अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (२ एप्रिल) ‘जशास तसे‘ आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली. या घोषणेनुसार भारतावर तब्बल २६ टक्के व्यापार कर लागू केला जाणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व देशांवर १० टक्के कर लागू केले असून, काही निवडक देशांवर रेसीप्रोकल टेरिफ लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी जगातील काही दुर्गम प्रदेशांसह अनेक देशांवर परस्पर कर लादले आहेत. त्यामध्ये अंटार्क्टिकाजवळ असणाऱ्या ओसाड, निर्जन ज्वालामुखी बेटांवरदेखील १० टक्के कर लादण्यात आला आहे. याचाच अर्थ असा की, ज्या प्रदेशात कोणाचेही वास्तव्य नाही, त्या प्रदेशावरही कर लादण्यात आला आहे. त्यामागील कारण काय? जाणून घेऊया.
डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
उत्पादनाला चालना देण्यासाठी हे शुल्क लादण्यात आल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे सांगणे आहे. “आपल्या देशाला जवळच्या आणि दूरच्या राष्ट्रांनी, मित्र आणि शत्रू अशा दोघांनीही लुटले आहे,” असे म्हणत ‘जशास तसे‘ शुल्क लागू करण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. सर्व देशांसह ट्रम्प यांनी हर्ड आणि मॅकडोनाल्ड बेटांवरही कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. या बेटांकडून १० टक्के कर आकरण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे या प्रदेशांत माणसांचे वास्तव्यच नाही. त्यामुळे असा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्नही उपस्थित होताना दिसत आहे.
हर्ड आणि मॅकडोनाल्ड बेटे कुठे आहेत?
हर्ड आणि मॅकडोनाल्ड बेटे दक्षिण महासागरात आहेत. ही बेटे अंटार्क्टिकापासून सुमारे १,७०० किलोमीटर आणि पर्थपासून सुमारे ४,१०० किलोमीटर नैर्ऋत्य दिशेला आहेत. संयुक्त राष्ट्राच्या (युनेस्को) माहितीनुसार, ही ज्वालामुखीयदृष्ट्या सक्रिय अशी उपअंटार्क्टिक बेटे आहेत आणि या प्रदेशातील अशा स्वरूपाची ही एकमेव बेटे आहेत. हा ज्वालामुखी म्हणजे पृथ्वीवरील खिडकी आहे. त्यातून भूगर्भातील हालचाली आणि हिमनदीची गतिशीलता पाहता येते. ही बेटे ऑस्ट्रेलियाच्या बाह्य प्रदेशात आहेत.
या बेटांपर्यंत पोहोचायचे असल्यास पर्थपासून दोन आठवड्यांचा बोट प्रवास करावा लागतो. मुख्य म्हणजे हर्ड या बेटावर बिग बेन या नावाने ओळखला जाणारा एक सक्रिय ज्वालामुखी आहे. हा ज्वालामुखी समुद्रसपाटीपासून २,७४५ मीटर उंच आहे आणि तो बर्फ व हिमनद्यांनी व्यापलेला आहे. तर, मॅकडोनाल्ड बेट हे खूपच लहान आहे. फक्त १०० हेक्टर क्षेत्रात पसरलेले हे बेट अनेक लहान खडक व बेटांनी व्यापलेले आहे.
या बेटांवर माणसांचे वास्तव्य आहे का?
हर्ड व मॅकडोनाल्ड ही दोन्ही बेटे पूर्णपणे निर्जन आहेत. या बेटांवर माणसांचे वास्तव्य नाही. या बेटांवर जवळजवळ एक दशकापूर्वी माणसांची नोंद करण्यात आली होती. असे असले तरी ही बेटे समुद्री पक्षी आणि सस्तन प्राण्यांसाठीचा एक महत्त्वाचा अधिवास आहेत. या बेटांवर सील, पेट्रेल, अल्बाट्रोस व पेंग्विन आढळून येतात. त्यांचे या बेटांवर प्रजनन होते. हर्ड व मॅकडोनाल्ड या बेटांना भेट द्यायची असल्यास त्यासाठी विशिष्ट परवान्याची आवश्यकता असते.
