अमेरिकेतील बेकायदा भारतीय स्थलांतरितांना घेऊन जाणारे अमेरिकेचे लष्करी विमान भारताच्या दिशेने निघाले आहे. २०५ भारतीय नागरिकांना घेऊन सी-१७ हे विमान मंगळवारी (४ फेब्रुवारी) भारतीय वेळेनुसार पहाटे ३ च्या सुमारास टेक्सासच्या सॅन अँटोनियो येथून निघाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बेकायदा स्थलांतराला आळा घालण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. बेकायदा स्थलांतरितांना विमानाद्वारे त्यांच्या देशात हद्दपार केले जात आहे. हद्दपारीसाठी प्रामुख्याने लष्करी विमानांचा वापर केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हद्दपारीसाठी लष्करी विमानांचा वापर अमेरिकेत सामान्य नाही. कारण- ते खूप महाग आहे. अलीकडे कोलंबियाने निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या लष्करी विमानाला उतरू देण्यास नकार दिला होता. राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी सांगितले की, ते फक्त नागरी विमाने स्वीकारतील. परंतु, ट्रम्प प्रशासन लष्करी विमानांचा वापर का करतेय? या विमानांना नक्की किती खर्च येतो? त्याविषयी जाणून घेऊ…

लष्करी विमान प्रवास ५ पट महाग

अमेरिका सामान्यत: व्यावसायिक चार्टरद्वारे लोकांना हद्दपार करते, जे नियमित व्यावसायिक विमानांसारखे दिसते आणि ते यूएस कस्टम व इमिग्रेशन इन्फोर्समेंट (आयसीई)द्वारे ऑपरेट केले जातात. आजही चार्टर विमानांचा वापर बेकायदा स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी केला जातो. मात्र, आता बेकायदा स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी लष्करी सी-१७ चा वापर केला जात आहे. रॉयटर्सने दोन विमानांच्या तुलनात्मक किमतीची गणना केली आहे. अलीकडेच ग्वाटेमालाला पाठविण्यात आलेल्या लष्करी विमानाचा प्रति प्रवासी खर्च ४,६७५ डॉलर्स असण्याची शक्यता आहे. त्याच मार्गावर अमेरिकन एअरलाइन्समधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला ८५३ डॉलर्सपेक्षा जास्त खर्च येतो.

२०५ भारतीय नागरिकांना घेऊन सी-१७ हे विमान मंगळवारी (४ फेब्रुवारी) भारतीय वेळेनुसार पहाटे ३ च्या सुमारास टेक्सासच्या सॅन अँटोनियो येथून निघाले. (छायाचित्र-रॉयटर्स)

इमिग्रेशन इन्फोर्समेंट उड्डाणांबद्दल ‘रॉयटर्स’मध्ये सांगण्यात आले, “कार्यवाहक आयसीई संचालक टाय जॉन्सन यांनी एप्रिल २०२३ च्या अर्थसंकल्पाच्या सुनावणीदरम्यान खासदारांना सांगितले की, निर्वासित उड्डाणात सामान्यतः १३५ प्रवाशांचा समावेश असतो. त्यात प्रति उड्डाणाचा खर्च १७,००० डॉलर्स येतो.” याचा अर्थ प्रति व्यक्ती ६३० डॉलर्स खर्च होतो.” सी-१७ लष्करी वाहतूक विमान चालवण्याची अंदाजे किंमत २८,५०० डॉलर्स प्रति तास आहे, ‘रॉयटर्स’च्या वृत्तात म्हटले आहे. भारतातील निर्वासन विमान सध्या सर्वात लांब आहे. आतापर्यंत अशी उड्डाणे ग्वाटेमाला, पेरू, होंडुरास व इक्वेडोर येथे गेली आहेत. कोलंबियाच्या दिशेनेही एक लष्करी विमान गेले होते; परंतु देशाने स्थलांतरितांना परत आणण्यासाठी स्वतःची विमाने पाठवली होती.

