मागच्या तीन महिन्यांपासून मणिपूर राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावर मंगळवार (दि. ८ ऑगस्ट) पासून चर्चा करण्यास सुरुवात झाली आहे. अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू होताना शेवटच्याक्षणी वेगळेच वक्ते बोलायला उभे राहिल्यानंतर सभागृहात सत्ताधाऱ्यांनी गोंधळ केला. कारण काँग्रेस नेते राहुल गांधी हे सर्वात आधी भाषण करणार असल्याचे ठरले होते. राहुल गांधी यांची खासदारकी सोमवारी लोकसभा सचिवालयाकडून पुन्हा बहाल करण्यात आली होती. त्यामुळे ते सर्वात पहिल्यांदा भाषण करणार असल्याचे सांगितले गेले होते. मात्र, मंगळवारी अचानक गौरव गोगोई भाषणाला उभे राहिल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले.
भारतीय जनता पक्षाने यावर तत्काळ आक्षेप घेत राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची संधी साधली. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे म्हणाले, “बहुतेक त्यांनी (राहुल गांधी) भाषणाची अद्याप तयारी केली नसेल. कदाचित ते अजून उठलेही नसतील.”
पण, अखेरच्याक्षणी राहुल गांधी यांनी भाषण करणे का टाळले? काँग्रेसने हा निर्णय का घेतला?
राहुल गांधी यांच्या जागी गोगोई यांचे भाषण
मंगळवारी सकाळी लोकसभेत अविश्वास प्रस्ताव ठरावासाठी विरोधक आणि सत्ताधारी सज्ज झाले होते. पावसाळी अधिवेशनातील यंदाचा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. २०१८ साली शेवटचा अविश्वास प्रस्ताव दाखल झाला होता. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना मोदी सरकारविरोधात दुसरा अविश्वास प्रस्ताव ठराव दाखल झाला आहे. मंगळवारी काँग्रेसकडून राहुल गांधी चर्चेची सुरुवात करतील, अशा बातम्या माध्यमांमध्ये सुरू होत्या. त्यामुळे राहुल गांधीच भाषणाला येतील अशी काँग्रेस आणि सत्ताधाऱ्यांची अटकळ होती. मात्र, शेवटच्याक्षणी गौरव गोगोई भाषणासाठी उभे राहिल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
मात्र, चर्चा सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी राहुल गांधी यांनी सभागृहातील महत्त्वाच्या नेत्यांना सांगितले की, ते चर्चा सुरू करण्यास इच्छुक नाहीत. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना हा निरोप कळविण्यात आला. राहुल गांधी यांच्या जागी आसामचे खासदार गौरव गोगोई भाषण करतील, अशी माहिती देण्यात आली. राहुल गांधी यांनी मंगळवारी माघार घेतल्यामुळे सत्ताधारी बाकावरील सदस्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला, ज्यावरून त्यांनी राहुल गांधी यांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही.
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, राहुल गांधी यांचे नाव प्रमुख वक्त्यांमधून शेवटच्या क्षणी का हटविण्यात आले? आम्ही त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आतूर झालो आहोत, काय झाले सर? असा प्रश्न त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे पाहून विरोधकांसाठी विचारला. जोशी पुढे म्हणाले की, लोकसभा अध्यक्षांकडे ११.५५ ला पत्र देऊन राहुल गांधी भाषण करणार असल्याचे सांगितले गेले होते. मात्र, अखेरच्या क्षणी असे काय झाले की गांधी यांच्या जागी गोगोई भाषणासाठी आले, हे जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे.
जोशी यांच्या वक्तव्यानंतर गोगोई यांनीही आपली नाराजी प्रकट केली. पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष यांची दालनात काय चर्चा होते, याची माहिती विरोधकांनी कधी मागितली आहे का? गोगोई यांच्या विधानानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीव्र आक्षेप घेत, गोगोई गंभीर आरोप करत असून त्यांनी त्यावर स्पष्टीकरण द्यावे असे सांगितले. अमित शाह यांनी जबाब मागताच सत्ताधारी बाकांवरून गोगोई यांच्या विरोधात गोंधळ सुरू झाला. यानंतर आपली बाजू मांडताना गोगोई म्हणाले की, अध्यक्षांच्या दालनात बैठकीमध्ये काय चर्चा होते हे बाहेर प्रसिद्ध करणे योग्य नाही.
आसामचे खासदार गौरव गोगोई यांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, “हा अविश्वास प्रस्ताव दाखल करणे ही आमची अगतिकता आहे. आमच्याकडे संख्याबळ नाही, पण संख्याबळ नाही म्हणून आमच्या मणिपूरमधील लोकांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही ही चर्चा करत आहोत. मणिपूरच्या हिंसाचारावर बोलण्यासाठी त्यांनी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) ८० दिवस का लावले? आणि तेही जेव्हा बोलले तेव्हा फक्त ३० सेकंदच बोलले. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, याचे साधे आवाहनही त्यांनी केले नाही. मंत्री सांगत आहेत की ते संवाद साधतील. पण, पंतप्रधानांच्या शब्दांमध्ये जी ताकद आहे, त्याच्याशी मंत्र्यांच्या आवाजाची तुलनाच होऊ शकत नाही.”
ऐनवेळी बदल का करण्यात आले?
राहुल गांधी यांना पहिले भाषण करण्यापासून कुणी रोखले? किंवा त्यांनी स्वतःहून माघार घेतली असेल तर का घेतली? याबाबत स्वतः राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्षच सांगू शकतो. राजकीय तज्ज्ञांनी मात्र वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. काँग्रेसच्या एका खासदाराने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, गौरव गोगोई हे ईशान्य भारतातील एका राज्याचे प्रतिनिधित्व करतात. तसेच ते मणिपूरलाही जाऊन आलेले आहेत. त्यामुळे त्यांनीच चर्चेची तयारी करणे योग्य राहील. त्याशिवाय अविश्वास प्रस्तावाची नोटीस त्यांनीच दिली होती आणि या चर्चेसाठी ते कधीही तयार होते. तसेच राहुल गांधी आदल्या दिवशीच लोकसभेत परतले होते.
आणखी एका नेत्याने सांगितले की, या निर्णयामुळे भाजपा बुचकळ्यात पडला. राहुल गांधी यांच्या भाषणात व्यत्यय आणण्यासाठी सत्ताधारी बाकावरून जोरदार प्रयत्न होतील, याची आम्हाला जाणीव होती. जेव्हा गोगोई यांनी भाषणाची सुरुवात केली, तेव्हा सत्ताधारी बाकांवरून फारसा व्यत्यय आणला गेला नाही.
आज काय झाले?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलत असताना मोदी सरकारवर हल्लाबोल केला. “मोदी सरकारने मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या केली”, असे राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले. राहुल गांधी हे गुरुवारी १० ऑगस्ट रोजी बोलतील, अशी अटकळ बांधली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तरही येणार असल्यामुळे राहुल गांधी यांचे भाषण शेवटच्या दिवशी होईल की नाही, यावर प्रश्नचिन्ह होते. राहुल गांधी यांच्यानंतर सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही भाषण लोकसभेत झाले.