जयेश सामंत

मेट्रो मार्गिका, उड्डाणपुलांची कामे यामुळे गेल्या काही वर्षांपासून सर्वाधिक कोंडीचा ठरलेला ठाण्यातील कापुरबावडी ते गायमुखपर्यंतचा घोडबंदर मार्ग आणखी रुंद आणि खड्डेमुक्त करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आखला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानले जाणारे ठाणे शहर गेल्या काही वर्षांपासून चहुबाजूंनी वाहतूक कोंडीने ग्रस्त आहे. एक काळ असा होता की घोडबंदर मार्ग अतिशय प्रशस्त वाटत असे. हा मार्ग नियोजित मेट्रो मार्गिकांच्या खांबांमुळे मात्र अरुंद झाला आहे. याशिवाय या मार्गाच्या दोन्ही बाजूस मोठ्या संख्येने नागरी संकुलांची उभारणी सुरू आहे. यामुळे या मार्गालगतच्या वस्त्यांमधील लोकसंख्या काही लाखांनी वाढताना दिसत आहे. या मार्गावर मेट्रो सुरू झाल्यास येथील रहिवाशांना वाहतुकीचा पर्याय उभा राहणार असला तरी झपाट्याने होत असलेले नागरीकरण लक्षात घेता येथील कोंडी कमी होईल का हा प्रश्न मागे उरतोच. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण हे भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकेल.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
kopri pachpakhadi vidhan sabha election 2024
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा

घोडबंदर मार्गाचे महत्त्व का आहे?

घोडबंदर हा ठाणे शहरच नव्हे तर आसपासच्या शहरांसाठीही महत्त्वाचा रस्ता आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहनांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. या मार्गावर ये-जा करण्यासाठी सध्या तरी घोडबंदर हा मोठा पर्याय वाहनचालकांपुढे आहे. ठाणे शहरातील या महत्त्वाच्या मार्गात मानपाडा, वाघबीळ, पातलीपाडा आणि कापुरबावडी अशा चार ठिकाणी उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली आहे. हे उड्डाणपूल म्हणजे विस्तारित ठाण्यातील लहान उपनगरांची प्रवेशद्वारे ठरली आहेत. या मार्गावरून मुंबई-अहमदाबाद मार्गावरून ये-जा करणाऱ्या हलक्या आणि अवजड वाहनांची संख्याही गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याशिवाय मार्गाच्या दोन्ही बाजूस नागरीकरणाचा वेगही बराच मोठा आहे. घोडबंदर मार्गाला पर्यायी मार्गांची चाचपणी सध्या सुरू असली, तरी पुढील काही वर्षे तरी या मार्गाला दुसरा पर्याय नाही असेच चित्र आहे.

हेही वाचा >>>गुजरातच्या समुद्रकिनारी जहाजावर ड्रोन हल्ला, हमास-इस्रायल युद्धाचा संबंध काय? जाणून घ्या..

ठाण्याच्या विस्तारात घोडबंदर मार्ग महत्त्वाचा कसा ठरतो?

जुन्या ठाण्याचा पुनर्विकास तसेच वागळे इस्टेट आणि आसपासच्या परिसरातील बेकायदा बांधकामांच्या पुनर्विकासासाठी महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकार राबवीत असली, तरी ठाण्याचा खऱ्या अर्थाने विस्तार हा घोडबंदर मार्गाच्या लगत उभ्या राहात असलेल्या लहानलहान उपनगरांच्या दिशेनेच होत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसत आहे. मोठ्या बिल्डरांच्या विशेष नागरी वसाहती तसेच अनेक मोठे गृहप्रकल्प या भागात उभे राहात आहेत. त्यामुळे या भागातील लोकसंख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. एक नवे शहर या संपूर्ण पट्ट्यात विकसित होत असल्याचे चित्र आहे. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने याच भागात मेट्रो प्रकल्पाची आखणी केली आहे. वडाळा-घाटकोपर या मार्गावरून होणारा मेट्रोचा प्रवास घोडबंदर मार्गावरून थेट गायमुख, मिरा-भाईंदरच्या दिशेने होणार आहे. वाहतुकीचा एक नवा पर्याय या ठिकाणी उभा राहात असला तरी रस्ते मार्गावरील गर्दी यामुळे अगदीच कमी होईल हा आशावाद भविष्यात पोकळ ठरू शकतो. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हणूनच या मार्गाला पर्यायी असा खाडी मार्ग उभारण्याचे पक्के केले आहे. याशिवाय घोडबंदर-बोरिवली जुळ्या बोगद्यांच्या महत्त्वाकांक्षी मार्गाची आखणीही करण्यात आली आहे. हे प्रकल्प अस्तित्वात आले तरीही घोडबंदरचे महत्त्व कमी होण्याची सुतराम शक्यता नाही.

