गेल्या काही दिवासांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती वाढल्या आहेत. नुकतेच जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील ताबारेषेवर (एलओसी) शनिवारी भारतीय लष्कराची दहशतवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. दरम्यान, हिवाळ्यात भारतातील प्रदेशात प्रवेश करणे कठीण होते. त्यामुळे सध्या पाकव्याप्त काश्मीरमधून दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये नेमकं काय घडतंय? हे जाणून घेऊ या…
दहा दिवसांत ५ चकमकीच्या घटना
गेल्या १० दिवसांपासून जम्मू आणि काश्मीर भागात लष्कराच्या दहशतवाद्यांविरोधात ५ चकमकी झाल्या आहेत. या हल्ल्यांत भारतीय अधिकाऱ्यांसहित काही जवान शहीत झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर हिवाळा तोंडावर असताना सीमेच्या सुरक्षा व्यवस्थेत काही बदल करण्याची गरज आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पीर पांजालच्या दक्षिणेस रियासी जिल्ह्यातील छासना आणि राजोरी जिल्ह्यातील नारला भागात अशा एकूण दोन घटना घडल्या आहेत. पर्वतीय प्रदेशाच्या उत्तरेस अशाच तीन घटना घडल्या आहेत. या तीन घटना उरी सेक्टर, बारामुल्ला या प्रदेशात तसेच अनंतनागजवळ कोकरनागच्या जंगलात घडल्या आहेत.
हिवाळा सुरू होण्याआधी जास्तीत जास्त दहशतवादी पाठवण्याचा प्रयत्न
हिवाळ्यात उत्तरेकडील भागात हीमवृष्टी होते. त्यामुळे या भागात कारवाया करणे दहशतवाद्यांना शक्य होत नाही. म्हणूनच हिवाळा सुरू होण्यापूर्वी दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत, असे लष्करातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. “पीर पांजालच्या दक्षिणेकडील भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरात घुसखोरी करणे दहशतवाद्यांना कोणत्याही ऋतूत शक्य आहे. मात्र लोलाबच्या उत्तरेकडील शामशाबरी पर्वतराजींतील बर्फ आणि डोंगराळ प्रदेशामुळे पीर पांजाल पर्वत ओलांडून भारताविरोधात कारवाया करणे दहशतवाद्यांना कठीण होते,” असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. हिवाळा सुरू होण्याआधी जास्तीत जास्त दहशतवादी भारतात पाठवण्यासाठी प्रयत्न होत आहे. याच कारणामुळे सध्या दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. सध्या जम्मू काश्मीरमधील स्थानिक बंडखोरांचीही संख्या कमी झाली आहे. त्यामुळेदेखील सीमेपलीकडून दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
कधीकधी घुसखोर कोणत्याही शस्त्राविना येतात
सध्या सीमेपलीकडून भारतात घुसखोरी करण्यासाठी नवनव्या योजना आखल्या जात आहेत. कधीकधी घुसखोर कोणत्याही शस्त्राविना भारतात येतात. दुसरीकडे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्र टाकून जाण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कोणत्याही शस्त्राविना भारतात प्रवेश केलेले दहशतवाद्यांनी ही शस्त्रं नंतर घेऊन जावीत, यासाठी ती सीमारेषेवर टाकली जातात, असेही लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
घुसखोरी रोखण्यात लष्कराला येतात अडचणी
घुसखोरांचे वेगवेगळे मार्ग शोधण्यात अडचणी येत असल्याचेही लष्करातील अधिकाऱ्यांनी सांगितले. “उरी हा प्रदेश नियंत्रण रेषेजवळ आहे. पीर पांजाल पर्वतराजी तसेच हाजी पीर या प्रदेशाच्या जवळ भारताचा उरी हा प्रदेश आहे आहे. अनंतनाग हा भाग पीर पांजाल पर्वतरांग आणि श्रीनगरच्या मध्ये आहे. या भागातून दहशतवाद्यांना भारतात प्रवेश करता येतो,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र तरीदेखील लष्कराच्या कारवाया मात्र कायम सुरूच आहेत.
२०२० सालापासून ५४९ अतिरेकी ठार
दरम्यान, २०२० सालापासून जम्मू काश्मीरमध्ये मारलेल्या एकूण अतिरेक्यांपैकी ५४९ स्थानिक तर यातील ८६ अतिरेकी हे परदेशातील होते. आतापर्यंत १३३ स्थानिक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केलेले आहे; किंवा त्यांना अटक करण्यात आली आहे. मे २०२३ पर्यंत जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात ३६ स्थानिक तर ७१ परदेशी दहशतवादी असल्याची नोंद आहे.