अनिकेत साठे
सामाईक कार्यवाहीच्या दृष्टीने देशाच्या तिन्ही सैन्यदलांत समन्वय वाढविण्यासाठी एका दलातील अधिकाऱ्यांना दुसऱ्या दलात नियुक्त करण्याच्या (क्रॉस पोस्टिंग) प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.
भिन्न दलात नियुक्ती कशी होणार?
भारतीय लष्करातील ४० अधिकाऱ्यांना हवाईदल आणि नौदलात नियुक्त केले जाणार आहे. यात मेजर, लेफ्टनंट कर्नल हुद्दय़ांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. क्षेपणास्त्र विभागात ते समायोजित होतील. मानवरहित (यूएव्ही) विमानांचे संचलन, पुरवठा व्यवस्था, देखभाल-दुरुस्ती, पुरवठा व्यवस्थापन अशी काही विशिष्ट जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाईल.तिन्ही दलांत यूएव्ही, रडार, शस्त्रप्रणाली, वाहने आणि दूरसंचार उपकरणे बहुतांशी एकसमान आहेत. त्यामुळे दलात बदल होऊनही त्यांच्या कामात फारसा फरक पडणार नाही. भविष्यात याच धर्तीवर हवाईदल आणि नौदलात मनुष्यबळ अदलाबदलीची योजना राबविली जाणार आहे.
या बदलाने काय होईल?
वेगवेगळय़ा दलातील अधिकाऱ्यांनी एकत्रित काम करणे ही एकात्मिक युद्ध गटाची प्राथमिक निकड आहे. प्रारंभीच्या कारकीर्दीत अधिकाऱ्यांना अन्य दलाच्या कार्यपद्धतीची अनुभूती घेता येईल. सेवेतील नैतिकता, बारकावे आणि कार्यपद्धतीचे शिक्षण मिळेल. यातून सामाईक कार्यात उत्तम समन्वय साधला जाईल. शिवाय, संयुक्त योजनेसाठी सामग्री खरेदी, अहवाल प्रक्रिया व पुरवठा साखळीतील विविध आव्हानांवर मात करण्यास मदत होणार असल्याचे अधिकारी सांगतात. एकत्रीकरणातून सर्वोत्कृष्ट कार्यपद्धती विकसित करता येईल. जेणेकरून एकात्मिक युद्ध विभागाच्या निर्मितीनंतर सर्वोत्तम सेवेसाठी ती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.
एकात्मिक युद्ध विभागाशी संबंध कसा?
सरकारने देशाच्या तिन्ही सैन्यदलांत उत्तम समन्वय राखण्यासाठी लष्कर, हवाईदल आणि नौदल यांचा एकात्मिक युद्ध विभाग अर्थात जॉइन्ट थिएटर कमांड स्थापण्याचे निश्चित केले आहे. शेजारील शत्रुराष्ट्रांची आव्हाने, भौगोलिक आणि रणनीतिक स्थिती लक्षात घेऊन चार एकात्मिक युद्ध विभाग प्रस्तावित आहेत. प्रत्येक विभागात एकच ऑपरेशन कमांडर असणार आहे. ही एक युद्धरणनीती आहे. ज्यात सैन्य दलांची शस्त्रे एका विभागांतर्गत (कमांड) आणण्याची रचना केली जाईल. तिन्ही दलांच्या एकत्रीकरणातून अस्तित्वात येणाऱ्या या विभागात केवळ सामाईक लष्करी कारवाईच नव्हे, तर पुरवठा व्यवस्था, वाहतूक, दळणवळण, देखभाल-दुरुस्तीत संयुक्त व्यवस्था नियोजित आहे. आवश्यकतेनुसार सामग्री खरेदी, प्रशिक्षण, आपल्या अधिकाऱ्यांची अन्य दलात नियुक्ती असे विषय अंतर्भूत आहेत. या संकल्पनेतून तिन्ही दलांच्या एकत्रित शक्तीतून परिणामकारकता साधण्याचा उद्देश आहे. भारतीय सैन्यदलांचे संरक्षणप्रमुख (सीडीएस) या पदाची निर्मिती हा त्याचाच एक भाग होय.
सद्य:स्थिती काय?
सध्या भारतीय लष्कर आणि हवाईदलाच्या प्रत्येकी सात आणि नौदलाच्या तीन अशा एकूण १७ कमांड कार्यरत आहेत. प्रत्येक दल स्वतंत्रपणे जबाबदारी सांभाळते. त्यांच्या अखत्यारीतील कमांडवर विशिष्ट क्षेत्राच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. तिन्ही दलांच्या संयुक्त कारवाईला समन्वयातून मूर्त स्वरूप दिले जाते. कारगिल वा १९७१ च्या युद्धावेळी तिन्ही दलांनी सामाईक कारवाईची परिणामकारकता अधोरेखित केलेली आहे. तिन्ही दलांना संयुक्त कार्यवाहीसाठी सज्ज राखण्याचा उद्देश एकात्मिक युद्ध विभागातून दृष्टिपथास येईल. अंदमान-निकोबार बेटांवर यापूर्वीच ही संकल्पना अस्तित्वात आहे.
पुनर्रचनेला विलंब का?
भारतीय सैन्यदलांचे पहिले संरक्षणप्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांच्या नेतृत्वाखाली एकात्मिक युद्ध विभाग स्थापण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. त्यास तीन वर्षे गृहीत धरलेली होता. तथापि, हेलिकॉप्टर अपघातात रावत यांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक महिने त्यांचे पद रिक्त होते. विद्यमान संरक्षणप्रमुख अनिल चौहान यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यास नव्याने गती दिली. एकात्मिक युद्ध विभागाच्या विषयावर कमांडर्स परिषदेत चर्चा झाली होती. या विभागाची रचना, त्याचे स्वरूप व कारवाईची रणनीती यावर एकमताचा अभाव राहिल्याचे सांगितले जाते. प्रस्तावित एकात्मिक युद्ध विभागासाठी तिन्ही दलांची पुनर्रचना सोपी गोष्ट नाही. अनेक लहान-मोठय़ा बाबींची स्पष्टता होणे बाकी आहे. त्यामुळे प्रथम पुरवठा व्यवस्था, देखभाल-दुरुस्ती आणि जी कार्ये एकत्रितपणे करणे शक्य आहे, त्यावर तूर्तास लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.