“हेलिकॉप्टर, रबर बोटी (इनफ्लेटेबल रबर बोट्स) किंवा मोठ्या जहाजावरून नेण्यात येणाऱ्या वाहनांद्वारे या बेटांवर उतरता येऊ शकते,” असे ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रोग्रामचे सांगणे आहे. १८५५ मध्ये हर्ड बेटावर पहिल्यांदा वाहन उतरल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर केवळ २४० वेळा लोकांनी या बेटाला भेट दिली आहे. मॅकडोनाल्ड बेटाला १९७१ व १९८० साली अशा केवळ दोनदा भेट दिली गेली आहे.
ट्रम्प यांनी या बेटांवर कर का लादला?
ट्रम्प यांनी उप-अंटार्क्टिक हिंद महासागरातील ऑस्ट्रेलियन प्रदेशातील सर्व निर्यातीवर १० टक्के कर लादला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन व्यापारी कर लादलेल्या देश आणि प्रदेशांच्या यादीत या बेटांचीही नावे आहेत. न्यू जर्सीचे माजी लोकप्रतिनिधी टॉम मालिनोव्स्की यांनी ‘एक्स’वर एक विनोदात्मक पोस्ट लिहिली, “हर्ड बेट आणि मॅकडोनाल्ड बेटावरील पेंग्विन खूप दिवसांपासून आपला गैरफायदा घेत आहेत आणि आता आपण त्यांच्याविरुद्ध उभे राहण्याची वेळ आली आहे.”
अमेरिकन इमिग्रेशन कौन्सिलचे वरिष्ठ फेलो आरोन रीचलिन-मेलनिक यांनी ‘एक्स’वर लिहिले, “या यादीवरून असे लक्षात येते की, व्हाईट हाऊसमध्ये काम करणाऱ्या एका इंटर्नने विकिपेडियावरील देशांची यादी पाहिली आणि त्यावर संशोधन न करता ही यादी तयार केली.” ट्रम्प प्रशासनाने या बेटांवर कर लादण्याचा निर्णय का घेतला, याचे अधिकृत स्पष्टीकरण अजून समोर आलेले नाही. मात्र, असा अंदाज वर्तविला जात आहे की, केवळ ऑस्ट्रेलियन प्रदेशात असल्याने या बेटांचा समावेश यादीत करण्यात आला आहे. याच्या अधिकृत स्पष्टीकरणासाठी ऑस्ट्रेलियन परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार विभाग व ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक विभाग यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाने टेरिफवर काय म्हटले?
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या करावर टीका केली आहे. परंतु, त्यामुळे ऑस्ट्रेलिया अमेरिकेविरोधात कारवाई करणार नाही, असे मतदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, “नॉरफोक बेटावर २९ टक्के कर लादण्यात आला आहे. मला वाटत नाही की, नॉरफोक बेट कोणत्याही दृष्टीने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे व्यापारी स्पर्धक आहेत; परंतु हा कर हे दर्शवतो की, पृथ्वीवर प्रत्येक प्रदेशात कर लादला जाऊ शकतो”. ऑस्ट्रेलियापासून सुमारे १,४०० किलोमीटर पूर्व दिशेला असलेल्या नॉरफोक बेटाची लोकसंख्या केवळ २,००० आहे.
ट्रम्प यांची सोशल मीडियावर खिल्ली
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी माणसांचा रहिवास नसलेल्या ठिकाणी कर लादल्याने, त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. एका व्यक्तीने ‘एक्स’वर लिहिले, “ट्रम्प यांनी हर्ड आयलंड आणि मॅकडोनाल्डवर १० टक्के टेरिफ लावला आहे. त्या ठिकाणी लोकसंख्या नसून केवळ पेंग्विनचे वास्तव्य आहे. पेंग्विन अमेरिकेला काय विकतात?” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “हर्ड व मॅकडोनाल्ड ही बेटे पूर्णपणे निर्जन आहेत. या प्रदेशातील लोकसंख्या शून्य आहे. मला वाटते की, आपण सीगलवर कर लादणार आहोत”. विनोद करीत तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “हर्ड व मॅकडोनाल्ड या बेटांवर राहणाऱ्या पेंग्विनवर आता पैसे देण्याची वेळ आली आहे”.