ज्ञानेश भुरे
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल महासंघाला (एआयएफएफ) आपला संघ खेळविण्यासाठी क्रीडा मंत्रालयापर्यंत धावाधाव करावी लागली होती. संघाला मान्यता मिळविल्यावर सुनील छेत्री, संदेश झिंगान, गुरप्रीतसिंग अशा प्रमुख खेळाडूंसह भारताचा संघ जाहीर झाला होता. मात्र, इंडियन सुपर लीगने (आयएसएल) आपल्या खेळाडूंना मुक्त करण्यास असमर्थता दर्शवली. सहाजिक स्पर्धा तोंडावर असताना एआयएफएफला दुसऱ्या फळीच्या संघ पाठविण्याच्या निर्णयावर यावे लागले. चर्चेच्या अनेक फेऱ्या रंगल्यानंतर केवळ सुनील छेत्रीला संघात स्थान मिळाले. तरी उर्वरित संघ दुसऱ्याच फळीचा आहे. हा निर्णय नेमका का घ्यावा लागला… एआयएफएफची भूमिका काय… आयएसएल का अडून बसले… या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न
भारतीय फुटबॉल संघाच्या मान्यतेसाठी एआयएफएफला का झगडावे लागले?
भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि क्रीडा मंत्रालयाने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडू आणि संघाना मान्यता देताना आशियाई क्रमवारीत पहिल्या आठमध्ये खेळाडू किंवा संघाने असायला हवे, असा निकष लावला होता. यात भारतीय फुटबॉल संघ बसत नव्हता. त्यामुळे क्रीडा मंत्रालयाने आशियाई स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघास मान्यता नाकारली होती. मात्र, एआयएफएफ आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक इगॉर स्टिमॅक यांनी भारतीय संघाची अलीकडच्या काळातील कामगिरी चांगली झाल्याचे सांगून क्रीडा मंत्रालयाला मान्यतेसाठी विनवणी केली होती. त्याचबरोबर फुटबॉल चाहत्यांनीदेखील भारतीय संघाच्या खेळण्याविषयी आग्रह धरला. त्यामुळे क्रीडा मंत्रालयाने भारतीय फुटबॉल संघाला अखेर मान्यता दिली होती.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी वरिष्ठ खेळाडूंना संधी मिळते का?
आशियाई क्रीडा स्पर्धेत फुटबॉलसाठी प्राधान्याने २३ वर्षांखालील खेळाडूंचा संघ खेळविला जातो. मात्र या संघात वरिष्ठ संघातील तीन खेळाडूंना खेळविण्याची सवलत असते. हे लक्षात घेऊन एआयएफएफने संभाव्या ५० खेळाडूंमधून २२ खेळाडूंची नावे निश्चित केली होती. यात सुनील छेत्री, संदेश झिंगान, गुरुप्रीत सिंग या प्रमुख खेळाडूंचा समावेश होता.
आणखी वाचा-मध्यप्रदेशातील वाग्देवी मंदिर आणि कमल मौला मशीद यांच्यातील नेमका वाद काय आहे?
मग दुसऱ्या फळीचा संघ पाठविण्याचा निर्णय का घ्यावा लागला?
आशियाई क्रीडा स्पर्धा २३ सप्टेंबरपासून सुरू होत असल्या तरी फुटबॉल सामने १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहेत. त्याचवेळी आयएसएलला २१ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दोन्ही स्पर्धेंच्या तारखा एकमेकांच्या आड येत असल्याने आयएसएलमध्ये खेळणाऱ्या ११ क्लब संघांनी आपल्या संघातील खेळाडूंना मुक्त करण्यास नकार दिला. विशेष म्हणजे भारतीय संघासाठी निवडलेले तब्बल २२ खेळाडू आयएसएलच्या विविध संघांशी जोडले गेले आहेत. आयएसएल आणि एआयएफएफ यांच्या दरम्यान चर्चेचे गुऱ्हाळ चालू राहिले. निवडलेल्या ५० पैकी कोणतेही २२ खेळाडू तुम्ही निवडा इथपर्यंत एआयएफएफने आयएसएलला मोकळीक दिली. पण, आयएसएलने एकाही खेळाडूस मुक्त करण्यास नकार दिल्याने आशियाई स्पर्धेत भारताचा २३ वर्षांखालील दुसऱ्या फळीचा संघ पाठविण्याचा निर्णय घ्यावा लागला.
