दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ‘न्यूजक्लिक’शी संबंधित पत्रकारांवर ३० ठिकाणांवर सकाळी साडेसहा वाजता छापे टाकले, दिवसभर त्यांची चौकशी केली आणि दिवसअखेरीस संस्थापक प्रबीर पूरकायस्थ व मनुष्यबळ विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांना अटक केली. ‘न्यूजक्लिक’ वृत्त संकेतस्थळावर चीनकडून निधी घेऊन त्या देशाच्या बाजूने प्रचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हे सर्व प्रकरण काय आहे, याचे विविध पैलू कोणते आहेत याचा घेतलेला हा आढावा.

‘न्यूजक्लिक’ वृत्त संकेतस्थळ कशासाठी ओळखले जाते?

ज्येष्ठ पत्रकार प्रबीर पूरकायस्थ यांनी २००९ मध्ये ‘न्यूजक्लिक’ची स्थापना केली, तेच या वृत्त संकेतस्थळाचे मुख्य संपादकही आहेत. परंजॉय गुहा ठाकुरता, उर्मिलेश, अभिसार शर्मा यांच्यासारखे मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेले अनेक पत्रकार या संकेतस्थळावर सातत्याने लिखाण करत असतात, तसेच विविध विषयांवरील चित्रफितीही प्रसिद्ध करतात. हे संकेतस्थळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहे. वादग्रस्त कृषी कायदे, देशातील अल्पसंख्याकांविरोधातील हल्ले, झुंडबळी, चीनची लडाख आणि अरुणाचल प्रदेशातील घुसखोरी, मणिपूर हिंसा यासह विविध मुद्द्यांवर ‘न्यूजक्लिक’ने सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत.

Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nitin Gadkari on Omraje Nimbalkar
Maharashtra News Highlights : “ताजमहल लवकर बांधून झाला पण..”, ठाकरेंच्या खासदाराचा संसदेत मराठीत प्रश्न, नितीन गडकरींनी दिले ‘असे’ उत्तर
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
Loksatta Online organizes Fact Checking workshop Mumbai news
‘फेक न्यूज’ हा साऱ्या विश्वाचाच प्रश्न! लोकसत्ता ‘फॅक्ट चेक’ कार्यशाळेतील तज्ज्ञांचा सूर
top 10 search on google in 2024
Google Search: भारतीय गुगलवर गेल्या वर्षभरात काय शोधत होते माहितीये? गुगल सर्च रिपोर्टची माहिती आली समोर!
senior citizen who wants to remarry was defrauded by cyber thieves
पुनर्विवाहाच्या आमिषाने कर्वेनगर भागातील ज्येष्ठाची फसवणूक, ज्येष्ठाला जाळ्यात ओढून पोलीस कारवाईची धमकी
Pune Railway Station in 1965
१९६५ मध्ये पुणे स्टेशन कसं होतं? VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा – पंजाब राज्य ३.२७ लाख कोटींच्या कर्जाच्या ओझ्याखाली कसे गेले?

‘न्यूजक्लिक’विरोधात कारवाईला कधी सुरुवात झाली?

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २०२१ मध्ये सर्वात प्रथम ‘न्यूजक्लिक’ला मिळणाऱ्या परदेशी निधीबद्दल तपास करायला सुरुवात केली. ‘विदेशी योगदान नियमन कायद्या’अंतर्गत (एफसीआरए) ही कारवाई करण्यात आली. त्याच वर्षी प्राप्तिकर विभागानेही ‘न्यूजक्लिक’शी संबंधित ठिकाणी छापे टाकले होते. काही माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ईडीच्या तपासात असे आढळून आले की, ‘न्यूजक्लिक’ला तीन वर्षांच्या कालावधीत परदेशी निधीच्या स्वरूपात ४५ लाख ६० हजार डॉलर (सुमारे ३८ कोटी रुपये) मिळाले. गौतम नवलखा आणि तीस्ता सेटलवाड यांच्यासारख्या उजव्या राजकारणाला विरोध करणाऱ्या पत्रकारांसह अनेक पत्रकारांना या निधीचे वाटप करण्यात आले. यापैकी सुमारे ९ कोटी ५९ लाख रुपये थेट गुंतवणुकीद्वारे मिळाले होते तर उर्वरित निधी सेवांच्या निर्यातीच्या मार्गाने मिळाला, अशी माहिती देण्यात आली आहे. ईडीने पुरवलेल्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी १७ ऑगस्टला ‘न्यूजक्लिक’विरोधात नवीन गुन्हे दाखल केले.

‘न्यू यॉर्क टाइम्स’ने ‘न्यूजक्लिक’शी संबंधित कोणते वृत्त प्रसिद्ध केले होते?

