सलग दोन वर्षांपासून ॲमेझॉनला पावसाअभावी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. ही नदी व तिच्या उपनद्या कोरड्या झाल्या आहेत. जलचर नाहीसे होत आहेत. स्थानिकांच्या जीवनमानावर त्याचा प्रचंड परिणाम झाला आहे. हे पर्यावरणीय संकट हवामान बदलाच्या तात्काळ आणि तीव्र होणाऱ्या परिणामांकडे लक्ष अधोरेखित करते. पर्यावरण अभ्यासक या महत्त्वाच्या जलमार्गांवर अवलंबून असलेल्या या प्रदेशाच्या परिसंस्था, जैवविविधता आणि समुदायांवर दीर्घकालीन परिणामांबाबत चिंता व्यक्त करत आहेत.
ॲमेझॉन नदीचे काय होत आहे?
कोलंबियाच्या सीमेला लागून असलेल्या ब्राझीलच्या ताबटिंगा शहरात, ॲमेझॉनची प्रमुख उपनदी असलेल्या सोलिमोस नदीने रेकॉर्डवरील सर्वात कमी पातळी गाठली आहे. सॉलिमोजची एक शाखा पूर्णपणे कोरडी पडली आहे, ज्यामुळे एके काळच्या जलमार्गाचे वाळूच्या विस्तारामध्ये रूपांतर झाले आहे. टेफे सरोवराच्या स्थितीवरून परिस्थितीची तीव्रता लक्षात येते. टेफेच्या पुढील प्रवाहात, सॉलिमोस नदीचा एक भाग पूर्णपणे कोरडा झाला आहे. ज्यामुळे एके काळचा जलमार्ग वाळूच्या विस्तारामध्ये बदलला आहे. मागील वर्षीच्या दुष्काळात सुमारे २०० गोड्या पाण्यातील डॉल्फीनचा मृत्यू झाला होता. यावर्षीच्या दुष्काळाचे स्वरूप आणखी गंभीर आहे. गेल्या वर्षीचे रेकॉर्ड यावर्षीच्या दुष्काळाने मोडले आहेत. दुष्काळाचे परिणाम नद्यांच्या पलीकडे पोहोचले आहेत.
हेही वाचा : विश्लेषण: अमेरिकेत यंदा वाढीव चक्रीवादळांचा ‘सीझन’? अजस्र ‘मिल्टन’नंतरही धडकत राहणार संहारक वादळे?
ॲमेझॉनचे कोरडे होणे धोक्याची घंटा?
ॲमेझॉनच्या जंगलामध्ये काही वर्षांपूर्वी आग लागली आणि जंगलातील हजारो प्राणी यात मृत्युमुखी पडले. हवामान बदलाचा तो परिणाम होता आणि त्यावेळी शास्त्रज्ञांनी यातून परतण्याचा कोणताही मार्ग नसल्याचे सांगत धोक्याचा इशारा दिला होता. कारण सरासरीपेक्षाही पाऊस कमी होता. याच कारणामुळे नद्या कोरड्या पडल्या, शेकडोंच्या संख्येने डॉल्फिनचा मृत्यू झाला आणि या परिसरात राहणाऱ्या जनजीवनावर त्याचा परिणाम झाला. ब्राझीलच्या ‘भूवैज्ञानिक सेवे’ने आता इशारा दिला आहे की ॲमेझॉन आणि तिच्या उपनद्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. या नद्यांचा स्तर आणखी खालावला जाऊ शकतो. असे झाल्यास स्थानिक समुदायासमोर मोठ्या संख्येने नवीन आव्हाने तयार होतील. मनोस येथून वाहनारी रियो निग्रो नदीची खोली २४ मीटरपासून कमी होऊन २१ मीटरवर आली आहे. स्थानिक समुदायापर्यंत अन्न, औषधी आणि आवश्यक वस्तुंचा पुरवठा कमी झाला आहे. शेतीसह उद्योग क्षेत्रही चिंतेत असून त्यावर पर्याय म्हणून ‘ड्रेजिंग’चा विचार केला जात आहे.
नदीचे ‘ड्रेजिंग’ फायदेशीर की नुकसानकारक?
