ज्ञानेश भुरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्पेन फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष लुईस रुबियालेस यांना जागतिक फुटबॉल शिखर संघटना ‘फिफा’ने महिला विश्वचषक स्पर्धेच्या पारितोषिक वितरणात स्पेनची खेळाडू जेनिफर हेर्मोसोचे चुंबन घेतल्याच्या कृतीवरून निलंबित करण्याचा निर्णय घेतला. पारितोषिक वितरण सोहळ्यात नेमके काय घडले आणि ही कारवाई का करण्यात आली, तसेच निलंबन कारवाई ९० दिवसांपुरतीच मर्यादित राहणार की रुबियालेस यांना हटवले जाणार याविषयी विश्लेषण…

विश्वचषक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात नेमके काय घडले?

स्पेनने महिला विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळवून इतिहास रचला होता. सगळेच खेळाडू उत्साहात होते. संघटनेचे पदाधिकारीही आपला आनंद साजरा करत होते. पारितोषिक वितरण सोहळा सुरू असताना, स्पेन फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष लुईस रुबियालेस यांनी स्पेनची प्रमुख खेळाडू मध्यरक्षक जेनिफर हेर्मोसोचे चुंबन घेतले. रुबियालेस यांची ही कृतीच वादग्रस्त ठरली.

लुईस रुबियालेस यांची कारकीर्द कशी?

रुबियालेस हे सध्या स्पेनमधील ताकदवान फुटबॉल संघटक असले, तरी ते उत्तम फुटबॉलपटू होते. ला लिगा या स्पॅनिश फुटबॉल लीगमधील तीनहून अधिक हंगामातून ते ५३ सामने खेळले आहेत. स्पॅनिश फुटबॉल महासंघाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी २०१८ विश्वचषक स्पर्धेच्या ऐनवेळेस स्पेनच्या पुरुष संघाचे प्रशिक्षक जुलेन लोपेटेगुई यांची हकालपट्टी केली होती. त्यांचा हा वादग्रस्त निर्णय वगळता प्रशासक म्हणून त्यांचे वर्चस्व होते. ‘युएफा’चे देखील ते उपाध्यक्ष आहेत.

रुबियालेस यांच्यावर कारवाई का करण्यात आली?

एखाद्या महिला खेळाडूशी संमतीशिवाय तसेच जाहीर सलगी करणे हे ‘फिफा’च्या शिस्तीत बसत नाही. यानंतरही ‘फिफा’ला रुबियालेस यांच्यावर कारवाई करण्यासाठी वेळ लागला. रुबियालेस स्पेनच्या फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष असेपर्यंत आम्ही स्पेन संघाकडून खेळणार नाही अशी भूमिका खेळाडूंनी घेतल्यानंतर ‘फिफा’ने या प्रकरणात चौकशी समिती नेमली. चौकशी समितीसमोर रुबियालेस यांनी जेनिफर हेर्मोसोच्या संमतीशिवाय चुंबन घेतल्याचे स्पष्ट झाल्याने रुबियालेस यांना पुढील निर्णयापर्यंत ९० दिवसांसाठी निलंबित केले.

जेनिफर हेर्मोसोचे म्हणणे काय?

चुंबन घेण्यासाठी रुबियालेस सहमती असल्याचे कितीही म्हणत असले, तरी त्यात तथ्य नाही. मी त्यांच्या आक्रमकतेची बळी ठरली आहे. माझ्या बोलण्याकडे कुणीच लक्ष देत नाही. माझा सन्मानच केला जात नाही. उलट माझ्यावर रुबियालेस यांच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी दबाब येत आहे. आम्हाला अनेक वर्षे अन्यायाला सामोरे जावे लागत आहे आणि रुबियालेस यांच्या या कृतीने अन्यायाचे टोक गाठले, असे हेर्मोसोने म्हटले आहे.

निलंबनाच्या कारवाईने प्रश्न मिटणार की पुढेही काही कारवाई होणार?

रुबियालेस यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईने हा प्रश्न सुटणारा नाही. महिला खेळाडूंवर अन्याय होण्याच्या तक्रारी वाढत आहेत. याविरुद्ध अनेकदा आंदोलनही करण्यात आले होते. महिला खेळाडू समान वेतन हक्कासाठीही लढा देत आहेत. यामध्ये आता स्पेनचे पुरुष खेळाडूही महिला खेळाडूंच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. चारही बाजूने रुबियालेस यांना लक्ष्य केले जात असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी वाढत आहे.

रुबियालेस यांची भूमिका काय आहे?

जे काही घडले ते सहमतीने घडले या मताशी रुबियालेस निलंबनाच्या कारवाईनंतरही ठाम आहेत. स्पॅनिश फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी ते तयार नाहीत. स्पेन महासंघाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत त्यांनी राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. खोटे आरोप करून आपला बळी दिला जात असल्याचे रुबियालेस यांचे म्हणणे आहे. हेर्मोसोची चुंबनास सहमती होती. मग मी राजीनामा का द्यायचा, असा उलट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

स्पेन सरकार हस्तक्षेप करणार का?

रुबियालेस यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. स्पेनच्या महिला खेळाडूंवर होणारा अन्याय आणि हेर्मोसोबाबत जे काही घडले या संदर्भात स्पेनच्या क्रीडा मंत्रालयाने हस्तक्षेप करावा अशीही मागणी पुढे आली आहे. स्पेनचे कामगार मंत्री योलांदा दियाझ यांनी रुबियालेस यांना पदावरून दूर करण्याची मागणी केली आहे. मात्र, स्पेनमधील कायद्यानुसार क्रीडा संघटनांवरूल प्रमुखांना हटविण्याचा अधिकार स्पेन सरकारला नाही. त्यामुळे हा वाद आता क्रीडा लवादासमोर उभा राहू शकतो. क्रीडा लवादाने या प्रकरणाची चौकशी केली आणि त्यात रुबियालेस दोषी आढळले तर आणि तरच त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why the suspension of spain football federation president luis rubiales print exp scj