दक्षिण अटलांटिक महासागरात असणाऱ्या साऊथ सँडविच बेटांजवळ खोल समुद्रात जगातील सर्वांत दुर्मीळ जीवांपैकी असणारा एक जीव सापडला आहे. त्याने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले आहे. अलीकडेच ‘फाल्कोर’ नावाच्या संशोधन जहाजावरील सागरी शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांच्या एका गटाने एका प्रचंड स्क्विडचा त्याच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर येतानाचा पहिला व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.

दक्षिण अटलांटिक महासागराच्या पृष्ठभागाखाली हजारो फूट खोलवरचा हा व्हिडीओ आहे. संपूर्ण जगासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. या प्रजातीची पहिल्यांदा ओळख पटल्याच्या तब्बल १०० वर्षांनंतर तिचा फोटो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ‘कॉलॉसल स्क्विड’? म्हणजे नक्की काय? या दुर्मीळ जीवाचा शोध लागणे किती महत्त्वाचे होते? त्याचा शास्त्रज्ञांना नक्की काय फायदा होणार? हे जाणून घेऊ.

‘कॉलॉसल स्क्विड’चा शोध

कॉलॉसल स्क्विड (मेसोनीकोटेउथिस हॅमिल्टोनी) हा पृथ्वीवरील सर्वांत मोठा आणि सर्वांत दुर्मीळ प्राण्यांपैकी एक आहे. अंटार्क्टिकाजवळील दक्षिण महासागराच्या बर्फाळ प्रदेशात आढळणारा, मऊ शरीर असणारा हा प्राणी काही प्रमाणात ऑक्टोपससारखा आहे; परंतु त्याची रुंदी आणि लांबी खूपच मोठी आहे. २००० फूट खोल समुद्रात शास्त्रज्ञांना हा जिवंत स्क्विड सापडला. त्यानंतर त्याची माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे. दक्षिण सँडविच बेटांजवळ घेतलेले हे फुटेज १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आले. तज्ज्ञ सांगतात की, या कॉलॉसल स्क्विडची लांबी सात मीटर (सुमारे २३ फूट) आहे आणि त्याचे वजन ५०० किलोग्रॅम असावे, असा अंदाज आहे.

जेव्हा हे प्राणी लहान असतात तेव्हा ते जवळजवळ पारदर्शक असतात. त्यामुळे खोल समुद्रात ते काचेसारखे दिसतात. जसजसा त्यांचा वयानुसार आकार वाढत जातो, तसतसे त्यांचे शारीरिक स्वरूपही नाट्यमयरीत्या बदलते. त्यांचे शरीर गडद लाल किंवा जांभळ्या रंगाचे होऊन त्यांना हात प्राप्त होतात. या प्राण्याला इतरांपेक्षा वेगळे ठरवणारी गोष्ट म्हणजे त्यांचे तीक्ष्ण व मोठ्या आकाराचे डोळे. तसे डोळे इतर कोणत्याही स्क्विड प्रजातीकडे नसतात. कोणत्याही प्राण्यापेक्षा सर्वांत मोठे डोळे असल्याने असे मानले जाते की, त्या डोळ्यांमुळे समुद्राच्या अंधारमय खोलीतही शिकार आणि भक्षक शोधण्यास त्यांना मदत होते.

‘कॉलॉसल स्क्विड’ला रहस्य का मानले जाते?

कॉलॉसल स्क्विडला ओळखणे म्हणजे विशेषतः त्याला कॅमेऱ्यामध्ये टिपणे जवळजवळ अशक्य झाले आहे. त्यांच्या मोठ्या, अतिसंवेदनशील डोळ्यांमुळे समुद्रात त्यांचा शोध घेणे अवघड होते. ते प्रकाश आणि आवाजावर आधारित संशोधन उपकरणांपासून दूर राहतात, असे ऑकलंड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. कॅट बोलस्टॅड यांनी ‘एनपीआर’ला सांगितले. त्यामुळे संशोधकांना ‘कॉलॉसल स्क्विड’चा आहार, त्याचे आयुर्मान आणि पुनरुत्पादक वैशिष्ट्ये यांबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. आतापर्यंत या प्राण्याबद्दलची माहिती व्हेल आणि समुद्री पक्ष्यांच्या पोटात आढळणाऱ्या मृत नमुन्यांवरून मिळाली आहे. सेफॅलोपॉडचा शोध पहिल्यांदा १९२५ मध्ये लागला होता.

