संदीप कदम

चीनमधील हांगझो येथे १० ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणारी १९वी आशियाई क्रीडा स्पर्धा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. चीनमधील करोनाच्या ताज्या लाटेमुळे हा निर्णय संयोजकांना घ्यावा लागला आहे. दर चार वर्षांनी आशियाई खंडात प्रतिष्ठेची मानली जाणारी ही स्पर्धा का पुढे ढकलावी लागली, त्याचे क्रीडा क्षेत्रात कशा प्रकारे पडसाद उमटले आणि ही स्पर्धा आता कधी होऊ शकेल, हे मुद्दे समजून घेऊया.

आशियाई क्रीडा लांबणीवर टाकण्याचे प्रमुख कारण काय?

हांगझो ही झेजियांग प्रांताची राजधानी आहे आणि हे शहर शांघायपासून १७५ किलोमीटर नैर्ऋत्येला आहे. करोनाच्या ताज्या आकडेवारीनुसार झेजियांगमध्ये ३१२४ जणांना करोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यूही झाला आहे. इतर शहरातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळेच चीन ऑलिम्पिक समिती आणि हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजन समितीशी चर्चा केल्यानंतर आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या (ओसीए) कार्यकारी समितीने शुक्रवारी आशियाई क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजन समितीने करोनाच्या प्रादुर्भावाचे आव्हान असतानाही स्पर्धा आयोजानाची तयारी दर्शवली होती. मात्र, सध्याच्या प्रादुर्भावाची स्थिती आणि स्पर्धांमध्ये सहभागी होणारे खेळाडू आणि अधिकारी यांची संख्या पाहता संयोजनातील सर्व घटकांनी मिळून हा निर्णय घेतला, असे ‘ओसीए’कडून सांगण्यात आले.

आशियाई स्पर्धा कधी होणार होत्या आणि चीनने त्याची कशी तयारी केली होती?

१९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन यावर्षी १० ते २५ सप्टेंबर दरम्यान होणार होते. या स्पर्धेमध्ये ४४ देशांतील जवळपास ११ हजार खेळाडू ६१ विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होणार होते. विविध क्रीडा स्पर्धांसाठी ५६ मैदानेही सज्ज होती, अशी महिती आयोजकांनी एप्रिलच्या सुरुवातीला दिली होती.

स्पर्धा पुढे ढकलण्याच्या निर्णयाबाबत क्रीडा क्षेत्रातून कशा प्रकारे पडसाद उमटले?

आशियाई क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकल्यानंतर क्रीडा क्षेत्रातून संंमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. काही जणांनी हा निर्णय फायद्याचा असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी हा निर्णय निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. कोणतीही क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकणे, ही खेळाडूंच्या दृष्टीने निराशाजनक असल्याचे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) सरचिटणीस राजीव मेहता म्हणाले. परंतु, आशियाई स्पर्धा लांबणीवर पडल्याने आपल्याला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल, असे भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश म्हणाला. तसेच, टेनिस संघाच्या दृष्टीने स्पर्धा लांबणीवर जाणे फायद्याचे ठरले आहे. खेळाडूंवर सात दिवसांच्या आत दोन मोठ्या स्पर्धा खेळण्याचा दबाव नसेल, असे अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सरचिटणीस अनिल धूपर यांनी सांगितले. तर, स्पर्धा लांबणीवर पडल्याने पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचे आव्हान असेल, असे जलतरणपटू साजन प्रकाश म्हणाला.

आता आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन कधी होऊ शकेल?

ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच नवीन तारखांची घोषणा केली जाईल, असे संयोजकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, लांबणीवर पडलेल्या या स्पर्धेचे आयोजन आता २०२३मध्येच शक्य होऊ शकेल, असे मत क्रीडा क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

करोना लाटेचा चीनमधील आणखी कोणत्या क्रीडा स्पर्धांवर परिणाम झाला आहे?

करोनाच्या रुग्णवाढीनंतर चीनमधील अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये बीजिंगमध्ये फेब्रुवारीत होणाऱ्या शीतकालीन ऑलिम्पिकचाही समावेश आहे. चीनच्या शँतोऊ येथे २० ते २८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५मध्ये उझबेकिस्तानच्या ताश्कंदमध्ये होतील. चायनिज सुपर लीग फुटबॉलचे सामने उशिराने होणार असून हे सामने जैव-सुरक्षा परीघात खेळले जाणार आहेत. तसेच, यापूर्वी करोना प्रादुर्भावामुळे टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाही लांबणीवर टाकण्यात आली होती.

Story img Loader