किरकोळ बाजारात टोमॅटो पुन्हा ५० ते ६० रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत. ही दरवाढ का झाली, दरवाढीमागील कारणे काय आहेत आणि ही दरवाढ किती दिवस राहील याविषयी….
टोमॅटोच्या दरात वाढ किती आणि कशी झाली?
टोमॅटोचे दर किरकोळ बाजारात सध्या प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांवर गेले आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये २० ते ३० किलोंवर होते. दहा दिवसांत दरात १५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईसह पुणे, नाशिकमध्येही दरवाढ झाली आहे. मागील सहा महिन्यांपासून टोमॅटोच्या दरात मोठा चढ-उतार होत राहिला आहे. मे महिन्यात टोमॅटो सरासरी १५ ते ३० रुपयांच्या दरम्यान होते. दर वर्षी उन्हाळ्यात दर वाढतात म्हणून शेतकरी उन्हाळ्यात टोमॅटोचे पीक घेतात. पण, यंदाच्या उन्हाळ्यात दर मिळाले नाहीत. शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यांवर, शेतींच्या बांधावर फेकून दिले होते. त्यानंतर दरवाढ सुरू झाली. जूनमध्ये दर ८० ते १०० रुपये किलोंवर गेले. जुलैमध्ये १८० ते २०० रुपयांवर गेले. ऑगस्टमध्ये १६० ते २०० रुपयांवर आणि ऑगस्टअखेर ८० ते १२० रुपयांवर होते. राज्यासह दिल्ली आणि उत्तर भारताला दरवाढीचा सामना करावा लागला. सप्टेंबरमध्ये २५ ते ३० आणि ऑक्टोबरमध्ये ३० ते ४० रुपयांवर दर होते, ते आता पुन्हा ५० ते ६० रुपये किलोंवर गेले आहेत.
हेही वाचा : विश्लेषण: समूह विद्यापीठे म्हणजे काय?
दरवाढीमागील नेमके कारण?
राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणवर घटली आहे. ही घट तब्बल ३५ टक्क्यांपर्यंत आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाल्याचे घाऊक व्यापारी शंकर पिंगळे म्हणाले, की सातारा, सोलापूर, पुण्यातून मुंबईत होणारी टोमॅटोची आवक घटली आहे. सध्या केवळ नाशिकमधून आवक होत आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून होणारी आवकही बंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत टोमॅटोच्या दरात फक्त १० दिवसांत १५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुणे आणि नाशिकच्या किरकोळ बाजारात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. आंध्र प्रदेश, तेलगंणा आणि मध्य प्रदेश ही प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्ये आहेत. सप्टेंबरमधील पावसामुळे मध्य प्रदेशातील पीक खराब झाले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील पीक ईशान्य मोसमी पावसामुळे अडचणीत आले आहे. त्यामुळे देशभरातच टंचाईची स्थिती निर्माण होऊन दरवाढ झाली आहे.
टोमॅटोची आवक का घटली?
मे महिन्यात टोमॅटोच्या दरात घसरण झाली होती. टोमॅटो दर किरकोळ १० ते ३० रुपये किलोंवर गेले होते. शेतकऱ्यांना किलोला जेमतेम पाच ते सहा रुपये दर मिळाला. काढणी, वाहतुकीचाही खर्च परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो शेतीच्या बांधावर, रस्त्यांवर फेकून दिले होते. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत किरकोळ बाजारात टोमॅटो २०० रुपये किलोंवर गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जुलै- ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर लागवड केली. राज्याचा विचार करता खरीप हंगामात राज्यात सरासरी ४० हजार हेक्टरवर लागवड होते. त्यांपैकी जुलैअखेर २० हजार हेक्टरवरच लागवड झाली होती. जुलै – ऑगस्ट – सप्टेंबर महिन्यांत राज्यात टोमॅटोची चांगली लागवड झाली होती. त्यापासून आजवर चांगले उत्पादन मिळाले. आता सप्टेंबरपूर्वी झालेल्या लागणीपासून टोमॅटो मिळणे कमी झाले आहे. जुन्या लागवडीपासून टोमॅटो कमी मिळत असल्यामुळे त्या काढून रब्बी हंगामातील लागवडी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे बाजारात होणारी आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे.
हेही वाचा : तब्बल १५ वर्षांनंतर न्याय, पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरण काय आहे? जाणून घ्या…
रब्बी हंगामात किती लागवड झाली?
राज्यात रब्बी हंगामात सरासरी २० हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड होते. यंदा २० नोव्हेंबरपर्यंत फक्त १६९० हेक्टरवर टोमॅटोची लागवड झाली आहे. पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणीच लागवड झाली आहे. रब्बी हंगामात नगरमध्ये ४२१, पुण्यात ३२०, सोलापूर ९४९ आणि साताऱ्यात ५७९ हेक्टरवर लागवड झाली आहे. नाशिक परिसरात खरिपातील लागवड काढल्यानंतर लागवडी सुरू होतील. रब्बी हंगामातील लागवडी नोव्हेंबरअखेरपर्यंत होत राहतील, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. अपुऱ्या पावसाचा रब्बी हंगामातील लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. अपेक्षित वेगाने लागवडी होताना दिसत नाहीत. बारामती कृषी विज्ञान केंद्रातील भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. यशवंत जगदाळे यांनी, पाण्याअभावी टोमॅटो लागवडीवर परिणाम झाला असून, रोपवाटिकांतील टोमॅटो रोपांच्या मागणीत ३० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे म्हटले आहे. नोव्हेंबरअखेर लागवडी होणार असल्या, तरीही सरासरीइतकी लागवड होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे बाजारात टोमॅटोचा काहीसा तुटवडा जाणवू शकतो.
हेही वाचा : मोदींची मुंबई भेट, दिग्विजय सिंहांचा दावा अन् तीन राजीनामे; मुंबई हल्ल्यानंतर भारताच्या राजकारणात काय घडलं?
टोमॅटोच्या दरात दिलासा कधी?
ऑगस्ट महिन्यात दिल्लीसह उत्तर भारतात टोमॅटो २०० रुपये प्रति किलोंवर गेले होते. तशी स्थिती आता उद्भवण्याची शक्यता नाही. टोमॅटो लागवड वर्षभर कमी-जास्त प्रमाणात होत असते. त्यामुळे आता एकापाठोपाठ एक प्लॉट तोडणीला येईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे टोमॅटोच्या दरात तेजी राहील, दर सरासरी ८० रुपये किलोपर्यंत जातील. डिसेंबरअखेरपासून रब्बीतील टोमॅटो बाजारात येण्यास सुरुवात होईल. त्यानंतर दरात दिलासा मिळेल. पण, पाण्याअभावी टोमॅटोसह सर्वच भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणीही पाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्यामुळे उन्हाळाभर भाजीपाल्याच्या दरात तेजी राहण्याचा अंदाज आहे.
dattatray.jadhav@expressndia.com