थायलंडमधील ‘डेमोक्रॅट पार्टी’ हा सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो. बौद्ध बहुसंख्य असलेल्या देशात ‘सेक्स टॉइज’ना कायदेशीर मान्यता देण्याचे आश्वासन डेमोक्रॅट पक्षाने दिले आहे. सेक्स टॉइजना कायदेशीर मान्यता देऊन देशातील वेश्या व्यवसाय, लैंगिकतेशी निगडित गुन्हे आणि घटस्फोटांचे प्रमाण कमी करण्याचा आणि खेळण्यांवर कर लादून उत्पन्न वाढविण्याचा विचार या निर्णयामागे असल्याचेही पक्षाने सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण-पूर्व आशियातील थायलंडमध्ये पुढील महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या प्रचारात थायलंडमधील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाने एक अजब आश्वासन दिले आहे. कॉन्झर्व्हेटीव्ह डेमोक्रॅट पक्षाने आश्वासन दिले आहे की, त्यांचे सरकार आल्यास सेक्स टॉइजना कायदेशीर मान्यता दिली जाईल. सध्या थायलंडमध्ये सेक्स टॉइजना वैयक्तिक आनंदापेक्षाही जास्त महत्त्व दिले जात आहे. थायलंड हा लैंगिकतेच्या दृष्टिकोनातून मुक्त विचारांचा देश असून या ठिकाणी बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या अधिक आहे. तरीही थायलंड पुराणमतवादी आहे.

वेश्याव्यवसाय रोखणे, भिन्न कामप्रेरणा असलेल्या जोडप्यांच्या घटस्फोटांचे प्रमाण कमी करणे आणि लैंगिकताविषयक गुन्हे रोखण्यासाठी सेक्स टॉइज उपयोगी ठरू शकतात, अशी प्रतिक्रिया डेमोक्रॅट पक्षाच्या प्रतिनिधी रॅट्चाडा थानाडिरेक (Ratchada Thanadirek) यांनी सोमवारी दिली. तसेच सीएनएन वृत्तवाहिनीशी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, वैद्यकीय दृष्टीने पाहता डॉक्टरांनीदेखील लैंगिक सेवा विकत घेणे किंवा जोडीदाराला फसवून व्यभिचार करण्यापेक्षा सेक्स टॉइज वापरण्याला प्राधान्य दिलेले आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, लैंगिक उत्तेजना प्रदान करणाऱ्या वस्तू चोरट्या मार्गाने आयात केल्यामुळे सरकारचा महसूल बुडत आहे. त्यापेक्षा अशा वस्तूंवर कर लावून त्या अधिकृत केल्यास सरकारला करही मिळवता येईल. जपान, सिंगापूर, जर्मनी आणि चेक रिपब्लिकमध्ये ही उत्पादने अधिकृत करण्यात आली आहेत. दरम्यान थायलंडमधील अनेक भागांमध्ये अशी खेळणी अनैतिक समजली जात असली तरीही देशात अवैधपणे यांची आयात मोठ्या प्रमाणात होत असल्याकडे पक्षाने लक्ष वेधले.

थायलंडमध्ये सध्या सेक्स टॉइज विकताना आढळल्यास तीन वर्षांची शिक्षा आणि १ हजार ८०० डॉलरचा दंड ठोठावण्यात येतो. तरीही बँकॉक आणि जिल्ह्यांच्या रस्त्यांवर अशा टॉइजची खुलेआम विक्री होताना दिसते. डेमोक्रॅटच्या रॅट्चाडा म्हणाल्या की, सध्या आयात होत असलेल्या सेक्स टॉईजचा गुणात्मक दर्जा तपासला जात नाही. त्यामुळे सुरक्षेचे गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. ‘द बँकॉक पोस्ट’ या वृत्तपत्राने रॅट्चाडा यांच्या प्रतिक्रियेवरील बातमीत म्हटले आहे की, टॉईजचा दर्जा तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि थाई औद्योगिक मानांकन संस्था (TISI) यांच्याकडून सुरक्षा आणि दर्जा तपासण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

द डेमोक्रॅट पक्षाने सांगितले की, सेक्स टॉईजना मान्यता देत असताना फक्त १८ वर्षांवरील लोकच यांचा वापर करू शकतात, असा निर्णय घेण्यात येईल. तसेच नियंत्रित वस्तूंच्या यादीत या उत्पादनांचा समावेश करण्यात येईल.

डेमोक्रॅट पक्षाने ही भूमिका का घेतली?

डेमोक्रॅट पक्षाची स्थापना १९४० च्या दशकात झाली. पक्षाचे आतापर्यंत चार पंतप्रधान झाले आहेत. पक्षाचे शेवटचे पंतप्रधान अभिसित वेज्जाजीवा यांनी २००८ ते २०११ या काळात सरकारचे नेतृत्व केले. मात्र त्यानंतर पक्षाचा कठीण काळ पाहायला मिळाला. वादग्रस्त निर्णयांमुळे २०१९ मधील निवडणुकीत पक्षाची लोकप्रियता कमी झाली आणि त्याच्या परिणामी लष्करातून पुढे आलेले नेते प्रयुत छान-ओ-छा पुन्हा एकदा पंतप्रधान बनले. २०१९ च्या निवडणुकीत पक्षाची कामगिरी यथातथाच होती. आता या वर्षी होत असलेल्या निवडणुकीतदेखील पक्षाला १० टक्क्यांहून कमी जागा मिळतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सीएनएनच्या मते, डेमोक्रॅट पक्षाला पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत २० ते ३० जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या अंदाजात युनायटेड थाइ नेशन पक्ष डेमोक्रॅटच्या पुढे असल्याचे म्हटले आहे. मागच्या वर्षी पक्षाचे नाव एका सेक्स स्कँडल प्रकरणात घेतले गेले होते. पक्षाचे माजी उपाध्यक्ष प्रीन पानीतच्पकडी (Prinn Panitchpakdi) यांच्याविरोधात १४ महिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती. न्यायालयासमोर प्रीन यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.