‘ड्रेजिंग’ ही नद्या, तलाव, बंदर आणि किनारपट्टी यांसारख्या पाण्याच्या तळापासून गाळ आणि राडारोडा काढून टाकण्याची प्रक्रिया आहे. ॲमेझॉनच्या काही ठिकाणी ही पद्धत वापरून उथळ हात असलेल्या नदीमधील गाळ काढून टाकण्याचा विचार अधिकारी करत आहेत. मात्र, या पद्धतीत पर्यावरणाचे नुकसान होण्याचीच जास्त शक्यता आहे. ‘ड्रेजिंग’मुळे नदीचा प्रवाह बदलण्याची शक्यता अधिक असते. ॲमेझॉन आणि तिच्या उपनद्यांवर ‘ड्रेजिंग’चा प्रयोग केल्यास जलीय प्रणालीवर त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात. नद्यांमधील वनस्पती आणि प्राण्यांवर त्याचा गंभीर परिणाम होऊन ते विस्कळीत होतील. नदीचे पात्र ढवळून काढल्यामुळे येथील जलचर रसायनांच्या संपर्कात येतील. ‘ड्रेजिंग’मुळे नदी गढूळ होऊ शकते आणि जलचरांपर्यंत आणि जलचर वनस्पतीपर्यंत पोहोचणाऱ्या सूर्यप्रकाशाचे प्रमाण कमी होते. परिणामी त्यांच्या पुनरुत्पादनावर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांना वाटते.
हेही वाचा : Internet Archive Hacked : सायबर हल्ल्यात लाखो पासवर्ड आणि ईमेलची चोरी; नेमके प्रकरण काय?
‘ड्रेजिंग’ तंत्रज्ञानाबाबत तंत्रज्ञांचा दावा काय?
‘ड्रेजिंग’चे उदयोन्मुख तंत्रज्ञान कमी हानीकारक असल्याचा दावा तंत्रज्ञ करत आहेत. निवडक आणि अचूक ठिकाणीच ‘ड्रेजिंग’ करू शकणारी सेन्सर्ससह सुसज्ज अशी रिमोटने हाताळता येणारी मानवरहित वाहने आहेत. यामुळे ड्रेजिंगच्या ठिकाणी गढूळपणा कमी होतो आणि ‘ड्रेजिंग’ करताना निघणाऱ्या गाळाची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावता येते. हे तंत्रज्ञान विशेषकरून अशा क्षेत्रांसाठी उपयुक्त आहे, ज्या ठिकाणी ‘ड्रेजिंग’ करणे आव्हानात्मक आहे, असाही दावा तंत्रज्ञांनी केला आहे.
ॲमेझॉन नदीची वैशिष्ट्ये काय?
ॲमेझॉन नदीने सर्वात जास्त पाणी वाहून नेण्याचा विक्रम केला आहे. समुद्रसपाटीपासून ५,५९८ मीटर उंचीवर असलेल्या पेरुव्हियन अँडीजमध्ये तिचा उगम होतो. ऋतुमानानुसार तिचा आकार बदलतो. मात्र, सध्या ॲमेझॉन नदीचे खाेरे अभूतपूर्व दुष्काळ अनुभवत आहे. संपूर्ण प्रदेशात पाण्याची पातळी ऐतिहासिक पातळीपर्यंत घसरली आहे. कोरड्या हंगामात तिची रुंदी चार ते पाच किलोमीटर असते, पण ओल्या हंगामात ती ५० किलोमीटरपर्यंत वाढू शकते. सर्वोच्च प्रवाहाच्या वेळी नदीचा प्रवाह ताशी सात किलोमीटर वेगाने पोहचू शकतो. महासागरापर्यंत पोहोचणाऱ्या जगातील गोड्या पाण्यापैकी सुमारे एक षष्टांश पाणी ॲमेझॉनच्या ३२० किलोमीटर रुंद ठिकाणाहून जाते, कारण ते अटलांटिकमध्ये रिकामे होते.
हेही वाचा : रखरखीत सहारा वाळवंटात ऐन उन्हाळ्यात मुसळधार पाऊस कसा पडला? अवकाळी पाऊस वरदान ठरणार?
शास्त्रज्ञांना कशाची भीती?
शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की २०२६ पर्यंत ॲमेझॉन खोरे नैसर्गिक ओलावा पूर्णपणे प्राप्त करू शकत नाही. नद्या पुन्हा भरण्यास सुरुवात करू शकणाऱ्या पातळीवर पाऊस पडणे अद्याप तरी अपेक्षित नाही आणि नदीच्या पातळीत घसरण होत राहण्याचा अंदाज आहे. १९०२ नंतर ॲमेझॉन नदी सर्वात खालच्या स्तरावर पोहोचली. गेल्या वर्षीपासून सरासरीपेक्षा कमी पावसाने, अगदी पावसाळ्यातसुद्धा ॲमेझॉन आणि दक्षिण अमेरिकेच्या बऱ्याच भागांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. तसेच ब्राझील आणि बोलिव्हियामध्ये सर्वाधिक भीषण वणवा लागला आहे. नेहमीपेक्षा कमी कमकुवत मोसमी पावसामुळे हा प्रदेश कधीही पूर्णपणे सावरला नाही. गेल्या वर्षीच्या दुष्काळाचे अनेक परिणाम अजूनही जाणवत आहेत.
rakhi.chavhan@expressindia.com