या आधीच्या आवृत्तीप्रमाणेच या तंत्रज्ञानाचेही दृश्य फायदे अधिक असल्यामुळे मार्चच्या सुरुवातीस ते सज्ज होताच अनेक कंपन्यांनी त्याचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये मॉर्गन स्टॅन्ले, खान अकॅडमी, डय़ूओिलगो आदी कंपन्यांसह आइसलँड सरकारनेही ‘जीपीटी ४’चा वापर सुरू केला आहे.

मग या तंत्रज्ञानाला विरोध कोणाचा?

‘जीपीटी ४’ वापरासाठी सज्ज असल्याचे ‘ओपन एआय’कडून जाहीर झाल्यापासूनच इंटरनेटवरील विविध व्यासपीठांवरून या तंत्रज्ञानाबाबत आक्षेप घेण्यात येऊ लागले आहेत. मात्र, गेल्या आठवडय़ात तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित १८०० जणांनी ‘जीपीटी ४’वर आक्षेप घेणारे एक निवेदन प्रसारित केले. यामध्ये ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क, अॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह वॉझ्नीयाक, स्काइपचे क्रेग पीटर्स यांच्यासह अनेक मोठय़ा तंत्र कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

विरोधकांचे आक्षेप काय?

‘जीपीटी ४.०’ला विरोध करणाऱ्यांनी हे तंत्रज्ञान मानवजातीसाठी धोकादायक ठरेल, अशी भीती व्यक्त केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाकडे आता मानवी मेंदूइतकी बुद्धिमत्ता आली असल्यामुळे त्याला नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे. या तंत्रज्ञानाची क्षमता ते विकसित करणाऱ्यांच्या विवेकबुद्धीच्या आवाक्याबाहेरची आहे. त्यामुळे ही ‘अमानवी मने’ उद्या कदाचित मानवालाच हद्दपार करतील. ही यंत्रे येत्या काळात आपल्यावर खोटय़ा माहितीचा मारा करतील, अशी भीती या मंडळींनी व्यक्त केली आहे. याचा थेट धोका आपल्या मानवसंस्कृतीला संभवतो, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. विविध तंत्रज्ञान कंपन्या ‘जीपीटी ४’ पेलण्यासाठी समर्थ व्हाव्यात, यासाठी पुढील सहा महिने या तंत्रज्ञानाच्या वापरावर आणि त्यातील पुढील संशोधनावर बंदी आणावी, अशी मागणीच ‘जीपीटी ४’च्या विरोधकांनी केली आहे.

‘जीपीटी ४’वरील आक्षेप अनाठायी?

इलॉन मस्कपासून अनेक नामांकित कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांनी ‘जीपीटी ४’च्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या समर्थकांच्या मते हे आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाहीत. ‘एआय’च्या स्पर्धेत मागे पडण्याच्या भीतीने कंपन्यांची ही कुरबुर सुरू असल्याचे ते सांगतात. सध्याच्या मोहिमेमागे इलॉन मस्कप्रणीत फ्युचर ऑफ लाइफ इन्स्टिटय़ूट या संस्थेचा हात असून व्यावसायिक ईष्र्येतून ही मोहीम सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

‘जीपीटी ४’मध्ये काय उणिवा आहेत?

वापरकर्त्यांने विचारलेल्या प्रश्नाचा रोख आणि त्यामागील विचार समजून त्यावर प्रतिसाद देण्याची क्षमता अद्याप या तंत्रज्ञानाकडे नाही. वापरकर्त्यांशी संवाद साधताना त्याच्या पार्श्वभूमीचा किंवा संवादामागच्या हेतूचा अंदाज लावणे या यंत्रणेला अद्याप शक्य झालेले नाही. शिवाय मानवासारखे जुन्या संवादांचे स्मरण ठेवणे आणि त्याचा वापर भविष्यातील संवादांसाठी करणेही या तंत्रज्ञानाला जमत नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why tech companies fear gpt 4 print exp 0323 amy
Show comments