इस्रायल-हमास युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने आता हा संघर्ष पश्चिम आशियातील अन्य प्रदेशात पसरण्याचा धोका अनेकांना जाणवत आहे. त्यामुळे प्रमुख अरब राष्ट्रांसह अमेरिका व तिच्या मित्रराष्ट्रांचे प्रयत्न सुरू आहेत. संघर्ष चिघळू द्यायचा की नाही, हे यापैकी कुणाच्याच हातात फारसे नाही. मात्र, आखातामधील एक संघटना यावर प्रभाव पाडू शकते आणि ती म्हणजे लेबनॉनमधील अत्यंत प्रभावशाली असलेली ‘हेजबोला’ ही अतिरेकी संघटना. हेजबोलाच्या निर्णयावर शांतता का विसंबून आहे, या संघटनेची नेमकी ताकद किती, तिला युद्धात खेचणारे आणि त्यापासून रोखणारे कोणते घटक आहेत, याचा हा आढावा.

हेजबोला संघटनेचा इतिहास काय?

इराणने आखातातील देशांमध्ये जन्माला घातलेल्या विविध सशस्त्र संघटनांमध्ये लेबनॉनमधील हेजबोला ही सर्वात ताकदवान मानली जाते. शिया मुस्लिमांच्या या संघटनेचा जन्म लेबनॉनच्या गृहयुद्धादरम्यान १९८२मध्ये झाला. दक्षिण लेबनॉनवरील इस्रायलचा ताबा संपुष्टात आणणे, हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट होते. २००० साली हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर या अतिरेकी गटाची ताकद प्रचंड वाढल्याचे मानले जाते. सुरुवातीच्या काळात हेजबोलाने अमेरिकेच्या लक्ष्यांवरही हल्ले केले. परिणामी वॉशिंग्टनने या संघटनेला ‘दहशतवादी’ घोषित केले. २००६ साली हेजबोलाने इस्रायलच्या चौकीवर हल्ला करून दोन सैनिकांचे अपहरण केले. त्यानंतर महिनाभर चाललेले युद्ध अनिर्णित अवस्थेत संपुष्टात आले. मात्र तोपर्यंत इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यांनी दक्षिण लेबनॉनची चाळण केली होती. त्यावेळीही इस्रायलने आताप्रमाणेच हेजबोला संघटनेला संपविण्याच्या वल्गना केल्या होत्या, हे विशेष. मात्र त्यानंतर हा गट अधिक मजबूत झाला. केवळ सशस्त्र दल म्हणून नव्हे, तर लेबनॉनमधील एक प्रमुख राजकीय शक्तीही बनला.

syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
Syria loksatta news
अग्रलेख : वाळवंटातले वालीहीन!
Syria Civil War
Syria Crisis: “सीरीया शुद्ध होत आहे”; असद यांची राजवट उलथवल्यानंतर बंडखोरांचा नेता अबू जोलानीची मोठं वक्तव्य
Syria, Abu Mohammad Al Jolani, dictatorship Syria,
विश्लेषण : जिहादीचा बनला प्रशासक… कोण आहे सीरियाचा नवा शासक अबू मोहम्मद अल जोलानी?
Bashar al-Assad And Vladimir Putin.
Syrian Civil War : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल
President Bashar al Assad forces defeated in parts of Syria
सीरियावर बंडखोरांचा ताबा… अध्यक्ष बशर अल असद परागंदा… नेमके काय घडले? अमेरिका, रशिया, इराण, तुर्कीयेचा काय संबंध?

हेही वाचा – विश्लेषण : न्यूझीलंडच्या विजयामुळे पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात? उपांत्य फेरीचे समीकरण काय?

हेजबोलाचा मुख्य नेता कोण आहे?

