अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे येत्या प्रजासत्ताकदिनी विशेष अतिथी म्हणून भारतात येणार नाहीत, असे वृत्त आहे. या भेटीबरोबरच ‘क्वाड्रिलॅटरल’ अर्थात ‘क्वाड’ ही शिखर परिषदही लांबणीवर पडली आहे. बायडेन आले असते, तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हेही येणार होते. बायडेन यांची भेट रद्द का झाली, हे भारत आणि अमेरिका यांच्यातील ताणलेल्या संबंधांचे निदर्शक समजावे काय, याचा वेध.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बायडेन भारतात येणार होते का?

जो बायडेन हे प्रजासत्ताकदिनानिमित्त २६ जानेवारी २०२४ रोजी भारतात प्रमुख अतिथी असतील, अशी शक्यता सप्टेंबर महिन्यात अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी व्यक्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-ट्वेंटी परिषदेनिमित्त भारतात आलेले असताना बायडेन यांना या सोहळ्याचे आमंत्रण दिल्याची माहिती गार्सेटी यांनी दिली होती. वास्तविक अमेरिका किंवा भारताकडून त्याविषयी अधिकृत घोषणाच झालेली नव्हती. त्याचप्रमाणे, ‘बायडेन आता येणार नाहीत’ हेदेखील अमेरिकेने अधिकृत जाहीर केलेले नाही.

मग भेट रद्द झाल्याचा गाजावाजा का?

प्रजासत्ताक दिन सोहळा हा केंद्र सरकारच्या कार्यक्रमातील सर्वोच्च मानाचा असा वार्षिक उपक्रम आहे. एक प्रजासत्ताक म्हणून भारताची सामरिक ताकद आणि सांस्कृतिक वैभव जगासमोर मांडण्याची ही संधी असते. प्रजासत्ताकाचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपती या सोहळ्याचे यजमान असतात. त्याचबरोबर या सोहळ्यासाठी एखाद्या राष्ट्रप्रमुखालाच विशेष अतिथी म्हणून बोलवण्याची परंपरा आहे. यंदा प्रजासत्ताक सोहळ्यानिमित्त बायडेन यावेत असे प्रयत्न सर्वोच्च पातळीवर सुरू होते. कारण एव्हाना विशेष अतिथींचे नाव जाहीर झालेले असते. यावेळी ते अद्याप जाहीर झालेले नाही. याचा अर्थ बायडेन आमंत्रण नाकारतील, याची पुरेशी कल्पना परराष्ट्र खात्याला नसावी.

हेही वाचा… विश्लेषण : इथेनॉल उत्पादन बंदीचा निर्णय किती गंभीर?

यंदा मे महिन्यात क्वाड परिषद झाली, त्यावेळी पुढील वर्षी ही परिषद आम्ही भरवू, असे भारताने जाहीर केले होते. त्यामुळे क्वाडच्या निमित्ताने भारताच्या सामर्थ्याचे दर्शन घडवण्याचा मोदी सरकारचा हेतू असू शकतो. पण आता बायडेन भेट किंवा क्वाड परिषद असे दोन्ही होत नसल्यामुळे माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली.

अमेरिकी अध्यक्ष प्रजासत्ताकदिनी आले होते का?

यापूर्वी २०१५मध्ये बराक ओबामा यांनी मोदींचे आमंत्रण स्वीकारले होते. ते प्रजासत्ताकदिनी अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले पहिले अमेरिकी अध्यक्ष. त्यानंतर २०१८मध्ये डोनाल्ड ट्रम्प येणार होते, पण त्यांनी ऐन वेळी माघार घेतली. बायडेन हे प्रजासत्ताकदिनी आलेले दुसरे अमेरिकी अध्यक्ष ठरले असते.

पन्नू प्रकरणाचे पडसाद?

अमेरिकेतील एका न्यायालयात अलीकडेच गुरपतवंतसिंग पन्नू या खलिस्तानवाद्याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी निखिल गुप्ता या भारतीय अमली पदार्थ तस्करावर आरोपपत्र दाखल झाले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी या प्रकरणी एका अनाम माजी भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यावरही ठपका ठेवला. पन्नू हा आपल्या दृष्टीने दहशतवादी असला, तरी तो अमेरिकेचा नागरिक आहे. अमेरिकी भूमीवर अमेरिकी नागरिकाच्या हत्येचा कट बाहेरील देशाच्या नागरिकाने रचला ही बाब अमेरिकी तपासयंत्रणा आणि बायडेन प्रशासनाच्या दृष्टीने गंभीर ठरते. या प्रकरणाचा फार बभ्रा अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने केलेला नाही. परंतु भारतभेटीवर गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार, तसेच एफबीआयचे संचालक येऊन गेले. या भेटींचा उद्देश पन्नू प्रकरणाविषयी माहिती घेणे हाच होता. इतके सगळे सुरू असताना, भारतभेटीवर येऊन दोन्ही बाडूंकडील माध्यमांच्या अवघड प्रश्नांना सामोरे जाण्याची बायडेन यांची इच्छा नसावी. त्यातूनही भेट रद्द झाली असावी.

संबंधांमध्ये तणाव? चीनचे काय?

भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये तणाव आला आहे, असे थेट म्हणता येत नाही. परंतु काही अवघड प्रश्न अमेरिकेने उपस्थित केले आहेत आणि त्यांची उत्तरे शोधण्याविषयी आपण गंभीर आहोत हे नक्की. कॅनडाने हरदीपसिंग निज्जर या आणखी एका खलिस्तानवाद्याच्या हत्येवरून मध्यंतरी राळ उठवली होती. पण पुरावे सादर केले नव्हते. त्यामुळे तेथील पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या त्या आरोपांना आपण आजही भीक घालत नाही. अमेरिकेने मात्र रीतसर तपास करून पुरावे सादर करणे, आरोपपत्र दाखल करणे असे सोपस्कार पार पाडले आहेत. शिवाय कॅनडाच्या तुलनेत अमेरिकेशी मैत्री भारताच्या दृष्टीने अधिक लाभदायी आणि म्हणून महत्त्वाची आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग अलीकडेच एका परिषदेच्या निमित्ताने बायडेन यांना कॅलिफोर्नियात भेटून गेले. यानंतर भारत-अमेरिका संबंध वेगळ्या वळणावर गेले असावेत, असा एक अंदाज व्यक्त केला जातो. पण त्यात तथ्य नाही. चीन आजही अमेरिकेचा शत्रू क्रमांक एक आहे, त्यात काही बदल झालेला नाही. तैवानवर हल्ला करण्याची आकांक्षा चीन आजही बाळगून आहे, त्यात बदल झालेला नाही. अशा विस्तारवादी, दुःसाहसी चीनविरोधात भारतासारखा मित्र अमेरिकेला हवा आहे आणि या वास्तवातही काही बदल झालेला नाही. त्यामुळे पन्नू प्रकरणाची चौकशी आणि भारत-अमेरिका मैत्री हे स्वतंत्र, समांतर मार्गांनी वाटचाल करतील, असे सध्या चित्र आहे.

siddharth.khandekar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why was joe bidens visit to india cancelled for republic day print exp dvr
First published on: 15-12-2023 at 08:19 IST