ब्रिटनमध्ये ४ जुलै, २०२४ रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठीचे मतदान होणार आहे. देशाची राजकीय दिशा ठरवणारी ही निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे. सध्या ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाची (Conservative Party) सत्ता असली तरीही या निवडणुकीमध्ये मजूर पक्ष (Labour Party) प्रभावी ठरणार असल्याचे मतदानपूर्व चाचण्यांच्या कलांमधून स्पष्ट झाले आहे. अर्थात, मतमोजणी झाल्याशिवाय कोणतेही दावे करणे व्यर्थ ठरेल. मात्र, भारतीय वंशाचे असलेल्या ऋषी सुनक यांच्यासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्यासाठी ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या नागरिकांची मतेही निर्णायक ठरणार आहेत. का ते पाहू.

भारतीय वंशाच्या ब्रिटिश नागरिकांची मते का महत्त्वाची?

ब्रिटनमध्ये जवळपास १.८ दशलक्ष भारतीय वंशाचे लोक राहतात. या सर्व नागरिकांची मते ऋषी सुनक यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. ब्रिटनच्या एकूण लोकसंख्येपैकी २.५ टक्के लोकसंख्या ही भारतीय वंशाच्या नागरिकांची आहे. हा आकडा फारच लक्षणीय आणि महत्त्वाचा आहे. तो निवडणुकीच्या निकालावर सहज प्रभाव टाकू शकेल, असा आहे. ब्रिटनमध्ये स्थायिक झालेले भारतीय वंशाचे लोक अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. ब्रिटनमधील भारतीय समाज उच्च स्तरावरील शिक्षण, व्यावसायिक यश व आर्थिक योगदान यांसाठी ओळखला जातो. ब्रिटनमधील भारतीय कुटुंबे भरपूर कमाई करतात. आकडेवारीनुसार २०१५ ते २०१८ दरम्यान ४२ टक्के भारतीय कुटुंबे प्रत्येक आठवड्याला एक हजार पाऊंड किंवा त्याहून अधिक कमावतात. ब्रिटनमधील एकूण लोकसंख्येच्या फक्त अडीच टक्के लोकसंख्या भारतीय वंशाच्या नागरिकांची असली तरीही ते ब्रिटनच्या जीडीपीमध्ये सहा टक्क्यांहून अधिक भर घालतात. त्यामुळे ब्रिटनच्या राजकारणामध्ये भारतीयांना महत्त्वाचे स्थान प्राप्त होताना दिसते. कारण- प्रत्येक राजकीय पक्षाला या भारतीय वंशाच्या नागरिकांची मते आपल्या बाजूने हवी आहेत.

What exactly is Bakhar?
फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवरायांची बखर; बखर म्हणजे नेमकं काय?
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Milind Narvekar, Legislative Council,
मिलिंद नार्वेकर ‘खेळ’ करणार ?
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
PM narendra modi and joe biden
Lok Sabha Election Result 2024 Updates : इंडिया आघाडीचं ठरलं; सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत, पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचं सूचक विधान!
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
UK General Election 2024 Result Rishi Sunak vs Keir Starmer
UK Election Result 2024 : ब्रिटनमध्ये सत्तांतर! भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव, मजूर पक्षाची विजयी घौडदौड!
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…

हेही वाचा : फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवरायांची बखर; बखर म्हणजे नेमकं काय?

ब्रिटनमधील भारतीय ऋषी सुनक यांच्यापासून दुरावलेत का?

२०२२ मध्ये ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदी वर्णी लागणे हा ब्रिटनमधील भारतीयांच्या दृष्टीने एक ऐतिहासिक टप्पा ठरला होता. कारण- भारतीय वंशाचे ते पहिलेच ब्रिटिश पंतप्रधान ठरले आहेत. त्यांच्या या विजयाचा आनंद सगळ्या भारतीय समाजाने साजरा केला. ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच ज्याचे पालक ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाले अशा आणि हिंदू धर्मीय व्यक्तीने एवढ्या उच्च पदाकडे भरारी घेतली, याबाबत भारतातही बरेच कौतुक व्यक्त करण्यात आले. ब्रिटनच्या राजकारणात भारतीय वंशाच्या लोकांचा आवाज वाढत असल्याचेच यातून प्रतिबिंबित झाले. मात्र, ऋषी सुनक यांच्या विजयाचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. जवळपास १८ महिन्यांपूर्वी जेव्हा ऋषी सुनक यांनी ब्रिटनचे पंतप्रधानपद स्वीकारले तेव्हा महागाईचा दर कमी करण्याचे आणि बाहेरून येणाऱ्या अवैध लोकांचे प्रमाण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. आरोग्य सुविधा सुधारणे, नवीन रोजगार निर्माण करणे हाही त्यांच्या आश्वासनांचा भाग होता. मात्र, त्यांची आश्वासने फारशी पूर्णत्वास गेली नसल्याने नाराजीची भावना आहे. ब्रिटनमध्ये महागाईचा मुद्दा या निवडणुकीमध्ये विशेष चर्चेत आहे. २०२१ पासूनच गरजेच्या वस्तूंच्या किमती उत्पन्नापेक्षा अधिक गतीने वाढत असल्याने सरकारविरोधात रोष आहे. या आर्थिक ताणामुळे ब्रिटिश भारतीय समुदायावर नकारात्मक परिणाम झाला आहे. कारण- बहुतांश भारतीय वंशाचे नागरिक छोट्या व्यवसायांचे मालक, तसेच आरोग्य सेवा व शिक्षण यांसारख्या क्षेत्रांतील व्यावसायिक आहेत.

