दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी भारत राष्ट्र समितीच्या नेत्या, तसेच माजी मुख्यमंत्री केसीआर राव यांची कन्या के. कविता यांना १५ मार्च रोजी ईडीकडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांना २३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आहे. के. कविता यांनी आम आदमी पक्षाच्या नेत्याला १०० कोटींची कथित लाच दिल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे याच प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया व संजय सिंग यांनादेखील अटक करण्यात आली आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अनेकदा चौकशीसाठी समन्सदेखील पाठविण्यात आले आहे. दरम्यान, हे प्रकरण नेमके काय आहे? या प्रकरणात के. कविता यांना का अटक करण्यात आली आहे? आणि मुळात तेलंगणाच्या आमदाराचा दिल्लीतील या प्रकरणाशी नेमका संबंध काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हेही वाचा – विश्लेषण : भारतीय नौदलाकडेही आता ब्राम्होस क्षेपणास्त्र… मारक क्षमतेत कसा फरक पडणार?
दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरण नेमके काय?
जुलै २०२२ मध्ये दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी दिल्लीतील मद्य धोरणात अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांनी या संदर्भात नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांना एक अहवालही सादर केला होता. या अहवालानुसार तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मद्य परवाना देताना, त्या बदल्यात कमिशन स्वरूपात पैसे घेतले, असा आरोप करण्यात आला. तसेच मनीष सिसोदिया यांनी घेतलेल्या एकतर्फी निर्णयांमुळे राज्याचे ५८० कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले, असेही या अहवालात सांगण्यात आले होते.
त्याशिवाय ‘आप’च्या नेत्यांना मद्य व्यवसायातील मालक व दुकानदार यांच्याकडून ‘कमिशन’च्या बदल्यात पैसे मिळाले. या पैशांचा वापर २०२२ साली गोवा आणि पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत करण्यात आला, असा आरोपही या अहवालात करण्यात आला होता. करोना काळात मद्यविक्री करणाऱ्या दुकानदारांवरील दंड माफ करून, त्यांना दिलासा देण्यात आला, असेही या अहवालात म्हटले होते.
ईडीने नेमके काय आरोप केले?
मुख्य सचिव नरेश कुमार यांच्या आरोपांनतर दिल्लीच्या नायब राज्यपालांनी या प्रकरणी मनीष सिसोदिया यांच्यासह १४ जणांवर गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. काही दिवसांतच या प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि संजय सिंग यांना अटक करण्यात आली. न्यायालयातील सुनावणीदरम्यान या प्रकरणात एकूण २९२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, या घोटाळ्यातील पद्धत उघड करणे आवश्यक आहे, असे ईडीकडून सांगण्यात आले होते.
त्याशिवाय कथित घोटाळ्याच्या माध्यमातून दिल्लीतील घाऊक मद्य व्यवसाय संपूर्णपणे खासगी कंपन्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे आणि या माध्यमातून १२ टक्के फायदा आणि सहा टक्के कमिशनच्या रूपात पैसे ठरविण्यात आले होते, असेही ईडीकडून सांगण्यात आले होते. दिल्लीच्या अबकारी धोरणात जाणूनबुजून काही त्रुटी ठेवल्या गेल्या होत्या; ज्यामुळे ‘आप’च्या नेत्यांना फायदा व्हावा यासाठी मद्यविक्री व्यावसायिकांना मागच्या दाराने प्रोत्साहन दिले गेले होते, असा आरोपही ईडीकडून करण्यात आला होता. आम आदमी पक्षाचे नेते विजय नायर हे या संपूर्ण प्रकरणात मध्यस्थी करीत होते. त्यांना ‘साउथ ग्रुप’ या व्यावसायिकांच्या गटाकडून कमिशनच्या स्वरूपात १०० कोटी रुपये देण्यात आले होते, असा आरोपही ईडीकडून करण्यात होता.
या प्रकरणाशी के. कविता यांचा संबंध काय?
के. कविता (वय ४६) या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या व तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर राव यांच्या कन्या आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, के. कविता या आप नेत्याला कथित लाच देणाऱ्या ‘साऊथ ग्रुप’शी संबंधित आहेत. त्याशिवाय साऊथ ग्रुपशी संबंधित ओंगले येथील खासदार मागुंता श्रीनिवासुलू रेड्डी, मागुंता रेड्डी यांचे पुत्र राघव रेड्डी व अरबिंदो फार्मा कंपनीचे संस्थापक पी. व्ही. रामप्रसाद रेड्डी यांचे पुत्र पी. सारनाथचंद्र रेड्डी यांच्यावरही या प्रकरणी आरोप करण्यात आले आहेत. साऊथ ग्रुपने दिल्लीमधील घाऊक आणि किरकोळ मद्यविक्री क्षेत्रात प्रवेश करता यावा म्हणून लाच दिल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.
या प्रकरणी चौकशीसाठी के. कविता यांना समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यांनी त्या समन्सविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच १ डिसेंबर २०२२ रोजी सीबीआयने के. कविता यांची त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी चौकशी केली होती. ही चौकशी जवळपास सात तास चालली होती. त्यानंतर ईडीने त्यांना ६ डिसेंबर रोजी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. दरम्यान, शनिवारी ( १६ मार्च) रोजी के. कविता यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी १०० कोटींच्या गैरव्यवहारात त्या स्वत: सहभागी होत्या, असा आरोप ईडीकडून करण्यात आला.
ईडीच्या आरोपांवर के. कविता यांचे म्हणणे काय?
गेल्या वर्षी तेलंगणात झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी के. कविता यांनी द इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी, ईडीच्या नोटीसचा उल्लेख ‘मोदी नोटीस’ असा केला होता. तसेच या संपूर्ण प्रकरणात त्यांची कोणतीही भूमिका नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. “त्यांनी माझ्यावर आरोप केले खरे; पण ते सिद्ध करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. आम्ही संघर्ष करण्यासाठी तयार आहोत”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती.