दक्षिण काश्मीरमधील पहलगाम शहरात दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील हा सर्वांत प्राणघातक हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी (२२ एप्रिल) दुपारी दहशतवाद्यांनी पहलगाम येथील प्रसिद्ध बैसरन व्हॅलीमध्ये गोळीबार केला. हल्ल्याच्या काही तासांनंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संवाद साधला.
त्यांनी या घटनेचा निषेध केला. मोदी म्हणाले, “जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रति मी संवेदना व्यक्त करतो. जखमी व्यक्तींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागे जे सहभागी आहेत, त्यांना सोडणार नाही!”
“त्यांचा दुष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे आणि तो आणखी बळकट होईल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींनी सौदी अरेबियाचा दोन दिवसांचा दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला आणि बुधवारी ते भारतात परतले. पण, अनेकांना पडणारा प्रश्न म्हणजे दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील पहलगामवरच हा हल्ला का केला? त्याविषयी कोणती माहिती समोर आली? ते जाणून घेऊ…

हा हल्ला बैसरन व्हॅलीमध्येच करण्यामागील कारण काय?
अधिकाऱ्यांना असा संशय आहे की, हल्लेखोर जम्मूतील किश्तवाड येथून घुसले असावेत आणि दक्षिण काश्मीरच्या कोकरनागमार्गे बैसरनला पोहोचले असावेत. या परिसरामुळेदेखील या हल्ल्याची जागा निश्चित झाली असावी, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. ही घटना दुपारी २.३० च्या सुमारास बैसरन व्हॅलीमध्ये घडली. ही व्हॅली पहलगाम या शहरापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर आहे. बैसरन व्हॅलीमध्ये देवदाराची दाट जंगले आहेत तसेच, ही संपूर्ण व्हॅली पर्वत आणि पठारांनी वेढलेली आहे.
पहलगाम देशासह जगभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या ठिकाणाला ‘मिनी-स्वित्झर्लंड’ म्हणूनदेखील ओळखले जाते. ‘न्यूज १८’ने दिलेल्या वृत्तानुसार, बैसरन व्हॅलीची निवड त्याच्या भूभागामुळे केली गेली असावी. हा बैसरन व्हॅली परिसर खडकाळ, उंच, चिखलयुक्त आणि प्रवास करण्यास कठीण आहे. त्यामुळेच पर्यटक या ठिकाणी पोनी (घोडा)ने जाणे पसंत करतात. त्याला पोनी राईड, असेही म्हटले जाते. हा परिसर प्रवासास दुर्गम असल्यामुळेच सैन्याचा प्रतिसाद मिळण्यासही विलंब झाला आणि बचावकार्य अधिक आव्हानात्मक झाले, असेही याबाबचे स्पष्टीकरण दिले जात आहे. अधिकाऱ्यांना जखमींना तातडीने उपचारासाठी नेण्याकरिता हेलिकॉप्टर आणि स्थानिक पोनीचा वापर करावा लागला. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, परिसरात सुरक्षा दलाची कुमक कमी प्रमाणात असल्याने दहशतवाद्यांनी बैसरन व्हॅलीची निवड केली असावी.
पर्यटन क्षेत्रावर हल्ला
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम पर्यटन क्षेत्रासाठीदेखील महत्त्वाचे आहे. २०१८ पासून येथील पर्यटनात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा पर्यटनाचा हंगाम आहे. या हंगामात हजारो लोक हिरवीगार मैदाने आणि मुघल बाग पाहण्यासाठी खोऱ्यात येतात. त्यामुळे याच काळात हा हल्ला होणे योगायोग असू शकत नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक पर्यटक पहलगामला जातो. अमरनाथ गुहेकडे जाणाऱ्या दोन मार्गांपैकी एक मार्ग पहलगाममधून जातो.
ट्रेकिंगचा मार्ग असलेले बैसरन पाइन फॉरेस्टदेखील पहलगाममध्ये आहे. ‘ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ काश्मीर’चे अध्यक्ष रौफ त्रंबू यांनी सांगितले, “हा एक मोठा धक्का आहे. मागील काही काळापासून शांततापूर्ण परिस्थितीमुळे पर्यटनात वाढ झाली आहे; परंतु आता आम्हाला ग्राहकांकडून त्यांची यात्रा रद्द करण्याबाबत विनंत्या येत आहेत”. गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार जम्मू आणि काश्मीरचा पर्यटनस्थळ म्हणून विस्तार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. “गेल्या पाच वर्षांत जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटनस्थळांवर ३५० हून अधिक चित्रपट आणि वेब सीरिजचे चित्रीकरण करण्यात आले आहे, असे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी मार्चमध्ये सांगितले होते.
ते म्हणाले होते, “जेव्हा प्रदेशात शांतता असते तेव्हा सर्वांगीण विकास होतो. गेल्या पाच वर्षांत शांतता आणि विकासाच्या आमच्या प्रयत्नांमुळे जम्मू आणि काश्मीर हिंदी, प्रादेशिक व परदेशी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी एक आकर्षक ठिकाण ठरत आहे.”
एनआयएचे पथक पहलगाम येथे पोहोचले
हल्ल्यानंतर बुधवारी महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) एक पथक जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादग्रस्त पहलगाम भागात पोहोचले. मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांच्या एका गटाने भोजनालयांमध्ये थांबलेल्या, पोनी राईडचा आनंद घेणाऱ्या पुरुष पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. आता सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या तीन दहशतवाद्यांची चित्रे जारी केली आहेत.
आसिफ फौजी, सुलेमान शाह व अबू तल्हा अशी या तिघांची नावे असून, ते पाकिस्तानयेथील रहिवासी आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्रत्यक्षदर्शीने केलेल्या वर्णनाच्या मदतीने ही रेखाचित्रे तयार करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा दहशतवादी संघटनेच्या अंतर्गत काम करणाऱ्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ)ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.