Ayodhya Ram Mandir Sacred Shaligram: उत्तर प्रदेशातील अयोध्येत गुरुवारी २ फेब्रुवारीला ३१ टन आणि १५ टन वजनाच्या दोन पवित्र शाळीग्राम शिला आणण्यात आल्या. अयोध्येच्या बहुचर्चित राम मंदिरात भगवान राम आणि जानकीच्या मूर्ती तयार करण्यासाठी या पवित्र शाळीग्राम शिलांचा वापर करण्यात येणार असल्याचे समजत आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, जानकी मंदिराचे पुजारी आणि विहिंपचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र सिंह पंकज यांच्यासह १५० सदस्यांच्या शिष्टमंडळाने नेपाळमधील पोखरापासून १०० किमी अंतरावरील जनकपूरमधील गालेश्वर धाम येथे शिला आणल्या आहेत. भगवान शीराम व माता जानकीच्या मूर्तीच्या बांधकामासाठी शाळीग्राम शिला का निवडल्या याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
शाळीग्राम शिला एवढ्या खास का?
‘शाळीग्राम पिलग्रिमेज इन द नेपाळ हिमालय’ या पुस्तकात मानववंशशास्त्रज्ञ हॉली वॉल्टर्स यांनी सांगितले की शाळीग्राम शिला हे मूळ अमोनाईटचे जीवाश्म आहेत, जे ४०० दशलक्ष ते ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी जीवित होते.
१९०४ च्या भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाच्या प्रकाशनाचा संदर्भ देत, वॉल्टर्स यांनी माहिती दिली आहे. त्या लिहितात, “शाळीग्राम १६५-१४० दशलक्ष वर्षांपूर्वी जुरासिक कालखंडाच्या समाप्तीच्या वेळी ऑक्सफर्डियनच्या सुरुवातीच्या काळापासून ते लेट टिथोनियन युगापर्यंत अस्तित्वात होते”
नेपाळमधील गंडकी नदीची उपनदी, काली गंडकीच्या नदीच्या पात्रात शाळीग्राम आढळतात. याविषयी आध्यत्मिक कथा सुद्धा आहेत. शाळीग्राम भगवान विष्णूचे स्वरूप मानला जातो. त्यामुळेच हिंदू धर्मीयांमध्ये या शाळीग्रामला पूजनीय मानले जाते. हिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णूला “तुळशीच्या पवित्रतेचा विश्वासघात केल्याबद्दल” शाळीग्राम बनण्याचा शाप देण्यात आला होता. याबाबत स्वतः वॉल्टर यांनी त्यांच्या पुस्तकात माहिती दिली आहे. या शाळीग्राम शिलांमध्ये दैवी शक्ती असल्याने यास सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
राम मंदिरात शाळीग्राम दगड का वापरला जाणार आहे?
प्रभू राम हा विष्णूचा पुनर्जन्म आहे असे मानले जाते आणि शाळीग्राम दोन देवांमधील परस्पर संबंधाचे प्रतीक आहे. या दोन्ही शिलांचे अयोध्येत लोकांनी प्रार्थना, फुले वाहून आणि फटाके फोडून स्वागत केले. विहिंप नेते राजेंद्र सिंह पंकज यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट प्रभू रामाची मूर्ती बनवण्यासाठी शाळीग्राम वापरण्याचा विचार करत होते. “जेव्हा जानकी मंदिर प्रशासनाने नेमके शाळीग्राम देऊ केले तेव्हा ट्रस्टने त्याला संमती दिली”.
हे ही वाचा<< विश्लेषण: करोना संपलेला नाही! हरणांमुळे पूर्ण जगावर पुन्हा येऊ शकते कोविडचे संकट, नवा अभ्यास काय सांगतो?
शाळीग्रामाची आध्यत्मिक कथा
आध्यात्मिक कथांनुसार, दैत्यराज जालंधर व भगवान शंकर यांच्यात मोठे युद्ध झाले तेव्हा काही केल्या जालंधराचा अंत होत नव्हता. जालंधराची पत्नी वृंदा म्हणजेच तुळशी ही पुण्यवान होती तिच्या पुण्यशक्तीमुळे जालंधरला शक्ती प्राप्त होत होती. याविषयी देवतांना माहिती मिळताच भगवान विष्णू हे जालंधराचे रूप घेऊन वृंदेकडे गेले. यामुळे वृंदेचे पावित्र्य भंग झाले. युद्धात जालंधराचा मृत्यू झाला. वृंदा ही स्वतः विष्णू भक्त होती मात्र जेव्हा तिला झाल्याप्रकाराची माहिती मिळाली तेव्हा तिने श्रीहरींना शाप दिला व स्वतःचे जीवन संपवले. भगवान विष्णू या शापामुळेच शाळीग्राम दगडात रूपांतरित झाले. त्यामुळेच दरवर्षी तुळशी विवाहाला वृंदा म्हणजेच तुळस व शाळीग्राम स्वरूप विष्णूचे लग्न लावले जाते