ईशान्य भारतातील नागा समुदायाने आपली प्राचीन संस्कृती जपलेली आहे. नागा समुदायाशी निगडित असलेल्या अनेक वस्तू आणि माणसांचे अवशेष ब्रिटनमधील वस्तुसंग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेले आहेत. हे अवशेष मायदेशी आणण्यासाठी नागा समुदायाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. १८ व्या आणि १९ व्या शतकात विविध देशांमध्ये वसाहती असताना तिथून गोळा केलेल्या वस्तू स्वतःच्या देशातील वस्तुसंग्रहालयात ठेवल्यामुळे अनेक देशांवर टीका होत होती. त्यावरून जगभरातील वस्तुसंग्रहालयांनी या वस्तू त्या त्या देशाला परत देण्यास सुरुवात केली आहे. या अभियानाचा लाभ घेण्याचा प्रयत्न आशिया खंडाचा दक्षिण भाग आणि भारताच्या ईशान्येकडील राज्यांकडून होत आहे. आपल्या पूर्वजांचे अवशेष, संस्कृतीच्या खाणाखुणा पुन्हा आपल्या ताब्यात याव्यात असा रास्त विचार नागा समुदायाच्या नव्या पिढीने केला आहे.
वस्तू परत करण्याचे अभियान काय आहे?
इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड शहरात असलेल्या प्रतिष्ठित पिट रिव्हर्स वस्तुसंग्रहालयाने २०२० मध्ये एक निर्णय घेतला. तीन वर्षे आढावा घेतल्यानंतर संग्रहालयाने नैतिकतेच्या दृष्टीकोनातून आपल्या दर्शनी भागातून मानवी अवशेष आणि इतर असंवेदनशील वस्तू हटविण्याचा निर्णय घेतला. वस्तुसंग्रहालयाच्या संचालक लॉरा व्हॅन ब्रोकहोवन यांनी माहिती दिल्यानुसार, ब्रिटिश साम्राज्य जेव्हा जगभर पसरले होते, तेव्हा जगातील इतर संस्कृतींना रानटी आणि आदीम असे हिणवून या वस्तू इथे गोळा करून आणण्यात आल्या होत्या. वस्तुसंग्रहालयात जगभरातील पाच लाख वस्तूंचा संग्रह आहे. ज्यातून त्या काळातील मानवी जीवनाची झलक पाहायला मिळते. वस्तुसंग्रहालयाने नैतिकतेच्या विचारातून आता जगभरातील विविध समुदायांशी संपर्क साधून त्यांच्याशी निगडित असलेल्या वस्तूंचे हस्तांतरण करण्याचे अभियान हाती घेतले आहे. जेणेकरून या वस्तू त्यांच्या योग्य ठिकाणी पोहोचतील.
ही बातमी मेलबर्नमधील नागा समुदायाच्या मानववंशशास्त्रज्ञ डॉली किकॉन यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी ब्रोकहोवन यांच्याशी संपर्क साधून नागा समुदायाशी संबंधित शंभर वर्षांपूर्वीचे अवशेष आहेत का? आणि असतील तर ते नागा समुदायाच्या ताब्यात दिले जाऊ शकतात का? याबाबत विचारणा केली. किकॉन यांच्या विनंतीनंतर नागा समुदायामध्ये एक वेगळाच उत्साह संचारला. २००८ साली स्थापन झालेल्या द फोरम ऑफ नागा रिकन्सीलेशन (FNR) या संघटनेने इंडो-नागा शांततेसाठी पुढाकार घेतलेला आहे. आता आपल्या वस्तू पुन्हा देशात आणण्याच्या प्रक्रियेत या संघटनेने पुढाकार घेतला आहे.
हे वाचा >> मणिपुरींचा ‘नाग’बळी
पिट रिव्हर्स वस्तुसंग्रहालयात कोणते नागा अवशेष आहेत?
