२१ नोव्हेंबर १९५६ सालची संध्याकाळ होती. सकाळपासूनच काहीतरी अघटित घडणार याची चाहूल अनेकांना लागली होती. परंतु आता काहीही झाले तरी मागे हटून चालणारे नव्हतेच. आज फ्लोरा फाऊंटनमधून पाण्याचे कारंजे नाही तर रक्ताच्या धारा वाहणार होत्या… मुंबादेवीच्या तलवारीने रक्त चाखलेल्या मुंबारक राक्षसाचा वेढा परत एकदा मुंबईला पडणार होता… आणि घडायचे तेच झाले! राज्यपुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी सामान्यांचा विशाल मोर्चा निघणार होता व त्याचा शेवट फ्लोरा फाऊंटनच्या आवारात होणार होता. म्हणूनच सरकारकडून जमावबंदी आदेश जारी करण्यात आला होता. या जमावबंदीला न जुमानता प्रचंड संख्येने मराठीजन फ्लोरा फाऊंटेनच्या परिसरात जमा झाले. मोर्च्याला हुसकावून लावण्यात पोलिसांना अपयश येत होते. आपल्याच लोकांवर लाठीहल्ला करण्याचे आणि नंतर गोळीबाराचे आदेश पोलिसांना देण्यात आले. शांततापूर्वक आंदोलन करणाऱ्या आंदोलनकांवर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे हे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दिले होते. गोळ्या घातल्या जात होत्या, रक्ताच्या नद्या वाहत होत्या. गोळ्या संपत आल्या पण झेलणारे संपत नव्हते. हे केवळ मुंबईतच घडले असे नाही; तर पुणे, नाशिक, बेळगाव, निपाणी या भागातही घडत होते. विशेष म्हणजे यात लहान मुलांचाही समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : विश्लेषण : Defamation Law आहे तरी काय? अब्रुनुकसानी नेमकी केव्हा होते?

२१ नोव्हेंबर १९५६ सालच्या त्या संध्याकाळी मुंबईत आपल्याच ३७ लोकांचे बळी घेण्यात सरकारला यश आले होते. ही एक घटना असली तरी संपूर्ण संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात १०७ हून अधिक महाराष्ट्रीयांनी बलिदान दिले होते, हे नव्याने उघड झाले आहे. १९२० पासून ते १९६० पर्यंत चाललेल्या या दीर्घ लढयानंतर १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली. म्हणूनच त्या हुतात्म्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ फ्लोरा फाऊंटन परिसरात १९६३ साली हुतात्मा स्मारकाची संयुक्त महाराष्ट्र समितीकडून स्थापना करण्यात आली. वास्तविक हुतात्मा चौकात आज आपण दोन स्मारके पाहू शकतो. एक १९६३ साली स्थापन करण्यात आले होते तर दुसरे १९८५ महाराष्ट्रदिनाच्या रौप्यमहोत्सव वर्षात स्थापन करण्यात आले. १९८५ साली स्थापन करण्यात आलेल्या स्मारकावर महाराष्ट्राचा नकाशा व त्या बलिदानकर्त्यांची नावे आपण पाहू शकतो.

आणखी वाचा : विश्लेषण: पछाडलेल्या वास्तू, भीती, आणि हेरिटेज वॉक! का? कशासाठी?

सोविएत शैली म्हणजे काय?