त्यावेळी शास्त्रज्ञांना स्पर्म व्हेलच्या पोटात दोन स्क्विडच्या हातांचे तुकडे सापडले होते. मात्र आता या दुर्मीळ प्राण्याला जिवंत पाहण्याची आणि त्याच्याविषयी अधिक जाणून घेण्याची संधी संशोधकांना मिळाली आहे. दक्षिण महासागराच्या खोलीत म्हणजेच त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानात ‘कॉलॉसल स्क्विड’ला टिपण्यात आले आहे. हे महाकाय ‘कॉलॉसल स्क्विड’समुद्राच्या पृष्ठभागाखाली ६०० ते ३,००० फूट खोलवरच्या थंड पाण्यातदेखील राहतात. ते खोल समुद्रातील मासे आणि स्क्विडच्या इतर प्रजाती खाण्यासाठी ओळखले जातात.

त्यांच्या मोठ्या आकाराचे कारण काय?

संशोधकांचे असे सांगणे आहे की, त्यांचा आकार सात मीटर किंवा २३ फूट लांब असू शकतो आणि त्यांचे वजन ५०० किलोग्रॅमपर्यंत असू शकते. मोठ्या आकाराचे स्क्विड १३ मीटर किंवा ४३ फुटांपर्यंत वाढू शकतात. सामान्यतः त्यांचे वजन २७५ किलोग्रॅमपर्यंत असते, असे मानले जाते. संग्रहालयाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, “‘कॉलॉसल स्क्विड’चे शरीर मोठे असते; परंतु शरीराच्या तुलनेने त्यांना लहान हात असतात,” असे लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे क्युरेटर जॉन अबलेट म्हणाले.

संशोधकांचे म्हणणे आहे की, त्यांचा आकार अवाढव्य असल्यामुळे त्यांची शिकार करू शकणाऱ्या प्रजातींची संख्या कमी आहे. त्यांची एकदा पूर्ण वाढ झाली की, त्यांची शिकार करू शकणारा एकमेव प्राणी म्हणजे स्पर्म व्हेल. हा जगातील सर्वांत मोठा दात असलेला शिकारी आहे. काही तज्ज्ञांचे असे सांगणे आहे की, स्क्विडचे मोठे डोळे बास्केटबॉलच्या आकाराचे असतात. हे डोळे त्यांना मुख्य शत्रू शोधण्यास मदत करण्यास उपयुक्त ठरतात. अनेक स्क्विड प्रजातींप्रमाणे स्क्विडला प्रौढ होण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात. “बहुतेक स्क्विड तरुणपणीच मरतात,” असे अबलेट यांनी सांगितले. संशोधकांचा असा विश्वास आहे की, महाकाय स्क्विड दोन ते १२ वर्षांदरम्यान जगू शकतात. स्क्विडच्या सरासरी आयुष्यमानाबद्दल कोणाचेही एकमत नाही.

या दुर्मीळ प्राण्याचा शोध किती महत्त्वाचा?

या भव्य-दिव्य स्क्विडचे व्हिडीओ फुटेज मिळाल्याने या प्राण्याभोवतीची अनेक रहस्ये उलगडण्यास मदत होणार आहे. हे प्राणी त्यांचा वेळ कुठे घालवतात आणि तेअंडी घालण्यासाठी कुठवर प्रवास करतात आणि ते किती काळ जगतात, ही सर्व रहस्ये उलगडू शकतात. या मोहिमेचा भाग नसलेले स्वतंत्र संशोधक डॉ. आरोन इव्हान्स यांनी ‘सीएनएन’शी बोलताना सांगितले, “या दुर्मीळ आणि रहस्यमयी प्राण्याचा शोध खरोखरच रोमांचक आहे. कारण- यामुळे आम्हाला अतिशय रहस्यमय प्राण्याच्या जीवनाविषयीचे कोडे सोडवण्याची संधी मिळणार आहे.” संशोधकांनी असेही स्पष्ट केले की,क्वचितच दिसणाऱ्या या स्क्विडमुळे खोल समुद्रातील खाणकामासारख्या मानवी प्रकल्पांबद्दल निर्णय घेण्यास मदत होईल, ज्यामुळे थेट सागरी जीवनाला हानी पोहोचते.