अमोल परांजपे
एके काळी सोव्हिएत रशियाचा भाग असलेले अझरबैजान आणि आर्मेनिया हे भिन्नवंशीय नागरिकांचे दोन देश गेल्या अनेक वर्षांपासून परस्परांशी कायमच युद्धजन्य स्थितीत आहेत. यापूर्वी दोन वेळा त्यांच्यात प्रत्यक्ष युद्धही झाले आणि त्यात लाखो लोक मारले गेले. या युद्धांना कारणीभूत ठरलेला नागोर्नो-कारबाख हा प्रदेश सध्या पुन्हा चर्चेत आला आहे, तो तिथल्या सुमारे एक लाख २० हजार नागरिकांनी सुरू केलेल्या सामूहिक स्थलांतरामुळे… एवढ्या नागरिकांना आपली राहती घरे का सोडावीशी वाटली, जिवाच्या भीतीने हे लोक स्थलांतर का करत आहेत, याचा हा आढावा…
नागोर्नो-कारबाख वादग्रस्त का?
१९२० साली रशियातील तत्कालीन राज्यकर्त्यांनी कॉकेशस प्रांतातील मुस्लीमबहुल अझरबैजान आणि ख्रिश्चनबहुल आर्मेनिया सोव्हिएत रशियाला जोडले. १९९१मध्ये सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर इतर अनेक लहान देशांप्रमाणेच आर्मेनिया आणि अझरबैजान हे देश स्वतंत्र झाले. या दोघांच्या सीमेवर असलेला नागोर्नो-कारबाख सोव्हिएत काळापासून अझरबैजानमध्येच असल्यामुळे अधिकृतरीत्या त्या देशात गणला गेला. या भागात आर्मेनियनवंशियांचे प्राबल्य असल्यामुळे त्यांनी अझरबैजानची राजवट कधीच जुमानली नाही. १९८८ ते १९९४ या काळात झालेल्या युद्धात अझरबैजानच्या लष्कराला येथून माघार घ्यावी लागली. तेव्हापासून तांत्रिकदृष्ट्या अझरबैजानमध्ये असलेल्या या भागावर आर्मेनियन बंडखोरांचे राज्य होते. त्याला ‘नागोर्नो-कारबाख स्वायत्त प्रांत’ असे संबोधले जात होते.
आणखी वाचा-मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार का सुरू झाला? शांतता प्रस्थापित करण्याचे केंद्रापुढे मोठे आव्हान?
नागोर्नो-कारबाखची कोंडी कशी झाली?
२०२० मध्ये झालेल्या ४४ दिवसांच्या युद्धात अझरबैजानने आजूबाजूचे सात जिल्हे पुन्हा ताब्यात घेतले आणि नागोर्नो-कारबाखचा एकतृतीयांश भाग परत घेतला. त्यानंतर अझरबैजान नागोर्नो-कारबाखवर दबाव वाढवत नेला. आर्मेनिया आणि नागोर्नो-कारबाखला जोडणाऱ्या ‘लचिन कॉरिडॉर’ची नाकाबंदी केल्यामुळे या भागात अन्नधान्य आणि औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. २००० रशियन ‘शांतिसैनिकां’नी हा रस्ता मोकळा ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांना त्यात फारसे यश आले नाही. युक्रेन युद्धात गुंतलेल्या रशियाला नागोर्नो-कारबाखमध्ये फारशी मदत करणे अशक्यही होत आहे. त्यामुळेच रशियाच्या मध्यस्थीने २० सप्टेंबर रोजी अझरबैजान आणि नागोर्नो-कारबाखमधील बंडखोरांमध्ये शस्त्रसंधी झाला.
शस्त्रसंधीच्या अटी काय आहेत?
सर्वात पहिली आणि महत्त्वाची अट म्हणजे नागोर्नो-कारबाखच्या सैन्याने शस्त्रे खाली ठेवायची. एका अर्थी बंडखोर आर्मेनियन-आर्मेनिया आणि रशिया यांनी अझरबैजानपुढे गुडघे टेकले आहेत. कारण एकदा बंडखोरांची शस्त्रे म्यान झाली की त्यानंतर नागोर्नो-कारबाखमधील आर्मेनियन वंशियांचे काय करायचे, याची चर्चा सुरू होणार होती. यामुळे अझरबैजानची उद्दिष्टपूर्ती जवळ आल्याचे दिसते. मात्र आता नागोर्नो-कारबाखमधील आर्मेनियन लोकांना वेगळीच भीती सतावत आहे. त्यामुळेच या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घरेदारे सोडून आर्मेनियाकडे धाव घेतली आहे.
आणखी वाचा-गुजरातमध्ये कोनोकार्पस झाड लावण्यावर बंदी, अन्य राज्यांत कोणकोणत्या झाडांवर बंदी?
नागरिकांचे स्थलांतर का होत आहे?
एकदा नागोर्नो-कारबाख प्रांत पूर्णपणे ताब्यात आला की तेथील आर्मेनियन वंशियांच्या हत्या केल्या जातील. या भागातून आर्मेनियन वंश नष्ट करण्याचा प्रयत्न (एथनिक क्लिंझिंग) केला जाईल अशी भीती त्यांना सतावत आहे. त्यामुळे सुमारे १ लाख २० हजार नागरिक पिढ्यानपिढ्या राहात असलेली आपली गावे सोडून देशोधडीला लागले आहेत. रशियाच्या मदतीने या नागरिकांना आर्मेनियामध्ये नेले जात असून आर्मेनियाच्या सरकारनेही या विस्थापितांच्या स्वागताची भूमिका घेतली आहे. मात्र खरा धोका हा हे स्थलांतर पूर्ण झाल्यानंतर आहे. कारण एकदा नागोर्नो-कारबाखमधून बहुतांश आर्मेनियन नागरिक बाहेर पडले की अझरबैजान आणि आर्मेनियामध्ये युद्धाची ठिणगी पडू शकते.
युद्ध झाल्यास कुणाची ताकद किती?
‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज’च्या अहवालानुसार अझरबैजानकडे एकूण ६४ हजर सशस्त्र सेना आणि ३ लाख राखीव सैन्य आहे. तर आर्मेनियाकडे सुमारे ४३ हजार सैन्यदल व २ लाख १० हजार राखीव सैनिक आहेत. त्यांच्या जोडीला कारबाखमधील ५ हजार बंडखोर सैन्यदल असले तरी त्याची एकूण ताकद अझरबैजानपेक्षा कमी आहे. रशियाची ताकद अझरबैजानच्या पाठीशी असली, तरी सध्या तो देश युक्रेन युद्धात अडकला आहे. तर रशियाचा मित्र असलेला तुर्कस्तान अझरबैजानचे मित्रराष्ट्र आहे. १ लाख २० हजार आर्मेनियन नागरिकांच्या स्थलांतरानंतर युद्ध झालेच, तर त्यात अझरबैजानचे पारडे जड असेल, हे खरे. मात्र युुरोपला आणखी एक युद्ध भडकणे ही जगाच्या दृष्टीने चिंतेची बाब असेल.
amol.paranjpe@expressindia.com