घोडबंदर मार्गाची सध्याची रचना कशी आहे?

विस्तारित ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या कापुरबावडी जंक्शन ते गायमुखपर्यंत असलेल्या घोडबंदर मार्गाची एकूण लांबी १३.५ किलोमीटर इतकी आहे. यापैकी ९.३ किलोमीटरचा हा रस्ता ठाणे महापालिका हद्दीत तर उर्वरित रस्ता हा मिरा-भाईंदर महापालिका हद्दीत मोडतो. ठाणे महापालिका हद्दीतील घोडबंदर रस्त्याची एकूण रुंदी ही ४२ मीटर इतकी आहे. याशिवाय या रस्त्यास दोन्ही बाजूस नऊ मीटर रुंदीचे दोन सेवा रस्ते आहेत. कापुरबावडी ते गायमुखपर्यंत या रस्त्याच्या प्रत्येकी चार-चार मार्गिका (सेवा रस्त्यांसह) असून यापैकी दोन मार्गिकांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. याशिवाय मूळ रस्त्यातील प्रत्येकी एक-एक मार्गिका आणि दोन्ही बाजूंचे सेवा रस्तेही डांबराचे आहेत.

हेही वाचा >>>तुमच्या पाळीव कुत्र्याने एखाद्यावर हल्ला केल्यास तुरुंगवास आणि आर्थिक दंड, वाचा नव्या कायद्यातील तरतूद…

सेवा रस्त्यांचे मूळ मार्गात विलीनीकरण कसे?

या मार्गावर मेट्रो मार्गिका-४ चे बांधकाम सध्या सुरू असून अनेक ठिकाणी मेट्रोचे खांब हे सेवा रस्ता तसेच मूळ मार्गाच्या दुभाजकावर येत आहेत. मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतरही मेट्रोच्या या खांबांमुळे हा मार्ग अनेक ठिकाणी अडथळ्यांचा ठरण्याची भीती आतापासूनच व्यक्त होत आहे. त्यामुळे मेट्रो निर्माणानंतरही भविष्यात या मार्गावरील कोंडी कमी होईल का हा प्रश्न नियोजनकर्त्यांना सतावू लागला आहे. यावर उपाय म्हणून मूळ मार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या सेवा रस्त्याचे मूळ मार्गात विलीनीकरण करून हा संपूर्ण मार्ग दोन्ही बाजूस प्रत्येकी चार असा एकूण आठ पदरी करण्याचा प्रस्ताव महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आखला आहे. महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आखलेल्या नव्या प्रकल्प आराखड्यानुसार कापुरबावडी ते गायमुख या ९.३० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे पूर्णपणे काँक्रीटीकरण करण्यासाठी ५६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. गायमुख रेतीबंदर ते जुना जकात नाका या भागात सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याची रुंदी कमी आहे. त्यामुळे या भागात अरुंद रस्त्यामुळे मोठी कोंडी होत असते. या भागातील रुंदीकरणासाठी ठाणे महापालिकेमार्फत भूसंपादन केले जाणार असून, तेथेही आठ पदरी काँक्रीट रस्त्याची बांधणी केली जाणार आहे.