दुसऱ्या महायुद्धानंतर १९३२ ते १९८८ या कालावधीत साम्यवादी देशांमध्ये जी अधिकृत कलाशैली स्वीकारली गेली ती म्हणजे समाजवादी वास्तववाद (Socialist realism). ही शैली सोविएत युनियनमध्ये विकसित झाली होती. या शैलीत सामान्य लोकांच्या प्रश्नांवर साम्यवादी मूल्यांच्या आधारे प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो. असे असले तरी या शैलीत शास्त्रीय शिल्प-चित्र कलेच्या नियमांचा कुठेही भंग झालेला आढळत नाही. सामाजिक चिंतेचे विषय वास्तववादीपणे हाताळणे हे या कला शैलीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. ही कलाशैली विकसित होण्यासाठी हजारो कलाकारांचा हातभार लागला होता. वास्तववादी घटनांचे चित्रण हा मुख्य उद्देश असला तरी प्रारंभिक काळात एकच राजकीय पार्श्वभूमी या कलेच्या उदयासाठी कारणीभूत नव्हती. २५ ऑक्टोबर १९१७ रोजी बोल्शेविकांनी रशियाचा ताबा घेतल्यानंतर, कलात्मक शैलींमध्ये लक्षणीय बदल झाल्याचे लक्षात येते.

कामगार हा केंद्रबिंदू

कामगार हा कलेचा केंद्रबिंदू ठरला. बोल्शेविक हा व्लादिमीर लेनिन यांनी स्थापन केलेला एक अत्यंत डावा, क्रांतिकारी मार्क्सवादी गट होता. व्लादिमीर लेनिन हे सोव्हिएत संघाच्या पहिल्या सरकारचे अध्यक्ष होते. ते स्वतःला रशियाच्या क्रांतिकारी श्रमदान करणाऱ्या वर्गाचे नेते मानत होते. त्यांच्या काळात कलाशैलीत प्रामुख्याने शेतकरी-श्रमिक वर्गाच्या आंदोलन तसेच प्रश्न दर्शविण्यावर विशेष भर देण्यात येत होता. मजूर, शेतकरी, सामान्य नोकरदार वर्ग यांच्या हातात मशाल, बंदूक, झेंडा दाखविणे हे या शैलीचे सांकेतिक वैशिष्ट्य होय.

आणखी वाचा : विश्लेषण: चर्चने लिपस्टिकच्या वापरावर बंदी का घातली होती? जाणून घ्या

हुतात्मा स्मारक

प्रसिद्ध शिल्पकार हरीश तालीम यांनी १९६३ साली पहिले कांस्य स्मारक साकारले. या कांस्य शिल्पकृतीत सामान्य कामगार व शेतकरी हातात एकत्रितरित्या क्रांतीची मशाल उंचावत उभे आहेत असे दर्शविण्यात आले आहे. या शिल्पाचा तत्कालीन खर्च ४७,०००/- रुपये इतका आला होता. हे शिल्प १६ फूट उंच पादपीठावर उभारण्यात आले आहे. सभोवतालच्या ब्रिटिशकालीन वास्तूंमध्ये हे शिल्प आपले वेगळेपण सिद्ध करत असले, तरी त्या शिल्पाच्या जागेमुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडले. ब्रिटिशकालीन वास्तू या गोथिक शैलीत आहेत तर हे स्मारक सोविएत शैलीत आहे. त्यामुळे सभोवतालच्या गोथिक शैलीच्या सौंदर्यात या स्मारकामुळे बाधा येत आहे, असे सांगून आजवर अनेकदा हे स्मारक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हुतात्मा स्मारक सोव्हिएत शैलीतच का ?

संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये अनेक पक्ष तत्कालीन काँग्रेस सरकारच्या विरोधात मुंबईसह मराठी राज्य निर्मितीसाठी एकत्र आले होते. यात शेतकरी आणि कामगार पक्ष (PWP),प्रजा समाजवादी पार्टी (PSP),भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI)आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)यांचा समावेश होता. एकूणच संयुक्त महाराष्ट्र समितीत बहुसंख्य कम्युनिस्ट सदस्यांचा समावेश असल्याने हे आणि तत्कालीन कालखंडावर कम्युनिस्ट प्रभाव अधिक होता त्यामुळे हे स्मारक सोविएत शैलीत साकारण्यात आलेले दिसते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why the martyr memorial hutatma smarak chowk in soviet socialist realist style in mumbai svs