या निवडणुकीमध्ये हिंदू समाजाची भूमिका काय असेल?

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांमध्ये अर्थातच हिंदू समाजाच्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. हा समाज ब्रिटनमधील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबाबत सजग आहे. सध्या होत असलेल्या निवडणुकीमध्ये विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक आणि मजूर पक्षाचे नेते कीर स्‍टारमर यांनी हिंदू मतांवर प्रभाव टाकण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले आहेत. हिंदू मतांना आपल्या बाजूने वळविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून दोन्हीही पक्षांच्या उमेदवारांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ऋषी सुनक यांनी नुकतेच निएसडेनमधील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिली होती. तिथे त्यांनी हिंदूंना वचन दिले की, मी समाजाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी करेन. दुसऱ्या बाजूला मजूर पक्षाचे उमेदवार स्टारमर यांनीही किंग्सबरीमधील स्वामीनारायण मंदिराला भेट दिली होती. तिथे त्यांनी भारतासोबत धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करेन, असे आश्वासन दिले होते. ब्रिटन हिंदू संघटनांनी एक ‘हिंदू जाहीरनामा’ही घोषित केला आहे. त्यामध्ये त्यांनी लोकप्रतिनिधींनी हिंदूविरोधी द्वेषाचा सामना करण्याची, तसेच हिंदू धर्मस्थळांचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : Hathras Stampede: चेंगराचेंगरी कशी टाळता येऊ शकते?

मजूर पक्ष भारतीय समाजामध्ये कशा प्रकारे करीत आहे प्रचार?

आजवर भारतीय वंशाच्या नागरिकांचा मजूर पक्षालाच बऱ्यापैकी पाठिंबा मिळत आला आहे. मजूर पक्षाचे नेते कीर स्टारमर यांनी सत्ताधारी हुजूर पक्षासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. हुजूर पक्षाच्या सत्ताकाळात महागाई टिपेला पोहोचली असल्यामुळे लोकांमध्ये असंतोष आहे. ही महागाई कमी करण्याचा दावा करीत मजूर पक्ष प्रचाराची आखणी करत आहे. उच्च शिक्षणासंदर्भातील एका संस्थेच्या प्रमुख सुप्रिया चौधरी यांनी म्हटले, “घराचे भाडे सहा ते सात वर्षांपूर्वीच्या तुलनेत १०० टक्क्यांनी वाढले आहे. जर तुम्ही स्थलांतरित असाल, तर तुम्हाला तुमचे स्वत:चे घर घेता येणे जवळपास अशक्य आहे.” ऋषी सुनक यांनी सार्वजनिक सेवा आणि महागाईचा कमी करण्यासाठी फार काही ठोस उपाय केले नसल्याचा दावा त्यांनी केला. सध्या सरकारमध्ये बदल होण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. दुसऱ्या बाजूला मजूर पक्षाने लोकांमध्ये असलेल्या याच असंतोषाचा फायदा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी ‘ही बदलाची वेळ आहे’ (It’s time for change) अशी घोषणा दिली आहे.एकंदरीत सरकारविरोधात असलेल्या जनमतावर स्वार होण्याचा प्रयत्न मजूर पक्षाकडून केला जात आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भारतीय वंशाच्या मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यात मजूर पक्षाने यश मिळवले, तर नक्कीच लक्षणीय फरक पडू शकतो. ब्रिटिश फ्युचर थिंक टँकचे संचालक सुंदर कटवाला यांनी पीटीआयशी बोलताना म्हटले, “भारतीय वंशाच्या मतदारांच्या दृष्टीने हुजूर पक्षाची सर्वांत मोठी ताकद म्हणजे खुद्द भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. मात्र, याचा या निवडणुकीमध्ये किती परिणाम होईल, हे सांगता येणे कठीण आहे.” महागाई, आरोग्य सेवा, सार्वजनिक सुविधा हे या निवडणुकीमधील सर्वांत महत्त्वाचे प्रश्न आहेत. महागाईबरोबरच इमिग्रेशनवर (वैध वा अवैध स्थलांतर) नियंत्रण हीदेखील बऱ्याच मतदारांची मागणी आहे. मात्र, त्यावर नियंत्रण मिळविण्यात सरकारला यश आलेले नाही. ऋषी सुनक मतदारांचा असंतोष कमी करून, पुन्हा सत्ता प्राप्त करण्यात यशस्वी ठरतील की मजूर पक्षाला हुजूर पक्षाला मात देण्यामध्ये यश मिळेल, हे पाहणे निर्णायक ठरेल. या सगळ्यामध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, यात शंका नाही.