अनिकेत साठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जवळपास तीन महिन्यांपासून वांशिक हिंसाचारात होरपळणाऱ्या मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई हे केवळ दोन समुदायच नव्हे तर, या स्थितीवर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी असणारे मणिपूर पोलीस आणि आसाम रायफल्स (केंद्रीय निमलष्करी दल) या यंत्रणा देखील परस्परांविरोधात उभ्या ठाकल्याचे चित्र आहे. या संघर्षाची परिणिती मणिपूर पोलिसांकडून आसाम रायफलच्या तुकडीविरोधात थेट गुन्हा नोंदविण्यात झाली. अस्थिर वातावरणात हिंसाचार मोडून काढण्यास सज्ज असलेल्या दलाची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न होत असल्याचे लष्कराने म्हटले आहे. यामुळे आसाम रायफल्सची भूमिका वादात सापडली आहे.

गुन्हा का दाखल झाला?

विष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्ता गोथोल मार्गावर आसाम रायफल्सने (एआर) मणिपूर पोलिसांचे वाहन रोखल्याचा आक्षेप आहे. शस्त्र अधिनियमांन्वये दाखल गुन्ह्यात संशयित कुकी अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी हे पथक निघाले होते. एआर जवानांच्या चिलखती वाहनाने पथकाला अटकाव केला. संशयित कुकी अतिरेक्याला सुरक्षितस्थळी पळून जाण्याची संधी उपलब्ध केल्याचे मणिपूर पोलिसांनी तक्रारीत म्हटले आहे. या आधारे ‘९ आसाम रायफल्स’च्या तुकडीविरुद्ध सरकारी कामात, कर्तव्यात अडथळा आणणे आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन रोखल्याने मणिपूर पोलीस आणि आसाम रायफलमध्ये वाद झाले, त्याची चित्रफीतही समाजमाध्यमांवर पसरली.

पोलिसांचे अन्य आक्षेप कोणते?

मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून मैतेई समाज आणि भाजप आमदारांकडून आसाम रायफल्सला लक्ष्य केले जात आहे. एकाच गटाला झुकते माप देऊन त्यांच्याकडून पक्षपात केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. आसाम रायफल्सने २२ व २३ जुलै या दोन दिवसांत ३०१ मुलांसह ७१८ पेक्षा जास्त म्यानमारच्या नागरिकांना आवश्यक प्रवासी दस्तावेजाशिवाय भारतात प्रवेश दिल्याचा आरोप खुद्द मणिपूर सरकारने केला. वादग्रस्त कार्यशैलीमुळे मणिपूरमधून आसाम रायफल्सला कायमस्वरूपी हटवावे, अशी मागणी राज्याने केंद्राकडे केली आहे. दुसरीकडे कुकी समुदायाचा मणिपूर पोलिसांवर राग आहे. आरामबाई तेन्गोल आणि मीतेई लीपूनसारख्या संघटनांशी संगनमत करीत त्यांनी कुकींविरोधात हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे.

वादामध्ये लष्करी भूमिका काय?

आसाम रायफल्सची चिलखती वाहने कुकी आणि मैतेईबहुल क्षेत्रामधील आघात शोषक भागात (बफर झोन) उभी केलेली होती. पोलिसांनी मैतेईंचे वर्चस्व असलेला विष्णुपूर किंवा कुकींचे वर्चस्व असलेला चुराचांदपूर या जिल्ह्यांत त्यांना परवानगी दिली नसती. कारण, संयुक्त मुख्यालयाने आघात शोषक क्षेत्रात केवळ केंद्रीय सुरक्षा दल काम करतील, हे मार्गदर्शक तत्त्व आखून दिले आहे. त्याचा दाखला लष्कराकडून दिला जातो. काही घटक वारंवार आसाम रायफल्सची भूमिका, हेतू व सचोटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात. मणिपूरमधील जमिनीवरील परिस्थिती अतिशय जटिल स्वरूपाची आहे. त्यामुळे सुरक्षा दलांमध्ये कधीकधी मतभेद होतात. हे विषय, गैरसमज तातडीने संयुक्त बैठकीतून दूर केले जातील, याकडे लष्कराकडून लक्ष दिले जाते.

आसाम रायफल्स काय आहे?

गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत सहा केंद्रीय सशस्त्र पोलीस दले आहेत. यातील एक म्हणजे आसाम रायफल्स. उत्तर-पूर्व भारतात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी लष्करासह एआरवर आहे. शिवाय हे दल भारत-मान्यमार सीमेचे रक्षण करते. आसाम रायफल्सच्या एकूण ४६ तुकड्या (बटालियन) असून ६३ हजारच्या आसपास मनुष्यबळ आहे. १८५ वर्षांचा इतिहास लाभलेले हे देशातील सर्वात जुने निमलष्करी दल आहे. अतिदुर्गम सीमावर्ती भाग व आदिवासी भागात ते दीर्घ काळापासून कार्यरत आहे. स्थानिकांचा विश्वास संपादन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे श्रेय त्यांच्याकडून घेतले जाते. मात्र ‘ईशान्येकडील नागरिकांचे मित्र’ अशी ओळख असलेल्या आसाम रायफल्सच्या कार्यशैलीवर त्याच भागातून प्रश्नचिन्ह उपस्थित होणे चिंताजनक आहे.

अन्य दले आणि एआरमधील फरक काय?

गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेले केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), इंडो-तिबेट पोलीस (आयटीबीपी), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), सशस्त्र सीमा दल (एसएसबी) हे पाच दल आणि आसाम रायफल्स (एआर) यांच्यात फरक आहे. भारतीय लष्कर व गृह मंत्रालय यांचे दुहेरी नियंत्रण असणारे आसाम रायफल्स हे एकमेव निमलष्करी दल आहे. एआरसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि वेतन गृह मंत्रालयाकडून दिले जाते. पण, यातील जवानांची तैनाती, बदली, प्रतिनियुक्ती लष्कराकडून केली जाते. एआरच्या सर्व वरिष्ठ पदांवर लष्करातील अधिकारी आहेत. पण एआरमधील कर्मचारी भरती, भत्ते व पदोन्नती, सेवानिवृत्ती धोरण गृह मंत्रालय केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या नियमावलीनुसार करते. आसाम रायफल्सवर पूर्णत: नियंत्रण मिळविण्यासाठी संरक्षण व गृह मंत्रालयातील सुप्त संघर्षही लपून राहिलेला नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why the anger about assam rifles in manipur what went wrong with this paramilitary force print exp sgk
Show comments