जागतिक संरक्षण निर्यातदार म्हणून भारत बळकट होताना दिसत आहे. आता फ्रान्स भारतात तयार झालेल्या पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर सिस्टीममध्ये उत्सुकता दाखवीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. भारताने ‘पिनाका’ला अमेरिकानिर्मित HIMARS (हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम)च्या बरोबरीचे असल्याचे म्हटले आहे. त्यावर बोलताना फ्रेंच आर्मी स्टाफ जनरल इंटरनॅशनल अफेअर्स ब्रिगेडियर जनरल स्टीफन रिचौ यांनी ‘द हिंदू’ला सांगितले की, भारताने गेल्या फेब्रुवारीत ‘पिनाका’ फ्रान्समधील लष्करप्रमुखांसमोर सादर केले. आम्ही अशी प्रणाली तीन-चार सर्वोत्कृष्ट प्रदात्यांकडून घेण्याच्या तयारीत आहोत आणि त्यापैकी भारत एक आहे. आमच्याकडे एक विशेष मिशन आहे. आम्ही येत्या आठवड्यात भारतात येऊन लाँचर आणि दारूगोळा या दोन्हींचे मूल्यमापन करू. सध्या ‘मेड इन इंडिया’ पिनाका २५० दशलक्ष डॉलर्स मूल्याच्या निर्यात करारांतर्गत आर्मेनियाला निर्यात केले जाते. अनेक देश या प्रणालीत स्वारस्य दाखविताना दिसत आहेत. जगभरात ‘पिनाका’ची मागणी वाढण्याचे कारण काय? जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पिनाका’ची प्राणघातकता

पिनाका शस्त्र प्रणालीचे नाव भगवान शिवाच्या धनुष्याच्या नावावरून देण्यात आले आहे. ही प्रणाली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)ची एक महत्त्वाची शाखा असलेल्या पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास प्रतिष्ठान (एआरडीई)द्वारे विकसित केली गेली आहे. रशियन मेकच्या मल्टी-बॅरल रॉकेट लाँचिंग सिस्टीमला पर्याय म्हणून ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात या शस्त्राचा विकास सुरू झाला. पण, पिनाका शस्त्रास्त्र यंत्रणा नेमकी काय आहे? सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास ही एक मल्टी-बॅरल रॉकेट प्रणाली आहे, जी केवळ ४४ सेकंदांत १२ रॉकेट्स डागू शकते. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे की, पिनाका प्रणालीच्या एका बॅटरीमध्ये सहा प्रक्षेपण वाहने असतात. सध्या पिनाकाचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे मार्क I, ज्याची रेंज सुमारे ४० किलोमीटर आहे आणि दुसरे म्हणजे मार्क-II, ज्याची रेंज सुमारे ७५ किलोमीटरपर्यंत आहे.

पिनाका ही एक मल्टी-बॅरल रॉकेट प्रणाली आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?

आता या प्रणालीची रेंज वाढविण्याचे काम सुरू आहे. या प्रणालीसाठी दोन प्रकारची लांब पल्ल्याची रॉकेट्स विकसित करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये १२० किलोमीटर आणि २०० किलोमीटरची श्रेणी आहे. तज्ज्ञांच्या मते, पिनाका रॉकेट ५,८००किलोमीटर प्रतिताशी वेगाने पोहोचू शकते; ज्यामुळे ते अडवणे कठीण होते. लाँचरची शूट-अॅण्ड-स्कूट क्षमता त्याला काउंटर-बॅटरीच्या आगीपासून वाचण्यास सक्षम करते, असे ‘युरेशियन टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे.

भारताच्या सशस्त्र दलांकडून ‘पिनाका’चा वापर

आतापर्यंत भारतीय सैन्य चार पिनाका रेजिमेंट चालवते. सर्वांत पहिल्यांदा ही प्रणाली १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानी सैन्याविरुद्ध यशस्वीरीत्या वापरात आणली गेली. लडाखवरील तणावादरम्यान ही प्रणाली अलीकडेच चीनबरोबरच्या भारताच्या सीमेवरदेखील तैनात करण्यात आली होती.

भारताने ‘पिनाका’ला अमेरिकानिर्मित HIMARS (हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम)च्या बरोबरीचे असल्याचे म्हटले आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

पिनाकाचा आर्मेनियात वापर

येरेवन हे स्वदेशी विकसित पिनाकाचे पहिले निर्यात ग्राहक होते. भारताने आर्मेनियाला ही प्रणाली पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये आर्मेनियाने दोन वर्षांत याची निर्यात पूर्ण करण्याची ऑर्डर दिली आहे. भारताने आर्मेनियाला पिनाका निर्यात केल्याने अझरबैजानने निषेध नोंदवला होता. अझरबैजानच्या राष्ट्रपतींचे परराष्ट्र धोरण सल्लागार हिकमेट हाजीयेव यांनी आर्मेनिया आणि भारत यांच्यातील लष्करी सहकार्याच्या विस्ताराबाबत चिंता व्यक्त करीत देशातील भारतीय राजदूत श्रीधरन मधुसुधनन यांची भेट घेतली होती. तसेच आर्मेनियाला प्राणघातक शस्त्रे पुरविण्याच्या भारताच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली. नागोर्नो-काराबाख प्रदेशाच्या नियंत्रणासाठी आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये संघर्ष सुरू आहे. सप्टेंबर २०२० मध्ये त्यांच्यात ४५ दिवस युद्ध चालले, जे रशियाच्या मध्यस्थीने शांतता कराराने थांबले.

हेही वाचा : आर्यन झाला अनाया: क्रिकेटर संजय बांगर यांच्या मुलाने केलेली ‘हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी’ची प्रक्रिया कशी होते? त्याचे दुष्परिणाम काय?

पिनाकाची अमेरिकेच्या ‘HIMARS’शी तुलना

भारतीय संरक्षण अधिकारी पिनाकाची तुलना अमेरिकेच्या HIMARS शी करतात आणि पिनाका भारताच्या शस्त्रागारातील सर्वोत्तम लांब पल्ल्याच्या शस्त्रांपैकी एक असल्याचे सांगतात. HIMARS रॉकेट १३ फूट लांब आहे, जे गाइडेड मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टीम (GMLRS) म्हणूनही ओळखली जाते. प्रत्येक रॉकेटमध्ये २००-पाऊंड, उच्च-स्फोटक वॉरहेड आहेत आणि जीपीएस हे सुनिश्चित करते की, प्रत्येक रॉकेट नियुक्त लक्ष्य बिंदूच्या १६ फूट आत उतरू शकेल. HIMARS १९९३ मध्ये पहिल्यांदा सार्वजनिकरीत्या दिसले. HIMARS ने आपली जागतिक उपस्थिती वाढवली आहे आणि जॉर्डन, सिंगापूर व संयुक्त अरब अमिरातीसह अनेक देशांमध्ये त्याची निर्यात केली जाते. परंतु, सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात HIMARS ची प्राणघातकता जगप्रसिद्ध झाली आहे. वॉशिंग्टनने जून २०२२ च्या सुरुवातीला पहिली चार HIMARS युक्रेनला पाठवली आणि जुलैच्या अखेरीस युक्रेनियन सैन्याने १०० पेक्षा जास्त लष्करी लक्ष्यांवर HIMARS चा वापर करून, हल्ला केल्याचा दावा केला होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why there is a growing demand for indias pinaka rocket system rac