काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप बेटांवरील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून समाजमाध्यमांवर काही फोटो शेअर केले होते. या फोटोंवर मालदीवच्या काही मंत्र्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे लक्षद्वीप विरुद्ध मालदीव असा वाद रंगला होता. या वादादरम्यान अनेक भारतीयांनी आपली मालदीव भेट रद्द करून लक्षद्वीपला जाण्याचा निर्णय घेतला होता. याच वादामुळे लक्षद्वीप भारतभरात चर्चेत आले. याच पार्श्वभूमीवर लक्षद्वीप आणि मालदीव येथील पर्यटनाची स्थिती काय आहे? मालदीवकडे पर्यटकांचा ओढा जास्त का असतो? लक्षद्वीपपुढे सध्या कोणत्या अडचणी आहेत? हे जाणून घेऊ या…

मालदीव हा साधारण ११९० प्रवाळ बेटांचा तसेच २० विखुरलेल्या बेटांचा एक द्वीपसमूह आहे. हा द्वीपसमूह केरळ आणि श्रीलंकेच्या नैऋत्येस उत्तर मध्य हिंद महासागरात पसरलेला असून त्याची माले ही राजधानी आहे. तिरुअनंतपूरमच्या साधारण ६०० किमी अंतरावर हे द्वीपसमूह आहे.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
dubai visa policy
दुबईचा व्हिसा मिळवताना भारतीय पर्यटकांना अडचणी का येत आहेत? काय आहेत नवे नियम?
29 villages Vasai Virar, Vasai Virar Municipal Corporation, Vasai Virar,
२९ गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश, ३१ हजार हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी
Green chillies from Vidarbha, Green chillies,
विदर्भातील हिरवी मिरची थेट दुबईच्या बाजारात
Kuwait Bank Fraud: Kerala Nurses Under Scrutiny
Kerala Nurses Fraud : १४०० नर्सेस, ७०० कोटी आणि गल्फ बँक… कुवेतमधील अर्थिक घोटाळ्याचे काय आहे केरळ कनेक्शन?
Indian Foreign Secretary Vikram Misri visits Bangladesh
परराष्ट्र सचिव मिस्राी आज ढाक्यात; बांगलादेशला दोन्ही देशांतील तणाव निवळण्याची आशा
Naxal-free, India, Naxalism, Naxal,
देशातील ६० जिल्हे नक्षलमुक्त ? जाणून घ्या, देशातील नक्षलवादाची स्थिती

लक्षद्वीपचा अर्थ शंभर बेटांचा समूह

तर लक्षद्वीपचा संस्कृत आणि मल्याळम अर्थ हा शंभर बेटांचा समूह असा होतो. हा द्वीपसमूह एकूण ३६ प्रवाळ बेटांचा समूह आहे. हा द्वीपसमूह एकूण ३२ स्वेअर किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. भारताच्या केंद्रशासित प्रदेशांपैकी लक्षद्वीप हा आकाराने सर्वांत लहान प्रदेश आहे. लक्षद्वीप हा द्वीपसमूह कोचीपासून २२० किमी ते ३३० किमी अंतरावर असलेल्या मालदीवच्या उत्तरेस आहे. या दोन्ही द्वीपसमूहांना वेगवेगळी नावे असली तरी ते एकाच प्रवाळ बेटसमूहाचा भाग आहेत.

लक्षद्वीपला किती पर्यटक भेट देतात?

लक्षद्वीप या बेटसमूहांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या ही मालदीवच्या तुलनेत फारच कमी आहे. भारतातील इतर पर्यटनस्थळांच्या तुलनेतदेखील लक्षद्वीपला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या इंडिया टुरिझम स्टॅटिस्टिक्स २०१९ नुसार लक्षद्वीपला २०१८ साली एकूण १३१३ विदेशी, तर १० हजार ४३५ भारतीय पर्यटकांनी भेट दिली होती. २०१७ साली हीच संख्या अनुक्रमे १०२७ आणि ६६२० एवढी होती.

२०१३-१४ या काळात ५२२७७ भारतीय, तर ३९८ परदेशी पर्यटकांनी लक्षद्वीपला भेट दिली होती; तर २०१४-१५ या काळात एकूण ७३१५ भारतीय, तर ४३७ परदेशी पर्यटकांनी लक्षद्वीपला भेट दिली होती.