पिट रिव्हर्स वस्तुसंग्रहालयात जगातील सर्वाधिक नागा सुमदायाचे अवशेष आहेत. ही संख्या अंदाजे ६,५०० एवढी असून त्यांपैकी ८९८ वस्तू दर्शनी भागात ठेवण्यात आल्या आहेत. वस्तूंच्या प्रकारानुसार वस्तुसंग्रहालयात अनेक वस्तू ठेवलेल्या असतात. मात्र येथे नागांशी संबंधित वस्तूंचे वेगळे दालन तयार करण्यात आल्याचे ब्रोकहोवन यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने पाठविलेल्या ईमेलला उत्तर देताना सांगितले.
या दालनात कपडे, शेतीची अवजारे, इतर कामांसाठीची अवजारे, चिन्हे, टोपल्या, भांडी, वाद्य आणि मानवी शरीराचे अवशेष आशा नागांच्या दैनंदिन सामाजिक जीवनाशी संबंधित असलेल्या वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. अठराव्या शतकात ब्रिटिश वसाहतीचे प्रतिनिधी जेम्स फिलिप मिल्स आणि जॉन हेन्री हटन या दोन अधिकाऱ्यांनी यांपैकी अनेक वस्तू भारतातून ब्रिटनमध्ये नेल्या.
मानवी अवशेषांचे काय?
ब्रोकहोवन यांनी सांगितले की, नागांच्या विविध १३ समुदायांच्या पूर्वजांचे मानवी अवशेष संग्रहालयात आहेत. यांमध्ये मानवी कवटी, बोटांची हाडे, मानवी वस्तूंचा समावेश असलेल्या कलाकृतींचा संग्रह यांसारख्या वस्तू आहेत. कोन्याक नागा समुदायाचे सर्वाधिक ७८ मानवी अवशेष आहेत. त्यानंतर अंगमी नागांचे ३८ आणि सुमी नागांचे ३० अवशेष आहेत.
वस्तू परत पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली?
त्या त्या देशांना वस्तू परत हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अजून प्राथमिक टप्प्यातली तयारी सुरू आहे. वस्तू परत पाठवणे ही एक मोठी आणि क्लिष्ट पद्धत आहे. ज्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो. वस्तू परत पाठविण्याचे सर्वात यशस्वी उदाहरण म्हणजे, न्यूझीलंडच्या मोरीओरी आणि ऑस्ट्रेलियातील तास्मानियन या मूलनिवासी जमातींचे अवशेष लंडनमधील हिस्ट्री म्युझियममधून त्यांच्या मूळ देशात पाठविण्यात आले. मात्र या प्रक्रियेला दोन दशकांचा कालावधी लागला.
हे ही वाचा >> विश्लेषण : पुरातन वस्तू कायद्याचे महत्त्व काय?
नागा समुदायाच्या बाबतीत आता संवाद सुरू झाला आहे. २०२० साली एफएनआर या संघटनेने मानववंशशास्त्रज्ञ अर्कोटोंग लाँगकुमेर यांच्या सहकार्याने किकॉन आणि नागा समुदायाच्या सर्व वस्तू मायदेशी आणण्याचा निर्धार केला आहे. मानववंशशास्त्रज्ञ अर्कोटोंग लाँगकुमेर हे एडिनबर्ग (स्कॉटलँड) येथे स्थित आहेत. त्यांनी २०२० साली नागा संशोधकांचे एक पथक स्थापन केले असून Recover, Restore and Decolonise (RRaD) असे नाव या पथकाला दिले आहे.
