इंद्रायणी नार्वेकर
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणी साठा एका बाजूला कमी होत असताना मुंबई महापालिकेने एप्रिल महिन्यापासून तीन नवीन जलतरण तलाव सुरू केले आहेत. पाणीसाठा आटू लागला की एके काळी तरण तलावांचा पाणीपुरवठा थांबवण्यात येत असे. मग सद्यःस्थितीत तलाव सुरू ठेवणे योग्य आहे का यावर चर्चा सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने मुंबई महापालिकेने सुरू केलेले जलतरण तलाव, त्याला होणारा पाणीपुरवठा, पाण्याचा वापर अशा मुद्द्यांचा आढावा
मुंबई महापालिकेचे एकूण जलतरण तलाव किती?
मुंबई महानगरपालिकेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून तीन नवीन जलतरण तलाव सुरू केले आहेत. अंधेरी पूर्व, वरळी आणि विक्रोळी येथे हे तलाव सुरू झाले आहेत. मुंबई महापालिकेचे एकूण १३ तलाव सध्या विविध ठिकाणी सुरू आहेत. दादर, कांदिवली, दहिसर आणि चेंबूर येथील तरण तलाव पालिकेमार्फत चालवले जातात. तर मुलुंड येथील प्रियदर्शिनी क्रीडा संकुल आणि अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल येथील जलतरण तलाव हे एका संस्थेला चालवण्यासाठी देण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात अंधेरी (पश्चिम) येथील गिल्बर्ट हिल जलतरण तलाव, अंधेरी (पूर्व) येथील कोंडिविटा गाव जलतरण तलाव, वरळी येथील वरळी जलाशय टेकडी जलतरण तलाव, विक्रोळी (पूर्व) येथील टागोर नगर जलतरण तलाव, वडाळा येथील वडाळा अग्निशमन केंद्र जलतरण तलाव, दहिसर (पश्चिम) येथील कांदरपाडा परिसरातील जलतरण तलाव आणि मालाड (पश्चिम) येथील चाचा नेहरू मैदानजवळचा जलतरण तलाव सुरू करण्यात आले. मुंबईत खासगी तलाव किती आहेत, याची मात्र काहीही आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध नाही.
हेही वाचा >>>‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
धरणात सध्या किती पाणीसाठा आहे?
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा सध्या केवळ २७ टक्के आहे. हा पाणीसाठा गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी आहे. केवळ दीड दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणांत मिळून ३ लाख ९६ हजार ३२७ दशलक्षलीटर म्हणजेच २७.३८ टक्के पाणीसाठा आहे.
मुंबईला दररोज किती पाणी पुरवठा केला जातो?
मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्षलीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यानुसार पुढील केवळ दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. पालिकेच्या नियोजनानुसार एक टक्का पाणी मुंबईकरांची तीन दिवसांची मागणी पूर्ण करते. म्हणजेच महिन्याला सुमारे १२ ते १३ टक्के पाण्याचा वापर होतो. मात्र उन्हाच्या झळा बसू लागल्या असून उन्हामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असते. तसेच जूनमध्ये पावसाला वेळेवर आणि पुरेशी सुरुवात होत नाही. त्यामुळे हे पाणी पुरवण्याचे नियोजन जुलै महिन्यापर्यंत करावे लागते.
हेही वाचा >>>विश्लेषण: पंतप्रधान आवास योजनेची गती का मंदावली?
जलतरण तलावाला किती पाणी लागते?
जलतरण तलावाच्या क्षमतेनुसार पाण्याची आवश्यकता असते. साधारणपणे एका तलावात २५ लाख लीटर पाणी असते. मात्र हे पाणी एकदाच लागते. रोज हे पाणी अतिसूक्ष्म गाळणी यंत्रातून गाळून पुन्हा-पुन्हा वापरले जाते. त्यामुळे वर्षभर पाणी बदलण्याची वेळ येत नाही. मात्र जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांना आंघोळीसाठी पाणी लागते. खाजगी तलाव किती आहेत याची आकडेवारी नसल्यामुळे त्याकरिता किती पाणी लागते याचा हिशोब पालिकेकडे नाही.
पाणी गाळण्याची प्रक्रिया कशी असते?
जलतरण तलावातील पाणी अतिसूक्ष्म अशा अत्याधुनिक गाळणी यंत्रातून गाळले जाते. त्यातून अगदी २० मायक्रॉनपर्यंत पाण्यातील कचरा गाळला जातो. पाण्यात क्लोरीन मिसळून दूषित द्रव्ये नष्ट केली जातात. त्यामुळे पाणी नितळ दिसते. पाणी गाळण्याची ही प्रक्रिया अखंड सुरू असते. केवळ रात्रीच्या वेळी ही प्रक्रिया थांबवण्यात येते. उन्हामुळे पाण्यात शेवाळे जमते व त्यामुळे पाणी गाळणी यंत्रात बिघाड होण्याची शक्यता असते. त्यामुळे दुपारीही पाणी गाळण्याची प्रक्रिया सुरू असते.
पाणी कपातीची आवश्यकता आहे का?
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा कमी झालेला असला तरी पाणी कपातीची गरज नसल्याची ग्वाही पालिका प्रशासनाने दिली आहे. राज्य शासनानेदेखील मुंबईसाठी राखीव साठ्यातून पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याची आवश्यकता नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.