मालदीवला किती पर्यटक भेट देतात?

लक्षद्वीपच्या तुलनेत मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयानुसार तेथे १७ जानेवारी २०२४ पर्यंत साधारण एक लाख, एक हजार ६२६ पर्यटकांनी भेट दिलेली आहे. यामध्ये साधारण सहा हजार विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. २०२३ साली साधारण १.८७ दशलक्ष पर्यटकांनी मालदीवला भेट दिली होती. हीच संख्या २०२२ मध्ये १.६७ दशलक्ष होती. करोना महासाथीपासून मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या चांगलीच वाढलेली आहे. २०२३ साली साधारण दोन लाख भारतीय नागरिकांनी मालदीवला भेट दिलेली आहे. हे प्रमाण एकूण पर्यटकांच्या ११.२ टक्के आहे. २०२२, २०२१, २०२० सालातही हे प्रमाण अनुक्रमे १४.४ टक्के, २२ टक्के आणि ११.३ टक्के होते.

पर्यटकांची मालदीवला पसंती का?

जगातील वेगवेगळ्या भागांतून पर्यटक मालदीवला भेट देतात. हे एक आकर्षक असे पर्यटनस्थळ झालेले आहे. गेल्या अनेक वर्षांत मालदीव सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी मोठा खर्च केलेला आहे. मालदीवच्या पर्यटन विकासासाठी १९९६-२००५ असा एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला होता. येथील पर्यटन विकासाला १९७२ साली अवघ्या ६० टुरिस्ट बेडपासून सुरुवात झाली.

मालदीवच्या जीडीपीमध्ये पर्यटनाचा ३० टक्के वाटा

सध्या मालदीव हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आलेले आहे. मालदीवच्या एकूण जीडीपीमध्ये पर्यटनाचा वाटा हा ३० टक्के आहे, तर मालदीवला एकूण परदेशी चलनातील साधारण ६० टक्के चलन हे एकट्या पर्यटनातून मिळते. एअर इंडिया, विस्तारा, इंडिगो अशा वेगवेगळ्या ४० विमान वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्या मालदीवकडे जाण्यासाठी वाहतूकसेवा पुरवतात.

मालदीवमध्ये एकूण १८० रिसॉर्ट, १५ हॉटेल्स

मालदीवमध्ये येण्यासाठीचे नियम साधे आणि शिथील आहेत. भारत, रशिया, चीन, कझाकिस्तान अशा वेगवेगळ्या देशांतील पर्यटकांना मालदीव विना व्हिसा प्रवेश देतो. १७ जानेवार २०२४ पर्यंत मालदीवमध्ये एकूण १८० रिसॉर्ट, १५ हॉटेल्स, ८११ गेस्टहाऊस, १४० सफारी व्हेसल्स आहेत. या सर्व सुविधांच्या माध्यमातून १७ जानेवारी २०२४ पर्यंत येथे एकूण ६२ हजार बेड्स होते.

लक्षद्वीप आणि मालदीवमध्ये फरक काय?

मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षद्वीपच्या तुलनेत अधिक आहे. त्याची अनेक कारणे आहेत. यातील पहिले कारण म्हणजे मालदीव सरकारने पर्यटन विकासासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत. तर दुसरे कारण हे भौगोलिक आहे. लक्षद्वीपमध्ये फक्त १० बेटे अशी आहेत, ज्यामध्ये लोकवस्ती आहे. त्यामुळे सहाजिकच येथे पर्यटन विकासाला मर्यादा येतात. असे असले तरी पर्यावरणाची हानी आणि स्थानिक अधिवासाला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता भारत सरकारने लक्षद्वीपच्या पर्यटन विकासाला अधिक चालना दिलेली नाही. तेथील पर्यटन विकासासाठी भरघोस आर्थिक तरतूदही केलेली नाही.

