निमा पाटील
संयुक्त राष्ट्रांची निर्वासितांसाठी मदत संस्था म्हणून काम करणाऱ्या ‘यूएनआरडब्ल्यूए’च्या कर्मचाऱ्यांवर इस्रायलने हमासबरोबर दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप केला. त्यामुळे नऊ देशांनी गाझा पट्टीला केली जाणारी मदत थांबवली. मात्र, यात सामान्य पॅलेस्टिनींचे नुकसान होत असल्याचे सांगत संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी ही मदत पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले आहे.
इस्रायलने ‘यूएनआरडब्ल्यूए’वर कोणते आरोप केले आहेत?
इस्रायलने केलेल्या आरोपांचे सर्व तपशील उपलब्ध नाहीत. मात्र, तेथील माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, हमासने ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यासाठी ‘यूएनआरडब्ल्यूए’ची वाहने आणि अन्य सुविधांचा वापर केला असण्याची शक्यता आहे. त्या हल्ल्यात जवळपास १,३०० जण मारले गेले होते. तसेच हमासने २४० जणांना ओलीस धरले. यापैकी काही ओलिसांची नंतर आठवडाभर चाललेल्या शस्त्रविरामादरम्यान सुटका करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस हे इस्रायलविरोधी आहेत, तसेच ‘यूएनआरडब्ल्यूए’ ही संस्था हमाससाठी काम करते असे आरोप इस्रायलने यापूर्वीही केले आहेत.
आणखी वाचा-अखेर सर्फराज खानची भारतीय संघात निवड… पण अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळेल?
इस्रायलच्या आरोपांचे काय परिणाम झाले?
‘यूएनआरडब्ल्यूए’चे कर्मचारी दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याच्या आरोपांनंतर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, ब्रिटन आणि अमेरिका या नऊ देशांनी तातडीने गाझा पट्टीला केला जाणारा मदतपुरवठा थांबवला. या आरोपांनुसार ‘यूएनआरडब्ल्यूए’चे १२ कर्मचारी या हल्ल्यामध्ये सहभागी होते. त्यापैकी नऊ जणांना तातडीने बरखास्त करण्यात आले. उरलेल्या तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे आणि दोघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांचे काय म्हणणे आहे?
गुटेरेस यांनी गाझा पट्टीचा मदतपुरवठा पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले आहे. हा मदतपुरवठा पुन्हा सुरू न झाल्यास ‘यूएनआरडब्ल्यूए’ला फेब्रुवारीमध्येच जवळपास २३ लाख पॅलेस्टिनींच्या मदतीमध्ये कपात करावी लागेल असे त्यांचे म्हणणे आहे. जवळपास चार महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे गाझा पट्टीत तीव्र मानवतावादी संकट निर्माण झाले असून जवळपास एक चतुर्थांश लोकसंख्येला पुरेसे अन्न मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. यासंबंधी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ‘‘कर्मचाऱ्यांच्या कथित घृणास्पद कृत्याची त्यांना शिक्षा मिळायलाच हवी, पण ‘यूएनआरडब्ल्यूए’साठी काम करणाऱ्या हजारो महिला आणि पुरुष अत्यंत धोकादायक परिस्थितींमध्ये काम करतात, त्यांना शिक्षा होता कामा नये’’.
आणखी वाचा-भारतीयांनी मालदीवकडे फिरवली पाठ; भविष्यात भारतीय पर्यटक मालदीवला भेट देणार का?
मदत थांबल्यामुळे पॅलेस्टिनींवर कोणते संकट ओढवले?
गाझा पट्टीमध्ये साडेतीन महिन्यांपेक्षा जास्त काळ युद्ध सुरू असल्यामुळे तेथील सामान्य पॅलेस्टिनींची परिस्थिती बिकट झाली आहे. जीवनमान ठप्प झाले असून उदरनिर्वाहाची सर्व साधने बंद झाली आहेत. अन्न, पिण्याचे पाणी, औषधे, इंधन आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंसाठी येथील लोक आता मदतीवर अवलंबून आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, सध्या जवळपास १७ लाख पॅलेस्टिनींना ‘यूएनआरडब्ल्यूए’कडून मदत दिली जाते. हीच मदत बंद झाली तर त्यांचे हाल अधिक वाढणार आहेत.
या युद्धात आतापर्यंत किती मनुष्यहानी झाली आहे?
या भागात झालेले हे आतापर्यंतचे सर्वात संहारक युद्ध ठरले असून २६ हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये दोन तृतियांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. त्याशिवाय गाझा पट्टीतील २३ लाख लोकांपैकी २० लाखांपेक्षा जास्त लोक विस्थापित झाले आहेत. इस्रायलकडून केल्या जाणाऱ्या हवाई आणि जमिनीवरील कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांना वारंवार स्थलांतर करावे लागत आहे.
आणखी वाचा- ‘ड्रॅगन बेबीज’: २०२४ मध्ये चीन मधील जन्मदर वाढणार का?
‘यूएनआरडब्ल्यूए’ काय काम करते?
‘यूएनआरडब्ल्यूए’चे गाझामध्ये १३ हजार कर्मचारी असून त्यापैकी जवळपास सर्व पॅलेस्टिनी आहेत. ही संस्था १९४९मध्ये स्थापन करण्यात आली. १९४८च्या युद्धानंतर, सध्या जो भाग इस्रायल म्हणून ओळखला जातो तेथून घर सोडून गेलेल्या किंवा जाण्यास भाग पडलेल्या निर्वासित कुटुंबांना वैद्यकीय सुविधेपासून शिक्षणापर्यंत मूलभूत सेवा या संस्थेतर्फे प्रदान केल्या जातात. ७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धानंतर या संस्थेच्या कामाचा अधिक विस्तार झाला आहे. मुख्यतः गाझा, पश्चिम किनारपट्टी, जॉर्डन, लेबनॉन आणि सीरिया या ठिकाणी या संस्थेचे काम चालते.
इस्रायल आणि पॅलेस्टिनींमध्ये ‘यूएनआरडब्ल्यूए’ची प्रतिमा कशी आहे?
इस्रायलचे ‘यूएनआरडब्ल्यूए’वर असलेले आक्षेप नवीन नाहीत. ही संस्था पॅलेस्टिनींना शस्त्रपुरवठा करते असा त्यांचा संशय आहे. ‘यूएनआरडब्ल्यूए’ आणि पॅलेस्टिनी यांच्यामध्ये काही भेद करताच येणार नाही. पॅलेस्टिनींनी त्यांच्यावर ताबा मिळवला आहे असे इस्रायलचे म्हणणे आहे. दुसरीकडे, युद्धामुळे कोंडीत सापडलेल्या सामान्य पॅलेस्टिनींसाठी ही संघटना दुसरे काही नसून जीवनदायिनी आहे.
nima.patil@expressindia.com