अमेरिकेच्या प्रतिष्ठित ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने ५ ऑगस्टला प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ‘न्यूजक्लिक’ला अमेरिकी अब्जाधीश नेव्हिल रॉय सिंघम याच्याकडून कोट्यवधी रुपये मिळाले. सिंघम हा चीन सरकारचा निकटवर्तीय मानला जातो. ‘न्यूजक्लिक’ने प्रसिद्ध केलेल्या काही वृत्तांमध्ये चीनची माध्यमे आणि सरकार जी माहिती प्रसारित करत असते त्याचा समावेश होता असे ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने नमूद केले होते. त्यामध्ये ‘कोविड-१९ महासाथीला आळा घालण्यासाठी चीनने उचललेली पावले’ हा लेख, तसेच ‘नोकरदार वर्गाला प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने चीनचा इतिहास’ हा व्हिडीओ ही उदाहरणे देण्यात आली होती.

दिल्ली पोलिसांचे ‘न्यूजक्लिक’वर कोणते आरोप आहेत?

‘न्यूजक्लिक’ या वृत्त संकेतस्थळाने चीनकडून बेकायदा निधी घेतला हा दिल्ली पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमधील मुख्य आरोप आहे. हा निधी अमेरिकेच्या मार्गाने पुरवण्यात आला असेही या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. ‘बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्या’च्या (यूएपीए) विविध कलमांअंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला असल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेस वृत्तसेवेला मिळाली आहे. त्यात प्रामुख्याने कलम १६ उद्धृत करण्यात आले आहे, या कलमामध्ये दहशतवादी कारवायांसाठी शिक्षेची तरतूद आहे.

‘न्यूजक्लिक’विरोधात कोणते गुन्हे दाखल करण्यात आले आहेत?

‘न्यूजक्लिक’विरोधात यूएपीएअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये दहशतवादाशी संबंधित कलम १५ सह कलम १३ (बेकायदेशीर कृत्ये), १६ (दहशतवादी कृत्य), १७ (दहशतवादी कृत्यांसाठी निधी उभारणे), १८ (षडयंत्र रचणे) आणि २२ (क) (कंपन्या, ट्रस्टद्वारे करण्यात आलेले गुन्हे) यांचा समावेश आहे. त्याशिवाय भारतीय दंड संहितेचे कलम १५३ अ (निरनिराळ्या गटांदरम्यान शत्रुत्वास चालना देणे) आणि १२० ब (गुन्हेगारी कट रचणे) याअंतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा – विश्लेषण: प्राण्यांसाठी प्लास्टिक कसे ठरतेय जीवघेणे?

यूएपीएनुसार दहशतवादी कृत्याची व्याख्या काय आहे?

यूएपीएच्या कलम १५ मध्ये दहशतवादी कारवायांची व्याख्या करण्यात आली आहे आणि त्याअंतर्गत किमान पाच वर्षे तुरुंगवास ते जन्मठेप या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. दहशतवादी कारवाईमुळे जर कोणाचा मृत्यू झाला तर त्यासाठी मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा आहे. देशाचे ऐक्य, अखंडता, सुरक्षितता, आर्थिक सुरक्षितता किंवा स्वायत्तता धोक्यात आणण्याच्या हेतूने घडवलेली हिंसा दहशतवादी कृत्य मानले आहे. बॉम्ब, डायनामाइट किंवा इतर स्फोटकांचा वापर करून मृत्यू अथवा मालमत्तेचे नुकसान अथवा विध्वंसास कारणीभूत होणे, भारतातील कोणत्याही समुदायासाठी जीवनावश्यक असलेल्या वस्तू अथवा सेवेच्या पुरवठ्यात व्यत्यय आणणे, बनावट नोटा, नाणी अथवा अन्य सामग्रीची निर्मिती, तस्करी अथवा वितरण करून त्याद्वारे भारताच्या वित्तीय स्थैर्याचे नुकसान करणे यांचाही दहशतवादी कृत्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

‘न्यूजक्लिक’वरील कारवाईनंतर कोणत्या प्रतिक्रिया उमटल्या?

देशभरातील विविध संघटनांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. ‘न्यूजक्लिक’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर सातत्याने मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करताना दिसते. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई ही माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पत्रकार संघटनांनी केली आहे. तर बिहारमधील जातीय सर्वेक्षणातून समोर आलेल्या धक्कादायक आकडेवारीवरून देशवासीयांचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची टीका काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केली आहे. भाजपचे नेते आणि मंत्री यांनी मात्र, कायदा आपले काम करत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

nima.patil@expressindia.com 

Story img Loader