करोना विषाणूच्या संसर्गामुळे जगावर दूरगामी परिणाम झाले आहेत. यामुळे जगातील कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे. आता हळूहळू जग करोना संसर्गाच्या जोखडातून मुक्त होत आहे. अनेक देशांमध्ये करोना रुग्णांचा आकडा घटला आहे. मात्र, चीनमध्ये याउलट परिस्थिती असून येथे करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. खबरदारीचं पाऊल म्हणून चिनी सरकारकडून कठोर निर्बंध लादले जात आहेत. चीनच्या झेंगझोऊ (Zhengzhou) शहरातही हीच परिस्थिती आहे. येथे फॉक्सकॉन समूहाचा ‘आयफोन’ निर्मिती करण्याचा देशातील सर्वात मोठा कारखाना आहे. या कारखान्यातील कामगार भिंतीवरून उड्या मारून पळ काढत आहेत. याबाबतचे अनेक व्हिडीओज आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
खरं तर, संबंधित कंपनीत काम करणारे कर्मचारी करोना निर्बंधांना इतके घाबरले आहेत की, ते कंपनीच्या कुंपणाच्या भिंतीवरून उड्या मारून पळ काढत आहेत. यामध्ये अनेकजण जखमी झाल्याचं वृत्तही समोर आलं आहे. करोना नियंत्रणात आणण्यासाठी चीन सरकारचं ‘झिरो कोवीड’ धोरण कर्मचाऱ्यांसाठी अडचणीचं ठरत आहेत. परिणामी झेंगझोऊ शहरातील ‘आयफोन’ निर्मितीच्या कारखान्यातून कर्मचारी अक्षरश: पळून जात आहेत.
या व्हिडीओची पुष्टी ‘लोकसत्ता’ करत नाही…
आयफोन कारखान्यात दोन लाखाहून अधिक कर्मचारी
चीनच्या मध्यवर्ती भागात असलेल्या हेनान प्रांतात झेंगझोऊ शहर आहे. या शहरातील फॉक्सकॉनच्या कारखान्यात सुमारे दोन लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. याठिकाणी राहण्यासाठी कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या कंपनीतील अनेक कामगारांना करोना विषाणूची बाधा झाल्याची चर्चा असून त्यांच्या उपचारासाठी विशेष व्यवस्था केली नाही. यामुळे आपल्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो, या भीतीने शेकडो कामगारांनी कुंपणाच्या भिंतीवरून उड्या मारून पळ काढला आहे.
१०० किलोमीटरपर्यंत पायी प्रवास
चीनमध्ये करोना लॉकडाऊनची प्रचंड दहशत आहे. त्यामुळे आयफोन बनवणाऱ्या कारखान्यातील कामगार कसल्याही परिस्थिती आपल्या घरी जाण्यासाठी लाचार झाले आहेत. त्यासाठी त्यांना कंपनीतून पळ काढावा लागत आहे. ते रात्री-अपरात्री आपलं सामान हातात-खांद्यावर घेऊन चालत आपल्या घराकडे जात आहेत. याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काहीजण कंपनीपासून सुमारे १०० किलोमीटरपर्यंतचा पायी प्रवास करत आहेत. वाटेत त्यांच्या खाण्या-पिण्याचे प्रचंड हाल होत आहेत.
चीनचे ‘झिरो कोविड’ धोरण
‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये ‘झिरो कोविड’ धोरणाअंतर्गत ज्या-ज्या ठिकाणी करोना विषाणूचे नवीन रुग्ण आढळत आहेत. त्या ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे कठोर निर्बंध लागू केले जात आहे. याच धोरणांतर्गत मोठी लोकसंख्या असलेल्या झेंगझोऊ शहरातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ‘आयफोन’ निर्मिती करणारा फॉक्सकॉन टेक्नॉलॉजीचा प्रकल्प झेंगझाऊ शहरापासून काही अंतरावर आहे. यामुळे कंपनीत काम करणाऱ्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. करोना काळात कठोर निर्बंधांचा सामना केल्यामुळे हे लोक पुन्हा निर्बंध टाळण्यासाठी तेथून पळ काढत आहेत.
१० लाख लोक घरात बंदिस्त केल्याचा दावा
विशेष म्हणजे झेंगझाऊ शहरात सुमारे दहा लाख लोकांना आपल्याच घरात राहण्याची सक्ती केली आहे. त्यांना आपल्याच घरात एक प्रकारे कैद केलं आहे. या लोकांना फक्त करोना चाचणी करण्यासाठी घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाच्या नोटीशीनुसार, या शहरातील अत्यावश्यक नसलेले सर्व व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.