ट्रम्प यांना हद्दपारीसाठी लष्करी विमाने का वापरायची आहेत?

हद्दपारीसाठी लष्करी विमानांचा वापर करण्याचा संबंध प्रतीकात्मकतेशी आहे. ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरितांना ‘एलियन’ आणि ‘गुन्हेगार’ असे संबोधले आहे. त्यांना गुन्हेगारांसारखे पाठवले जावे, हाच लष्करी विमानांच्या वापरामागील हेतू आहे. बेकायदा स्थलांतरितांना हात-पाय बांधून गुन्हेगारांसारखे लष्करी विमानांमधून पाठवले जात असल्याचे समोर आले आहे. या कृतीद्वारे अमेरिका बेकायदा स्थलांतरितांबाबत किती कडक आहे, हे ट्रम्प यांना दाखवून द्यायचे आहे.

अलीकडे रिपब्लिकन खासदारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “इतिहासात प्रथमच आम्ही बेकायदा स्थलांतरितांना लष्करी विमानांमध्ये भरून पाठवीत आहोत. ते ज्या ठिकाणाहून आले होते तिथे त्यांना परत पाठवत आहोत. जे लोक अनेक वर्षे आम्हाला मूर्ख समजून हसत होते, ते आता पुन्हा आमचा आदर करतील.” २४ जानेवारी रोजी, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी हात बांधलेल्या स्थितीतील लष्करी विमानाकडे चालत जात असणाऱ्या स्थलांतरितांची छायाचित्रे पोस्ट केली. त्यांनी लिहिले, “हद्दपारीची उड्डाणे सुरू झाली आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प संपूर्ण जगाला एक मजबूत आणि स्पष्ट संदेश पाठवत आहेत. जर तुम्ही बेकायदा अमेरिकेत प्रवेश केला, तर तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.”

ट्रम्प यांचा बेकायदा स्थलांतरितांना त्वरित हद्दपार करण्याकडे कल आहे. स्थलांतरितांना ताब्यात घेऊन त्यांना वेळ देण्याऐवजी, ते हद्दपार करण्याचा निर्णय घेत आहेत. “पुढील २० वर्षे त्यांनी आश्रयाला राहावे, असे मला वाटत नाही. मला त्यांना बाहेर काढायचे आहे आणि त्यांच्या देशात परत पाठवायचे आहे,” असे ते डिसेंबरमध्ये म्हणाले. स्थलांतरितांना बेड्या ठोकून, लष्करी विमानांतून परत पाठवले जात असल्याचे दृश्य हा विशेषत: लॅटिन अमेरिकेतील देशांसाठी एक संवेदनशील मुद्दा आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने अलीकडील लेखात म्हटले की, अमेरिकन लष्कराच्या विमानांचा वापर करून बेकायदा स्थलांतरितांना पाठवण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या योजनेवर लॅटिन अमेरिकन प्रदेशातील अनेक देश संतप्त आहेत.

विशेषतः पेट्रो आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांसारख्या काही प्रादेशिक डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी, तसेच मेक्सिको व ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी अमेरिकेच्या या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांना अमेरिकेच्या या कृतीमुळे तो काळ आठवतो, जेव्हा अमेरिकेने कम्युनिझमला पराभूत करण्याच्या नावाखाली क्रांतिकारी चळवळींचा एक भाग म्हणून या प्रदेशात गुप्त अमेरिकन लष्करी कारवाया केल्या. अमेरिकन सैन्याच्या उपस्थितीमुळे मेक्सिकोसारख्या देशांच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाच्या कल्पनेला धोका निर्माण होऊ शकतो. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी म्हटले आहे, “ते त्यांच्या सीमेमध्ये कार्य करू शकतात. जेव्हा मेक्सिकोचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही आमच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करतो आणि समन्वय साधण्यासाठी संवाद साधतो.”