युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आपले युद्धकालीन संरक्षणमंत्री ओलेस्की रेझ्निकोव्हा यांची पदावरून उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी रुस्तेम उमेरोव्ह यांची निवड झेलेन्स्की यांनी केली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनच्या मंत्रिमंडळात झालेला हा पहिला मोठा बदल आहे. रशियाने बळकावलेली जमीन परत घेण्यासाठी युक्रेनचे सैन्य जिवाचे रान करत असताना या नेतृत्वबदलाचा किती फायदा होईल? नव्या संरक्षणमंत्र्यांसमोर कोणकोणती आव्हाने असतील? युक्रेनी सैन्य आणि जनतेचे मनोबल यामुळे उंचावेल की घटेल, या प्रश्नांची उत्तरे शोधणे महत्त्वाचे आहे.
रेझ्निकोव्ह यांची उचलबांगडी का?
रविवारी रात्री उशिरा झेलेन्स्की यांनी ‘टेलिग्राम’ या समाजमाध्यमावर रेझ्निकोव्ह यांना संरक्षणमंत्रीपदावरून हटवल्याचे जाहीर केले. “रेझ्निकोव्ह यांनी युद्ध सुरू झाल्यापासून तब्बल ५५० दिवस संरक्षणमंत्रीपद सांभाळले. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी मध्यस्थ म्हणून चांगली भूमिका बजावली. मात्र अलीकडे संरक्षण मंत्रालयात माजलेल्या गोंधळाचा त्यांच्या काही सहकाऱ्यांनी लाभ घेतला आणि युद्धकाळात भ्रष्टाचाराची प्रकरणे घडली. त्यामुळे आता मंत्रालयात नव्या नेतृत्वाची गरज आहे,” असे झेलेन्स्की यांनी लिहिले आहे. अलीकडेच लष्करी जॅकेट खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराचा याला संदर्भ असला, तरी त्यापूर्वीही साहित्य खरेदीत अनेक गैरप्रकारांचे आरोप झाले असून त्याची चौकशी सुरू आहे. यातील कोणत्या प्रकरणाचे धागेदोरे अद्याप रेझ्निकोव्ह यांच्यापर्यंत पोहोचले नसले, तरी त्यांचे नेतृत्व भ्रष्टाचार रोखण्यास असमर्थ ठरल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळेच युद्ध ऐन भरात असताना त्यांची हकालपट्टी करणे झेलेन्स्की यांना गरजेचे वाटले असावे. या घोषणेनंतर लगोलग रेझ्निकोव्ह यांनी राजीनामा दिला आहे.
हेही वाचा – ‘सनातन’ वाद; ‘द्रमुक’ पक्षाचा इतिहास काय? पेरियार यांनीही केली होती हिंदू धर्मावर टीका
रेझ्निकोव्ह यांची कारकीर्द कशी राहिली?
मुळात रेझ्निकोव्ह हे झेलेन्स्की यांच्या ‘सर्व्हंट्स ऑफ पिपल्स पार्टी’चे नेते नसून ‘युक्रेनियन डेमोक्रेटिक अलायन्स फॉर रिफॉर्म्स’ या विरोधी पक्षाचे नेते आहेत. मात्र युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाचे ढग दाटून आले असताना, नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांना झेलेन्स्की यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. पाश्चिमात्य देशांनी युद्धसाहित्याची अधिकाधिक मदत करावी, यासाठी त्यांनी यशस्वी वाटाघाटी केल्या. सुरुवातीला युक्रेनला अद्ययावत युद्धसामुग्री देण्यास हात आखडता घेणाऱ्या युरोप-अमेरिकेने युद्धकाळात सढळ हस्ते मदत केली, याचे श्रेय रेझ्निकोव्ह यांच्या मुत्सद्देगिरीला द्यावे लागेल. अगदी अलीकडे युक्रेनला एफ-१६ विमाने देण्याचे अमेरिकेने मान्य केले आहे, ही बाब उल्लेखनीय आहे. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप आणि सैन्यदलाचे मनोबल खचण्याची भीती यामुळे त्यांना हटविणे झेलेन्स्की यांना आवश्यक वाटले आहे.
नवे संरक्षणमंत्री कोण आहेत?
४१ वर्षांचे उमेरोव्हदेखील ‘होलोस पार्टी’ या विरोधी पक्षाचे ‘व्हेर्कोव्हना रादा’चे (युक्रेनचे प्रतिनिधीगृह) सदस्य आहेत. सप्टेंबर २०२२ पासून ते युक्रेनच्या राष्ट्रीय मालमत्ता निधीचे प्रमुख म्हणून काम बघत होते. नवी जबाबदारी उचलण्यासाठी त्यांनी सोमवारी या पदाचा राजीनामा दिला. आपल्या ‘क्रिमियन ततार’ (क्रिमियातील तुर्की) जमातीसाठी ते मोठ्या प्रमाणात सामाजिक काम करतात. राष्ट्रीय मालमत्ता निधीमध्ये त्यांनी केलेल्या कामाची पाश्चिमात्य राष्ट्रांनीही प्रशंसा केली आहे. उमेरोव्ह यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांच्याशी प्रचंड जवळीक आहे. आगामी काळात रशियाबरोबर वाटाघाटी करण्याची वेळ आली, तर एर्दोगन यांचा निकटवर्ती झेलेन्स्कींच्या अधिक कामाचा ठरू शकतो. युक्रेन धान्य करार पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीही या ‘ओळखी’ची मदत होऊ शकेल. मात्र युद्धकाळात मिळालेले हे पद उमेरोव्ह यांच्यासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे.
हेही वाचा – विश्लेषण: जगभरात ‘पिरोला’चा धोका वाढतोय?
उमेरोव्ह यांच्यासमोर आव्हाने कोणती?
संरक्षण मंत्रालयातील खांदेपालटाचा लष्कराच्या हालचालींवर थेट परिणाम होणार नाही, असे संरक्षणतज्ज्ञ रोमान स्वितान यांचे म्हणणे आहे. हे एका अर्थी खरे असले, तरी रशियाच्या आक्रमणाला तोंड देताना शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा याची चणचण सैनिकांना जाणवणार नाही, याची खबरदारी उमेरोव्ह यांनाच घ्यावी लागणार आहे. युद्ध सुरू झाल्यापासून डोनबास प्रांतातील १ लाख १९ हजार चौरस किलोमीटर जमीन युक्रेनने गमावली आहे. हा प्रदेश परत मिळविण्याचे खडतर आव्हान असताना सध्यातरी केवळ ड्रोन हल्ले करून रशियाची फळी भेदण्याचेच प्रयत्न सुरू आहेत. पायदळाने कूच करायची असेल, तर शस्त्रास्त्रे, रणगाडे, तोफा, चिलखती वाहने यांची गरज भासेल. त्यासाठी पाश्चिमात्य राष्ट्रांशी वाटाघाटी करून अधिकाधिक मदत पदरात पाडून घेण्याचे आव्हान उमेरोव्ह यांच्यासमोर आहे. ही जबाबदारी ते कशी पार पाडतात, त्यावर युद्धाचे परिणाम अवलंबून असतील.
amol.paranjpe@expressindia.com