अन्वय सावंत
भारतीय बुद्धिबळाचे केंद्रस्थान बनलेल्या चेन्नई येथे नुकत्याच एका विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चेन्नई ग्रँडमास्टर्स अजिंक्यपद नामक या स्पर्धेच्या आयोजनाचा अचानकच निर्णय घेण्यात आला आणि यात भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेश विजेता ठरला, तर अर्जुन एरिगेसीने उपविजेतेपद मिळवले. मात्र, ही स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली. गुकेश व एरिगेसी यांसारख्या भारतीय बुद्धिबळपटूंना पुढील वर्षीच्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्यास मदत व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याची टीका करण्यात आली. ही टीका कितपत रास्त आहे याचा आढावा.
चेन्नई ग्रँडमास्टर्स स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडण्यामागे नक्की काय कारण?
भारतीय बुद्धिबळपटूंनी गेल्या काही वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. प्रज्ञानंद, गुकेश, एरिगेसी, निहाल सरीन आणि रौनक साधवानी आदी युवा भारतीय बुद्धिबळपटूंनी आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापैकी प्रज्ञानंद यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत उपविजेता ठरला होता आणि या कामगिरीच्या जोरावर त्याने ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. त्याच प्रमाणे ‘फिडे’ ग्रँड स्वीस स्पर्धेत विजेतेपद मिळवून भारताचा अनुभवी ग्रँडमास्टर विदित गुजराथीनेही ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत स्थान मिळवले. परंतु अजूनही या स्पर्धेत दोन जागा शिल्लक आहेत. यापैकी एक जागा ही २०२३च्या ‘फिडे’ स्पर्धांच्या मालिकेत (फिडे सर्किट) सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बुद्धिबळपटूला मिळणार आहे. ही जागा गुकेश आणि एरिगेसी यांच्यापैकी एकाला मिळावी यासाठीच चेन्नई ग्रँडमास्टर्स स्पर्धेच्या आयोजनाचा घाट घातला गेला अशी टीका काही आजी-माजी बुद्धिबळपटूंनी केली आहे.
हेही वाचा >>>विश्लेषण : राखीव वनक्षेत्रातल्या प्रकल्पांत ‘असुरक्षित’ काय?
‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धा म्हणजे काय? या स्पर्धेसाठी आतापर्यंत कोण पात्र ठरले आहेत?
‘कॅन्डिडेट्स’ म्हणजेच आव्हानवीरांच्या स्पर्धेतील विजेत्या बुद्धिबळपटूला जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत सध्याच्या जगज्जेत्याला आव्हान देण्याची संधी मिळते. आठ बुद्धिबळपटूंचा समावेश असलेली ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धा पुढील वर्षी एप्रिलमध्ये कॅनडा येथे रंगणार आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेतील उपविजेता प्रज्ञानंद, इयन नेपोम्नियाशी (जागतिक लढतीतील गतउपविजेता), फॅबियानो कारूआना, निजात अबासोव, विदित आणि हिकारू नाकामुरा हे बुद्धिबळपटू खुल्या विभागातून पात्र ठरले आहेत. तसेच ‘फिडे’ स्पर्धांच्या मालिकेत सर्वोत्तम कामगिरी करणारा बुद्धिबळपटू आणि जानेवारी २०२४च्या अखेरीस जागतिक क्रमवारीतील अव्वल बुद्धिबळपटूही या स्पर्धेसाठी पात्र ठरेल.
गुकेश, एरिगेसीला ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरण्याची कितपत संधी?
चेन्नई ग्रँडमास्टर्स स्पर्धेत अखेरच्या फेरीअंती गुकेश आणि एरिगेसी यांचे समान ४.५ गुण होते. मात्र, ‘टायब्रेकर’ म्हणजेच अन्य खेळाडूंविरुद्ध केलेल्या सरस कामगिरीच्या जोरावर गुकेशने बाजी मारली. गुकेश या स्पर्धेत अपराजित राहिला, तर एरिगेसीने एक लढत गमावली. अखेर हाच दोघांमधील फरक ठरला. या स्पर्धेच्या निकालानंतर २०२३ मधील ‘फिडे’ स्पर्धांच्या मालिकेत गुकेश ८७.३६ गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला असून एरिगेसी ८१.२४ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. गुणतालिकेत फॅबियानो कारूआना ११८.६१ गुणांसह आघाडीवर आहे. मात्र, त्याने ‘कॅन्डिडेट्स’मधील आपले स्थान आधीच निश्चित केल्याने दुसऱ्या स्थानावरील खेळाडूलाही ‘कॅन्डिडेट्स’मध्ये खेळण्याची संधी मिळेल. गुकेशने चेन्नई ग्रँडमास्टर्स स्पर्धा जिंकत नेदरलँड्सच्या अनिश गिरीला (८४.३१ गुण) मागे टाकले आहे. त्यामुळे ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरण्याकरिता गुकेशने आपली दावेदारी भक्कम केली आहे. यंदाच्या ‘फिडे’ स्पर्धांच्या मालिकेतील अखेरची जागतिक जलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत उझबेकिस्तान येथे होणार आहे.