२०२० पासून RRaD चे पथक, आपल्या समुदायाच्या जीवनाशी निगडित ऐतिहासिक खुणा, अवशेष आणि महत्त्वाच्या माहितीच्या दस्तावेजीकरणाचे काम करत आहे. यासाठी मुलाखती घेणे, समुदायाच्या बैठका घेणे आणि या उपक्रमाची माहिती पोहोचविण्यासाठी जनजागृती करणे अशा प्रकारचे कार्यक्रम या पथकाकडून हाती घेतले जात आहेत. शक्यतो समुदायातील ज्येष्ठांशी अधिक बातचीत करण्याचा प्रयत्न केला जातो. ऑस्कफोर्ड विद्यापीठाच्या अंतर्गत पिट रिव्हर्स हे वस्तुसंग्रहालय येते. या संग्रहालयातील नागांच्या वस्तूंवर RRaDने कायदेशीर दावा केलेला आहे. असे करणारी नागांमधील ती पहिलीच संस्था ठरली.
पिट रिव्हर्स वस्तुसंग्रहालयाची भूमिका काय आहे?
वस्तूंचे हस्तांतरण करण्याबाबतच्या प्रक्रियेबाबत माहिती देताना वस्तुसंग्रहालयाच्या वतीने सांगण्यात आले की, तेसुद्धा या प्रक्रियेला चालना देत आहेत. विशेषतः मावनी अवेशत परत देण्याच्या प्रक्रियेसाठी प्रत्येक प्रकरणाचा वेगळा विचार करावा लागतो. मानवी अवशेष हे त्या त्या समुदायातील लोकांच्या ताब्यातच जावेत, यासाठी विविध पातळ्यांवर पडताळणी करण्यात येते. तसेच ही प्रक्रिया विनासायास पार पडावी, याचाही कसोशीने प्रयत्न केला जातो, अशी माहिती संग्रहालयाकडून देण्यात आली. डिसेंबर २०२२ मध्ये ब्रोकहोवन यांनी सांगितले की, आम्ही नागालँडला भेट देऊन नागा समुदायातील प्रमुख लोक आणि ज्येष्ठ सदस्यांची भेट घेतली.
२०२० साली संग्रहालयाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले होते की, संग्रहालयात आलेल्या वस्तू या हिंसा आणि वसाहतीमधील लोकांना असमानतेची वागणूक देऊन इथे आणल्या आहेत. संग्रहालयाला गुंतागुंतीचा असा वसाहतवादाचा इतिहास आहे. त्यामुळेच आम्ही खुल्या मनाने समोर येऊन कोणताही आडपडदा न ठेवता संवाद सुरू केला आहे, अशी माहिती ब्रोकहोवन यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या की, अनेक लोकांना वाटते की, आम्ही या वस्तू परत दिल्यामुळे संग्रहालयाचे मोठे नुकसान होते आहे. पण आमच्या मते या वस्तू परत दिल्यानंतर आमचे नुकसान होणार नाही, उलट यामुळे आणखी नवा इतिहास लिहिला जाईल आणि वसाहतवादाच्या संकल्पनेतून बाहेर पडण्याचा हाच उत्तम मार्ग आहे.
नागा समुदायाला याबाबत काय वाटते?
लाँगकुमेर म्हणाले की, वस्तू मायदेशी परतण्याची प्रक्रिया काही वर्षे चालू शकते. मात्र त्यासाठीचा संवाद सुरू झाला हे महत्त्वाचे आहे. नागा समुदायाने अनेक दशके हिंसाचार आणि वेदना सहन केल्यानंतर त्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याचा हा एक प्रयत्न आहे. आपल्या इतिहासावर आपला स्वतःचा ताबा असणे ही गोष्ट इतर कितीतरी गोष्टींपेक्षा सर्वात सुखावह अशी आहे. किकॉन म्हणाल्या की, नागा समुदायाचे अनेक अवशेष जगभरातील वस्तुसंग्रहालयात विलक्षण आणि आदीम म्हणून दाखविले जातात. त्या वस्तू पाहताना मनाला अतिशय वेदना होत असत. आता नागांकडे या वस्तूंचा ताबा येणार आहे, त्याची प्रक्रिया सुरू झाली याचा मनापासून आनंद वाटतो.