संदीप नलावडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर युरोपातील स्वीडन या देशाची राजधानी स्टॉकहोममध्ये गेल्या आठवड्यात इस्लाम धर्मियांचा पवित्र ग्रंथ कुराणाच्या प्रती जाळण्यात आल्या. त्यानंतर मुस्लीम राष्ट्रांमध्ये याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून स्वीडनमध्ये अशा प्रकारे धार्मिक हिंसाचाराला प्रोत्साहन दिले जात असल्याची संतप्त टीका होऊ लागली आहे. स्वीडनमधील या घटनेविषयी…

स्वीडनमध्ये नेमके काय घडले?

स्टॉकहोममध्ये इराणच्या दूतावासाबाहेर आंदोलन करण्याची परवानगी काही जणांनी स्थानिक पोलीस व प्रशासनाकडे मागितली होती. त्यानुसार या आंदोलकांनी तिथे आंदोलन केले. मात्र या आंदोलनात इस्लामी धर्मग्रंथ कुराण आणि इराणचा राष्ट्रध्वज यांचे दहन करण्यात आले. आंदोलन करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडे रीतसर अर्ज करताना कुराणाचे दहन करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते, असा आरोप करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाने हा आरोप फेटाळला आहे. विशेष म्हणजे कुराणाचे दहन करणाऱ्यांपैकी एका व्यक्तीने जूनमध्येही कुराणाची विटंबना केली होती. बकरी ईदच्या दिवशी या व्यक्तीने एका मशिदीसमाेर कुराणाची प्रत फाडून जाळली होती. त्यावेळी तुर्कस्तानसह अनेक मुस्लीम राष्ट्रांनी संताप व्यक्त करून तीव्र निषेध व्यक्त केला होता. काही दिवसांपूर्वी स्वीडनमध्ये राहणाऱ्या एका इराकी व्यक्तीने स्टॉकहोमध्ये इराकच्या दूतावासाबाहेर दोन इस्लामिक धर्मगुरूंना लाथ मारली. विशेष म्हणजे स्वीडनच्या या आंदोलकांकडून केल्या जाणाऱ्या या आंदोलनाला स्थानिक पोलीस व प्रशासनाचा पाठिंबा असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मुस्लीम राष्ट्रांच्या यासंबंधी प्रतिक्रिया काय?

स्वीडनमधील या कृत्यानंतर मुस्लीम राष्ट्रांत संतापाची लाट उसळली. इराकची राजधानी बगदाद येथे संतप्त जमावाने स्वीडिश दूतावासावर हल्ला केला. तिथे असलेल्या साहित्यांची मोडतोड करून काही ठिकाणी आगी लावण्यात आल्या. इराकमधील शिया धर्मगुरू मुक्तदा अल-सद्र यांच्या समर्थकांनी हे आंदोलन केले आहे. इराक सरकारनेही स्वीडनच्या राजदूताची हकालपट्टी केली. इराकचे पंतप्रधान शिया अल-सुदानी यांनी स्वीडनच्या सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करत स्टॉकहोम येथील इराकी राजदूतालाही परत मायदेशी बोलावले. जून महिन्यात झालेल्या घटनेनंतर तुर्कस्ताननेही स्वीडनविरोधात तीव्र संताप व्यक्त केला होता. ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली इस्लामविरोधात द्वेष पसरवत कुराण जाळण्याची परवानगी देणे आश्चर्यकारक आहे,’ असे तुर्की सरकारने म्हटले आहे. सौदी अरेबिया, पाकिस्तान, कतार, येमेन या राष्ट्रांनीही स्वीडनचा तीव्र शब्दांत निषेध केला.

स्वीडनमध्ये धर्मग्रंथाची विटंबना करण्यासंबंधी कायदा आहे का?

स्वीडनमध्ये कुराण किंवा इतर धार्मिक ग्रंथ जाळणे किंवा त्यांची विटंबना करण्यास प्रतिबंध करणारा कोणताही कायदा नाही. अनेक पाश्चात्त्य देशांप्रमाणे स्वीडनमध्येही ईशनिंदेसंबंधी (ब्लास्फमी) कोणतेही कायदे नाहीत. मात्र पूर्वी स्वीडनमध्ये अशासंबंधी कायदे होते. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात स्वीडनमध्ये ईशनिंदा हा गंभीर गुन्हा मानला जात होता. ज्याची शिक्षा मृत्युदंड होती. मात्र स्वीडन अधिकाधिक धर्मनिरपेक्ष बनत गेल्याने ईशनिंदा कायदे हळूहळू शिथिल करण्यात आले. १९७० मध्ये असलेला अखेरचा कायदा राज्यघटनेतून काढण्यात आला.