१९६० साली बैरूतचे उपनगर बोर्ज हमूदमध्ये एका गरीब शिया कुटुंबात जन्मलेला हसन नसरल्ला हा सध्या हेजबोलाचा नेता आहे. धर्मशास्त्राचा अभ्यास करून तो ‘अमल’ या राजकीय निमलष्करी संघटनेत सामील झाला व कालांतराने अन्य काहीजणांबरोबर त्याने हेजबोलाची स्थापना केली. १९९२ साली तेव्हाचा हेजबोलाचा नेता इस्रायली हल्ल्यात मारला गेल्यानंतर नसरल्लाकडे संघटनेचे नेतृत्व आले. दक्षिण लेबनॉनमधून इस्रायलला हुसकावल्यामुळे व २००६च्या युद्धामुळे लेबनॉनमध्ये त्याचे प्रस्थ प्रचंड वाढले. इतके, की लेबनॉन, सीरियासह अन्य काही देशांमध्ये त्याच्या प्रतिमा असलेली स्मृतिचिन्हे विकली जातात. मात्र आपल्या देशाचे नशीब इराणशी जोडल्याबद्दल लेबनॉनमध्ये अनेक जण त्याच्यावर टीकाही करतात. इस्रायली हल्ल्याच्या भीतीने तो कायम भूमिगत असतो आणि गुप्त ठिकाणांवरून आपले दृकश्राव्य संदेश प्रसारित करतो. गेल्या आठवड्यात नसरल्ला असाच एक संदेश देणार असल्याचे समजल्यावर जगाच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने इस्रायलविरुद्ध सर्वंकष युद्धाची घोषणा केली असती, तर परिस्थिती बिकट झाली असती.

हेजबोलाची नेमकी ताकद किती?

उत्तम संघटनात्मक बांधणी व मोठा शस्त्रसाठा असलेली हेजबोला हे अरब जगतातील सर्वांत महत्त्वाचे निमलष्करी दल मानले जाते. या संघटनेकडे तब्बल दीड लाख क्षेपणास्त्रे असल्याचा अंदाज आहे. अलीकडेच इराणधार्जिणे सीरियन अध्यक्ष बशर अल असद यांच्याविरुद्ध झालेला उठाव मोडून काढण्यासाठी हेजबोलाने आपले सैन्य पाठविले होते. इराक, येमेन आणि सीरियामध्ये इराणधार्जिण्या अतिरेकी गटांच्या वाढीला हेजबोलाने कायम खतपाणी घातले आहे. एका अर्थी हेजबोला ही संघटना इराणच्या ‘प्रतिकार अक्ष’ योजनेमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचे मानले जाते.

हेजबोला-हमासचे संबंध कसे आहेत?

इराणचा पाठिंबा हा या दोन संघटनांमधील समान दुवा असला, तरी त्यांचे फारसे सख्य आहे, असे म्हणता येणार नाही. १९८७ मध्ये स्थापन झालेल्या सुन्नीबहुल हमासला इराण, सीरियाचे २००६ पर्यंत पाठबळ नव्हते हे लक्षात घेतले तर हमास व इराणसमर्थित अन्य संघटनांचे संबंध हे पूर्णत: व्यावहारिक आहेत, असे म्हणता येईल. मात्र गेल्या पाच वर्षांत हमास व हेजबोलाचे संबंध वेगाने सुधारल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. हमासचे काही प्रमुख नेते सध्या लेबनॉनमध्ये असून तेथे हेजबोलाच्या संरक्षणात राहात आहेत. असे असले, तरी हमासला वाचविण्यासाठी हेजबोला सर्वंकष युद्ध ओढवून घेईल, अशी स्थिती नाही. नसरल्लाच्या गेल्या आठवड्यातील भाषणाने यावर शिक्कामोर्तब केले आहे.

हेही वाचा – विश्लेषण : सत्तेच्या गणितात ओबीसी का महत्त्वाचे? महाराष्ट्रात पक्षीय ओबीसी समीकरणे काय?

युद्धाबाबत हेजबोलाची भूमिका काय?

३ नोव्हेंबरच्या नसरल्लाच्या भाषणात तीन मुख्य मुद्दे होते. हमासच्या ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याची आपल्याला किंवा इराणला पूर्वकल्पना नव्हती, हे त्याने स्पष्ट केले. दुसरा मुद्दा म्हणजे त्याचे गाझामध्ये युद्धविराम करण्याचे आवाहन व त्यासाठी अन्य मुस्लीम देशांना घातलेली साद. याखेरीज सर्वात महत्त्वाचे म्हणजे इस्रायलवर आता सर्व बाजूंनी वार होत आहेत, असे तो अखेरीस म्हणाला. लेबनॉन सीमेवर इस्रायलने आणून ठेवलेल्या लष्कराची यादीही त्याने वाचली. एका अर्थी, आपण उत्तरेकडून इस्रायलवर अल्प हल्ले करून व युद्धाची शक्यता जिवंत ठेवून इस्रायलचे लष्कर विभागले आहे व यामुळे हमासला मदतच होत आहे, असे नसरल्लाने सूचित केले आहे. याचा एकत्रित अर्थ काढला, तर सध्या तरी हेजबोला युद्धात उतरणार नाही. मात्र तशी शक्यता कायम ठेवणार असा आहे.

amol.paranjpe@expressindia.com

Story img Loader