थायलंडचे पंतप्रधान स्रेथा थविसिन यांना तेथील न्यायालयाने राज्यघटनेचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून पदावरून हटवण्याचा आदेश दिला. हा निकाल थायलंडच्या नागरिकांसाठी धक्कादायक आहे. हे कसे घडले आणि आता पुढे काय असे प्रश्न आता विचारले जात आहेत.
थायलंडच्या न्यायालयाने कोणते निर्णय दिले?
पंतप्रधान स्रेथा थविसिन यांनी राज्यघटनेचे उल्लंघन केले असल्याचा निर्वाळा थायलंडच्या कॉन्स्टिट्युशनल कोर्टाने बुधवारी दिला. त्याच्या एक आठवडा आधी याच न्यायालयाने मूव्ह फॉरवर्ड पार्टी हा लोकप्रिय प्रगतशील पक्ष बरखास्त केला. हा तेथील सर्वात मोठा पक्ष असून ती प्रत्यक्षात अनेकविध गटांची आघाडी आहे. गेल्याच वर्षी या पक्षाने तेथील पार्लमेंट निवडणुकीत बहुमत मिळवले होते. त्याशिवाय मूव्ह फॉरवर्ड पार्टीच्या नेत्यांवर १० वर्षांची बंदीही घालण्यात आली. यामुळे थायलंडमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.
हेही वाचा >>>भारताला अमेरिकेकडून मिळणार ‘हंटर किलर’; काय आहे MQ-9B? कोटींची गुंतवणूक करून भारत हे ड्रोन का खरेदी करत आहे?
स्रेथा थविसिन यांच्यावरील आरोप
स्रेथा थविसिन हे राजकारणात तुलनेने नवीन आहेत. त्यापूर्वी बडे बांधकाम व्यावसायिक म्हणून ते प्रसिद्ध होते. २००८मध्ये सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा भोगलेल्या पिचित चुएन्बन या वकिलाचा त्यांनी मंत्रिमंडळात समावेश करून त्यांनी नीतिनियमांचे पालन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. पिचित यांना न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याला साधारण ५७ हजार डॉलरची लाच देऊ केल्यामुळे ही शिक्षा झाली होती. कॉन्स्टिट्युशनल कोर्टाच्या नऊपैकी पाच न्यायाधीशांनी स्रेथा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बरखास्तीच्या बाजूने कौल दिला. आपण ज्या व्यक्तीची नियुक्ती करत आहोत तिच्यात नैतिक सचोटीचा मोठ्या प्रमाणात अभाव असल्याचे पंतप्रधानांना चांगलेच ठाऊक होते असे मत न्यायाधीशांनी बहुमताने व्यक्त केले.
आरोपांची पार्श्वभूमी
मे २०२४मध्ये लष्कराने नियुक्त केलेल्या ४० माजी सिनेटरनी स्रेथा थविसिन यांच्याविरोधात खटला दाखल केला. पिचित चुएन्बन यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे थविसिन यांच्या हकालपट्टीची मागणी त्यांनी केली. पिचित चुएन्बन हे माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांची नियुक्ती करून आपण कोणतीही चूक केली नाही असे स्रेथा थविसिन यांचे म्हणणे होते. अलिकडील काही पाहण्यांमध्ये स्रेथा थविसिन यांची लोकप्रियता कमी झाल्याचे दिसून येत होते. त्यांच्या महत्त्वाच्या आर्थिक धोरणांना विरोध होत होता आणि त्याच्या अंमलबजावणीत विलंबही होत होता. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे निरीक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. न्यायालय थविसिन यांची बाजू घेईल असे मानले जात होते.
हेही वाचा >>>एम.एफ. हुसैन यांनाही प्रेरणा देणारे स्वतंत्र भारतातील पहिले कला प्रदर्शन कसे होते?
निकालाचा अर्थ कसा लावला जात आहे?
न्यायालयाच्या निर्णयामुळे थायलंडकडे जास्तीत जास्त निम-एकाधिकारशाही म्हणून पाहता येईल, कारण येथे जनतेच्या मताला व्यावहारिकदृष्ट्या काहीही किंमत नाही. येथे काही जणांकडे नकाराधिकार राबवून सरकार बरखास्त करण्याचे आणि हवे तसे निवडणूक निकाल लावण्याचे अधिकार आहेत असे मत चुलालॉन्गकॉर्न विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक थिटिनन पोंगसुधीरक यांनी ‘सीएनएन’शी बोलताना व्यक्त केले.
पुढे काय?
थायलंडच्या पंतप्रधानपदावरून हटवलेले स्रेथा थविसिन हे गेल्या १६ वर्षांमधील चौथे नेते आहेत. आपण पंतप्रधान म्हणून आपले कर्तव्य केले असा थविसिन यांचा दावा आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी न्यायालयाचा निकाल स्वीकारला आहे. आता नवीन सरकार स्थापन होईल आणि सत्ताधारी मूव्ह फॉरवर्ड पार्टीच्या नेतृत्वाखालील आघाडी पंतप्रधानपदासाठी नवीन नाव निश्चित करेल. त्यानंतर थायलंडचे ५०० सदस्यीय पार्लमेंट त्यावर मतदान घेईल. नवीन सरकार कितपत स्थिर राहील याबद्दल खात्री नसल्याचे स्रेथा थविसिन यांनी सांगितले आहे.
थायलंडची राजकीय स्थिती
थायलंडमध्ये राजकीय स्थिरता नाही. लष्कर, राजेशाही आणि उच्चभ्रू उद्योजक वर्ग अशा मूठभरांच्या हाती खऱ्या अर्थाने सत्ता एकवटलेली आहे. तेथे कोणतीही सुधारणा करण्याचा प्रयत्न झाल्यास या वर्गाला ते खपत नाही. गेल्या दोन दशकांच्या कालावधीत डझनावारी लोकप्रतिनिधींवर बंद घालण्यात आली, पक्ष बरखास्त करण्यात आले आणि बंड किंवा न्यायालयीन आदेशांमुळे तेथील पंतप्रधानांवर पदत्याग करण्याची वेळ आली. न्यायालये निष्पक्ष असावेत अशी अपेक्षा असली तरी थायलंडमध्ये न्यायपालिका प्रत्यक्ष सत्तेच्या खेळात सहभागी झाल्याचे दिसते.
थविसिन यांचा वारसदार कोण?
माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांची कन्या पेतोंगतार्न शिनावात्रा या पंतप्रधानपदासाठी उत्सुक असल्याचे वृत्त आहे. गडगंड श्रीमंत घरातून आलेल्या ३७ वर्षीय पेतोंगतार्न शिनावात्रा पक्षातून पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राजकीय घराण्यातून आल्याचा फायदा त्यांना मिळू शकतो. त्याचवेळी त्यांचे वडील थाकसिन शिनावात्रा यांच्याकडे दुही माजवणारा नेता म्हणून पाहिले जात होते, त्या प्रतिमेचा त्यांना तोटा होऊ शकतो. त्याशिवाय ७५ वर्षीय माजी न्यायमंत्री चैकासेम नितीसिरी हेही शर्यतीत आहेत. त्यांना पक्षातून काही प्रमाणात पाठिंबाही आहे. अशा वेळी पेतोंगतार्न यांच्या उदयामुळे पक्षातील स्पर्धा अधिक तीव्र होऊन आधीच राजकीय अस्थिरता असलेल्या थायलंडला स्थिर राजकीय नेतृत्व मिळण्यास काहीसा विलंब होण्याचीही भीती आहे.
nima.patil@expressindia.com