हेही वाचा >>>एक वर्षापूर्वी राजकारणातून निवृत्तीचा विचार, सामानही हैदराबादला पाठवले; मग असं काय घडलं की नरसिंहराव पंतप्रधान झाले?
चेन्नई ग्रँडमास्टर्स स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय अचानक झाला का?
‘फिडे’ मालिकेत चेन्नई ग्रँडमास्टर्स स्पर्धेचा समावेश नव्हता. मात्र, अचानकच ही स्पर्धा घेण्याचे ठरले. गुकेशला अलीकडच्या काही स्पर्धांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. काही महिन्यांपूर्वीच विश्वनाथन आनंदला मागे टाकत गुकेश क्रमवारीतील भारताचा सर्वोत्तम बुद्धिबळपटू ठरला होता. त्यामुळे प्रज्ञानंद आणि विदित यांना ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्रता मिळवण्यात यश आले असताना गुकेशने या स्पर्धेपासून वंचित राहणे हा भारतीय बुद्धिबळासाठी मोठा धक्का असता. त्यामुळे चेन्नई ग्रँडमास्टर्स स्पर्धेचे आयोजन केल्याची टीका काहींकडून करण्यात आली. मात्र, यात तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण ‘फिडे’चा उपाध्यक्ष विश्वनाथन आनंदने दिले. ‘‘स्पर्धेचे आयोजन हे नियमात बसत असल्यास त्यावर बोट उचलण्याचे कारण नाही. माझ्या मते या स्पर्धेचे आयोजन योग्य प्रकारेच झाले आहे,’’ असे आनंद म्हणाला.
एखाद्या खेळाडूच्या फायद्यासाठी स्पर्धांचे आयोजन केल्याचे यापूर्वी घडले आहे का?
याच वर्षी चीनच्या डिंग लिरेनने इयन नेपोम्नियाशीचा पराभव करताना जागतिक अजिंक्यपद लढतीचे जेतेपद मिळवले होते. मात्र, चिनी बुद्धिबळ संघटनेने खटाटोप करून काही स्पर्धांचे आयोजन केले नसते, तर मुळात तो २०२२च्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठीही पात्र ठरू शकला नसता. करोना आणि त्यामुळे चीनमध्ये करण्यात आलेली टाळेबंदी यामुळे डिंगला विश्वचषक, ‘फिडे’ ग्रांप्री आणि ‘फिडे’ ग्रँड स्वीस या पात्रता स्पर्धांना मुकावे लागले होते. मात्र, रशियाच्या सर्गे कार्याकिनवर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आल्यानंतर डिंगला ‘कॅन्डिडेट्स’मध्ये स्थान मिळवण्याची संधी निर्माण झाली. त्यासाठी मे २०२२ पर्यंत त्याने क्रमवारीतील सर्वोत्तम खेळाडू असणे गरजेचे होते. तसेच त्याने जून २०२१ ते एप्रिल २०२२ या कालावधीत पारंपरिक प्रकारातील ३० सामने खेळणे गरजेचे होते. डिंगने हा निकष पूर्ण करावा यासाठी चिनी बुद्धिबळ संघटनेने महिन्याभराच्या कालावधीत तब्बल २६ सामने आयोजित केले. याचा फायदा घेत डिंगने केवळ ‘कॅन्डिडेट्स’मध्ये स्थान मिळवले नाही, तर पुढे जाऊन त्याने जगज्जेतेपदही पटकावले.
अलीरेझा फिरूझाही…
तसेच जानेवारी २०२४च्या अखेरीस क्रमवारीतील सर्वोत्तम बुद्धिबळपटूलाही ‘कॅन्डिडेट्स’मध्ये स्थान मिळणार आहे. त्यामुळे आपले एलो गुण वाढविण्यासाठी फ्रान्सच्या अलीरेझा फिरूझानेही एका स्थानिक स्पर्धेत भाग घेतल्याचा दावा करण्यात आला. या स्पर्धेचा दर्जा फारच साधारण असल्याचे म्हटले गेले. त्यामुळे त्यालाही टीकेला सामोरे जावे लागले आहे.