अखेर केवळ सुनिल छेत्रीचा संघात समावेश कसा झाला?
स्पर्धेसाठी संघ निवडण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत आयएसएल आणि एआयएफएफ याच्यांत चर्चेच्या फेऱ्या रंगतच होत्या. अखेरीस केवळ सुनील छेत्री या एकमात्र अनुभवी खेळाडूस आशियाई संघात स्थान मिळाल्याचे एआयएफएफने जाहीर केले. अन्य एकाही खेळाडूला आयएसएलने मुक्त करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघात सुनील छेत्रीचा समावेश असला, तरी अन्य १६ खेळाडू हे दुसऱ्या फळीतीलच राहिले आहेत. त्याचबरोबर प्रशिक्षक इगॉर स्टिमॅक संघाबरोबर जाणार की नाही हा प्रश्न कायम राहिला आहे. स्टिमॅक यांनी दुसऱ्या फळीच्या संघाबरोबर जाण्यास नकार दिला आहे.
आणखी वाचा-हैदराबाद संस्थान भारतात विलीन कसे झाले? ऑपरेशन पोलो काय आहे? जाणून घ्या…
आयएसएलचे स्थान काय?
आयएसएल ही भारताली प्रमुख देशांतर्गत स्पर्धा मानली जाते. एकूण ११ क्लब संघ या लीगमध्ये खेळतात. यामुळे देशाची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा मागे पडली. भारतीय संघाची निवड या लीगमधील खेळाडूंच्या कामगिरीवरूनच निश्चित केली जाते. त्यामुळे या लीगचे महत्त्व वाढले. सहाजिकच क्लब आणि देश यापैकी कुणाला प्राधान्य द्यायचे, या चर्चेला येथे सुरुवात होते.
आयएसएलने ही टोकाची भूमिका का घेतली?
या लीगचा कार्यक्रम एआयएफएफशी चर्चा करून निश्चित केला जातो. पण, यावेळी कार्यक्रम निश्चित करताना आशियाई क्रीडा स्पर्धा विचारात घेतली गेली नाही. हा सर्वांत कळीचा मुद्दा ठरला. दुसरे महत्त्वाचे म्हणजे आशियाई स्पर्धा ही फुटबॉल शिखर संघटना फिफाच्या आधिपत्याखाली येत नाही. मग, आम्ही आमचे खेळाडू या स्पर्धेसाठी का मुक्त करावे, हा मुद्दा आयएसएलने उचलून धरला. या दरम्यान झालेल्या काही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळताना भारतीय खेळाडू जायबंदी झाले. ते आयएसएलचा भाग होते. आयएसएल स्पर्धा तोंडावर असताना आणखी खेळाडू जायबंदी होऊ नयेत, यासाठी आयएसएल क्लबमधील ११ संघांनी खेळाडूंना मुक्त करण्यास विरोध केला.
आणखी वाचा-विश्लेषण : पन्नाशीच्या आतील व्यक्तींमध्ये कर्करोगाचा धोका का वाढतोय?
आयएसएलचा भारतीय फुटबॉलवरील प्रभाव किती?
राष्ट्रीय फुटबॉल लीगचा काळ आणि आयएसएल सुरू झाल्यावरची परिस्थिती याचा विचार करायचा झाला तर निश्चितच चित्र बदलले आहे. आयएसएलमध्ये युरोपियन क्लबनी केलेली गुंतवणूक आणि परदेशी खेळाडूंचा सहभाग बघता देशातील फुटबॉलची प्रगती सुरू झाली, असे म्हणायला वाव आहे. यानंतरही आजमितीला आयएसएलमधील विविध क्लब आणि आयएसएलला आर्थिक विवंचनेने घेरले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आयएसएल नव्या योजना सुरू करण्याचा विचार करत आहे. त्यांच्या योजना प्रत्यक्षात उतरल्यास केवळ लीग, क्लब संघांनाच नाही, तर भारतीय फुटबॉलला वेगळी दिशा मिळणार आहे. भारतीय फुटबॉलच्या परिवर्तनासाठी हे आवश्यक आहे, असे फुटबॉल तज्ज्ञांचे मत आहे.