स्वीडिश अधिकारी अशी कृत्ये थांबवू शकतात का?

अनेक मुस्लीम देशांनी स्वीडिश सरकारला आवाहन केले आहे की त्यांनी कुराणाचे दहन करण्यापासून आंदोलकांना रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. मात्र स्वीडिश सरकारचे म्हणणे आहे की, आंदोलन, निदर्शने किंवा सार्वजनिक मेळावे यांना परवानगी देण्याचे काम पोलिसांचे आहे, सरकारचे नाही. स्वीडनच्या घटनेनुसार भाषण स्वातंत्र्य संरक्षित आहे. सार्वजनिक सुरक्षेला धोका उत्पन्न करणारी आंदोलने किंवा सार्वजनिक मेळावे यांना परवानगी नाकारण्यासाठी पोलिसांना विशिष्ट कारणे दाखवणे आवश्यक असते. स्टॉकहोम पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये कुराण जाळण्याच्या निषेधाचे दोन अर्ज नाकारले होते. अशा कृत्यांमुळे स्वीडनला दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढू शकतो, असे पोलिसांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र स्थानिक न्यायालयाने पोलिसांचा हा निर्णय रद्द केला. सार्वजनिक मेळाव्यावर बंदी घालण्यासाठी पोलिसांना अधिक ठोस कारणे देण्याची आवश्यकता आहे, असे न्यायालयाने त्यावेळी सांगितले.

कुराण दहनावर ‘द्वेषयुक्त भाषण’ कायद्याखाली प्रतिबंध करता येईल?

स्वीडनचा द्वेषयुक्त भाषण कायदा वंश, धर्म, लैंगिक अभिमुखता किंवा लिंग ओळख यावर आधारित आहे. यासंबंधी जर द्वेषयुक्त भाषण करून जनतेला भडकावणे हा गुन्हा मानला जातो. त्यामुळे कुराण जाळणे हे मुस्लिमांविरोधात चिथावणे देणे असल्याने द्वेषयुक्त भाषण कायद्यानुसार कारवाई व्हावी, असा एक मतप्रवाह आहे. अशी कृत्ये धर्माचे पालन करणाऱ्यांपेक्षा इस्लाम धर्माला लक्ष्य करत असल्याचे मत स्वीडनमध्ये काहींनी व्यक्त केले आहे. स्वीडिश पोलिसांनी जूनमध्ये स्टॉकहोममधील मशिदीबाहेर कुराण जाळणाऱ्या व्यक्तीविरुद्ध प्राथमिक द्वेषाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर औपचारिकपणे आरोप लावायचे की नाही हे आता न्यायसंस्थेवर अवलंबून आहे.

जगातील इतर देशांमध्ये ईशनिंदेसंबंधीचे कायदे काय आहेत?

जगातील अनेक देशांमध्ये ईशनिंदा हा गुन्हा मानला जातो. ‘प्यू रिसर्च सेंटर’ने अभ्यास केलेल्या १९८ पैकी ७९ देशांमध्ये ईशनिंदा गुन्हा मानला जातो. या देशांमध्ये देव किंवा पवित्र मानल्या जाणाऱ्या गोष्टींचा तिरस्कार करणारे भाषण किंवा कृती कायद्यानुसार गुन्हा मानली जाते. अफगाणिस्तान, ब्रुनेई, इराण, मॉरिटानिया, नायजेरिया, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया या सात देशांमध्ये ईशनिंदा केल्यास मृत्युदंडाची शिक्षा आहे. पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेमध्ये १८ देशांमध्ये ईशनिंदेला गुन्हेगार ठरवणारे कायदे आहेत. मात्र प्रत्येक प्रकरणांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा नाही. इराकमध्ये सार्वजनिकपणे एखाद्या प्रतीकाचा किंवा धार्मिक व्यक्तीचा अवमान करणे गुन्हा असून त्यास तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा आहेत. लेबेनॉनमध्येही धार्मिक अवमान करणाऱ्यास तीन वर्षांची शिक्षा दिली जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why the controversy over the quran issue in sweden what does the law say print exp scj