मोठ्या संख्येने पर्यटक आल्यास अडचण

पी पी मोहम्मद फैजल हे लक्षद्वीपचे खासदार आहेत. ते २०१४ सालापासून लक्षद्वीपचे प्रतिनिधित्व करतात. लक्षद्वीपची पर्यटकांना सामावून घेण्याची क्षमता नाही. सध्या अनेक सेलिब्रिटी लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, प्रत्यक्ष पाहायचे झाले तर ते काहीसे चुकीचे आहे. “आम्ही मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांची सोय करू शकत नाही, कारण येथील पर्यावरण नाजूक आणि संवेदनशील आहे”, असे मोहम्मद म्हणाले.

सध्या येथे पर्यटकांसाठी काय सुविधा आहेत?

लक्षद्वीपमधील बंगाराम या बेटावर फक्त ६७ कॉटेज आहेत. करोना महासाथीनंतर कावरात्ती आणि मिनिकॉय या भागाचे नूतनीकरण करणे अद्याप बाकी आहे. कावरात्तीमध्ये एकूण १४ कॉटेज असू शकतात. सध्या या परिसराला पर्यटक भेट देऊ शकत नाहीत. कारण येथे पायाभूत सुविधा नाहीत, असे फैजल यांनी सांगितले. लक्षद्वीपमध्ये यायचे असेल तर लक्षद्वीप प्रशासनाचा परवाना असणे बंधनकारक आहे. त्यामुळेदेखील पर्यटकांना येथे येणे थोडे अडचणीचे ठरते.

मर्यादित विमान वाहतूक सेवा

लक्षद्वीपला पोहोचण्यासाठी मर्यादित विमान वाहतूक सेवा आहे. कोची आणि अगाट्टी या मार्गाने प्रवास करणारे एक ७२ आसनी छोटे विमान रोज एक फेरी मारते. याच विमानातून पर्यटक आणि स्थानिकांना प्रवास करावा लागतो. लक्षद्वीप आणि कोची असा प्रवास करणाऱ्या एकूण सात प्रवासी फेरींपैकी (प्रवासी जहाज) पाचच फेरी कार्यरत आहेत. जहाजाने प्रवास करायचा असल्यास भेट देण्यासाठी निवडलेल्या बेटानुसार १४ ते १८ तास लागू शकतात.

जलमार्गाच्या प्रवासास मर्यादा

कोचीवरून लक्षद्वीपला जाणाऱ्या या पाच प्रवासी जहाजांतून एकूण २१०० प्रवासी प्रवास करू शकतात. मात्र, पाचही जहाज रोजच उपलब्ध असतात असे नाही. एका वेळी पक्त १५०० ते १९०० जागाच उलब्ध असतात. यातीलही मोजक्याच जागा या पर्यटकांसाठी आरक्षित असतात. जलमार्गाने प्रवास करण्यासाठी ही जहाजे अपुरी आहेत, अशी तक्रार लक्षद्वीपमध्ये राहणाऱ्या स्थानिकांकडून केली जाते.

पीपीपी तत्त्वाने पर्यटन विकासाला परवानगी, पण….

लक्षद्वीपचे रहिवासी फरीद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२० साली लक्षद्वीप पर्यटन धोरण प्रकाशित करण्यात आले. मात्र, या धोरणाची अंमलबजावणी झाली की नाही, याकडे कोणीही फारसे लक्ष दिले नाही. या धोरणानुसार येथे खासगी, सार्वजनिक तसेच पीपीपी तत्त्वाने पर्यटन विकासाला परवानगी देण्यात आली होती. या धोरणानुसार अगट्टी आणि कावरात्ती या भागांत टुरिस्ट होम आणि रिसॉर्टची उभारणी करण्यासाठी अर्जही मागवण्यात आले होते. मात्र, अद्याप अंतिम परवानगी मिळणे बाकी आहे. अजूनही पर्यटकांना लक्षद्वीपमध्ये येण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. गुंतागुंतीच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ही परवानगी दिली जाते, असे खान यांनी सांगितले.

पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा

दरम्यान, असे असले तरी येथील खासदार फैजल आणि स्थानिक रहिवासी हे दोघेही सकारात्मक आहेत. नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यामुळे आता लवकरच या प्रदेशाच्या विकासाला चालना मिळेल, पर्यटनात वाढ होईल, अशी अपेक्षा या दोघांना आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी यांनीदेखील स्वत: लक्ष घातले आहे, असे या दोघांना वाटते.

Story img Loader