दत्ता जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा देशात विक्रमी खाद्यतेल आयात होत आहे. ही आजवरची उच्चांकी आयात ठरणार आहे. आयात वेगाने होण्याची कारणे काय, आयातीचा देशी खाद्यतेल उद्योग, तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल, याविषयी…

देशात खाद्यतेलाची आयात किती?

देशात खाद्यतेलाची वेगाने आयात सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात १४,००८ टन खाद्यतेलाची आयात झाली आहे. नोव्हेंबर २०२२ ते ऑगस्ट २०२३ या खाद्यतेल वर्षातील पहिल्या दहा महिन्यांत १४१.२१ लाख टन खाद्यतेलाची आयात करण्यात आली आहे. ऑक्टोबरअखेर एकूण आयात १६५ लाख टनांवर जाण्याची शक्यता असून, ही आजवरची सर्वोच्च खाद्यतेल आयात ठरेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

यंदा आजवरची विक्रमी आयात होणार?

‘द सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ ही देशातील खाद्यतेल उद्योगाची शिखर संघटना आहे. या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर ते ऑक्टोबर हे खाद्यतेल वर्ष गणले जाते. चालू खाद्यतेल वर्षात पहिल्या दहा महिन्यांत १४१.२१ लाख टन खाद्यतेलाची आयात झाली आहे. सन २०१६-१७ मध्ये आजवरची उच्चांकी १५१ लाख टन आयात झाली होती. आगामी दसरा, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांतही खाद्यतेल आयातीत वाढच होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या तेल वर्षांत एकूण खाद्यतेल आयात १६५ लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ही खाद्यतेल आयात आजवरची उच्चांकी आयात ठरणार आहे.

आणखी वाचा-जगासमोर डिझेल संकट? कशामुळे आली ही वेळ?

पामतेलाची आयात सर्वाधिक?

चालू खाद्यतेल वर्षात पहिल्या दहा महिन्यांत झालेल्या एकूण १४१.२१ लाख टन आयातीत पामतेलाचा वाटा ८२ लाख टन इतका आहे. मागील खाद्यतेल वर्षात याच काळात पामतेलाची आयात ५८ लाख टन होती. यंदाच्या एकूण खाद्यतेल आयातीत पामतेलाचा वाटा ५९ टक्के, सोयाबीनचा २३ टक्के आणि सूर्यफूल तेलाचा वाटा १८ टक्के आहे. इंडोनेशिया आणि मलेशियातून सर्वाधिक आयात झाली आहे. त्यात पामतेलाचाच वाटा जास्त आहे. इंडोनेशिया आणि मलेशिया जगातील प्रमुख पामतेल उत्पादक, निर्यातदार देश आहेत.

देशात खाद्यतेलाचा साठा किती?

देशात श्रावण महिन्यापासून दिवाळीपर्यंतच्या सण-उत्सवांची रेलचेल असते. या काळात देशात मुबलक प्रमाणात खाद्यतेलाची गरज असते. मागणीनुसार बाजारात उपलब्धता रहावी म्हणून व्यापारी, खाद्यतेल कंपन्या मोठ्या प्रमाणावर खाद्यतेलाची आयात करतात. देशाला महिनाभर सुमारे २० लाख टन खाद्यतेलाची गरज असते. त्यामुळे केंद्र सरकार साधारणपणे महिनाभर पुरेल इतका खाद्यतेलाचा साठा करून ठेवत असते. यंदा जुलैअखेर देशात ३२ लाख टनांचा तर ऑगस्टअखेर देशात खाद्यतेलाचा साठा ३७ लाख टनांवर पोहचला आहे. म्हणजे दोन महिने पुरेल इतक्या तेलाचा साठा देशात करण्यात आला आहे.

आणखी वाचा-हरदीपसिंग निज्जर ते अर्शदीप, एनआयएने पंजाबमधील टोळ्यांवर कशी कारवाई केली?

खाद्यतेल आयात का वाढली?

करोना काळात आणि त्यानंतर युक्रेन-रशिया युद्धाच्या काळात जागतिक व्यापारात अडथळे निर्माण झाले होते. पामतेल निर्यातदार इंडोनेशियाने पामतेलाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे जागतिक बाजारात खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण झाला होता. खाद्यतेलाचे दर भडकले होते. करोनाचे निर्बंध संपले. युक्रेन-रशिया युद्धामुळे निर्माण झालेला तणाव कमी झाला आहे. रशिया, युक्रेन, अर्जेनटिनासारख्या खाद्यतेल उत्पादक आणि निर्यातदार देशांनी सूर्यफूल तेल मोठ्या प्रमाणावर जागतिक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्यामुळे जागतिक बाजारात खाद्यतेलाचे दर कमी झाल्यामुळे आयात वाढली आहे. कच्चा तेलाच्या तुलनेत रिफाइन्ड तेलाचे दरही कमी झाल्यामुळे व्यापारी आणि कंपन्या कच्चे तेल आयात करण्याऐवजी रिफाइन्ड खाद्यतेलाची आयात करण्याला प्राधान्य देत आहेत.

बाजारातील तेलाचे दर किती?

किरकोळ बाजारातील दर प्रति पंधरा किलो सोयाबीन १५०० ते १८३०, सूर्यफूल १५३० ते १७००, पामतेल १४५० ते १५८०, शेंगतेल २६३० ते २८३०, सरकी १५०० ते १६५० आणि वनस्पती तेल १५२० ते १८१५ रुपये असे आहेत. जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या दरात घसरण झाली आहे. खाद्यतेल उद्योगातील कंपन्या देशात सण-उत्सवांच्या काळात वाढणाऱ्या मागणीचा फायदा उठविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आयात होऊ लागली आहे. वर्षभर खाद्यतेलाचा साठा मुबलक प्रमाणात राहील, शिवाय दरातही स्वस्ताई राहण्याचा अंदाज आहे.

आणखी वाचा-विवाहबाह्य संबंधामुळे चीनच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांची हकालपट्टी; वर्तमानपत्राच्या लेखामुळे खळबळ

देशी खाद्यतेल उद्योग, शेतकऱ्यांवर काय परिणाम?

कमी दराने आणि करमुक्त आयात सुरू असल्यामुळे देशातील खाद्यतेल उद्योग अडचणीत आला आहे. खाद्यतेल आयातीवरील कर कमी करा, अशी मागणी करणारे व्यापारी, उद्योजक आता करमुक्त आयात न करता कर लावण्याची मागणी करू लागला आहे. कच्चा तेलाच्या तुलनेत रिफाइन्ड तेलाचे दर कमी झाल्यामुळे रिफाइन्ड तेलाची आयात वाढली आहे. त्यामुळे देशी रिफाइन्ड प्रकल्प अडचणीत आले आहेत. सोयाबीनचे दर मागील मागील वर्षी सरासरी सात हजार रुपये क्विन्टलपर्यंत गेले होते. यंदा ते जेमतेम पाच हजार रुपयांच्या घरात आहेत. सूर्यफूल बियांचा हमीभाव प्रति क्विन्टल ६४०० रुपये आहे. पण, या हमीभावाला देशात कुठेही प्रतिसाद दिसत नाही. त्यामुळे सूर्यफूल बिया मागणीअभावी पडून आहेत. खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याची घोषणा केवळ हवेतच आहेत. तेलबियांना अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी पुन्हा तेलबियांच्या लागवडीकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.

dattatray.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why the record import of edible oil and what is its impact on the domestic edible oil industry print exp mrj
Show comments