अमोल परांजपे
कॅनडामध्ये खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारतीय गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचा सनसनाटी आरोप तेथील पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केल्यामुळे नवा आंतरराष्ट्रीय पेच निर्माण झाला आहे. कॅनडाने केवळ आरोप न करता भारताच्या ओटावा वकिलातीमधील एका अधिकाऱ्याला ‘रॉ’चा स्थानिक प्रमुख असल्याचा आरोप करत मायदेशी पाठविले आहे. या घटनेमुळे भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले गेले असतानाच भारताची गुप्तचर संस्था इस्रायलच्या ‘मोसाद’प्रमाणे काम करत असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

‘रॉ’ संस्थेचे उद्दिष्ट काय?

रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (रॉ) ही अन्य देशांमध्ये हेरगिरी करणारी भारताची गुप्तहेर यंत्रणा आहे. संस्थेची उद्दिष्टे पाहिली तर त्यात सर्वप्रथम आहे अन्य देशांमधील राजकीय, लष्करी, आर्थिक आणि वैज्ञानिक प्रगतीवर लक्ष ठेवणे आणि त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो हे अभ्यासणे. दुसरे उद्दिष्ट आहे भारताच्या हितासाठी शक्य असेल तेव्हा जनमत तयार करणे किंवा अन्य सरकारांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करणे. तिसरे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे राष्ट्रहित जपण्यासाठी गुप्त मोहिमा आखणे आणि अमलात आणणे. अन्य देशांमध्ये दहशतवादविरोधी मोहिमा अमलात आणण्याचे उद्दिष्टही १९६८ साली स्थापन झालेल्या ‘रॉ’ने समोर ठेवले आहे. यातील तिसरे आणि चौथे उद्दिष्ट डोळ्यासमोर आणले तर कॅनडामध्ये राहून भारतविरोधी कारवाया करणाऱ्या निज्जरच्या हत्येमागे ‘रॉ’चा हात नसेलच असे ठामपणे म्हणता येत नाही. असे असले तरी ट्रुडो यांचे आरोप भारताने स्पष्ट शब्दांत फेटाळले आहेत. ‘रॉ’ आणि ‘मोसाद’मध्ये हा मुख्य फरक म्हणता येईल.

iran supreme leader statement
इराणच्या सर्वोच्च नेत्याकडून भारतातील मुस्लिमांबाबत वादग्रस्त टिप्पणी; परराष्ट्र मंत्रालयानेही सुनावले खडे बोल; म्हणाले…
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
thackeray group criticized pm narendra modi
“पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची काळजी” ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले…
loksatta analysis osama bin laden s son hamza is alive preparing to attack
ओसामा बिन लादेनचा मुलगा जिवंत? अल कायदाचा म्होरक्या बनून ९/११ सारख्या हल्ल्याची तयारी करतोय? नवीन माहितीमुळे खळबळ!
chess olympiad india strongest team in budapest to win gold medal
सुवर्णयशाचे ध्येय! बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील भारताच्या मोहिमेस आजपासून प्रारंभ
Pervez Musharraf land acqasition
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती मुशर्रफ यांच्या भारतातील वडिलोपार्जित जमिनीचा लिलाव; शत्रू संपत्ती कायदा काय आहे?
putin mongolia visit
पुतिन विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अटक वॉरंट; मंगोलियाच्या कृत्याने वेधलं जगाचं लक्ष; नक्की काय घडलं?
How India response to Vladimir Putin in the Ukraine war
युक्रेन युद्धात पुतिन यांना हवी भारताची मध्यस्थी? भारताकडून प्रतिसादाची शक्यता किती?

आणखी वाचा-अँट्रिक्स-देवास करार हा इस्रोसाठी कटू इतिहास का आहे?

‘मोसाद’च्या कारवाया वेगळ्या का?

दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेला इस्रायलच्या चारही बाजूंना अरब शत्रूराष्ट्रे आहेत. याचा वेळोवेळी फटकाही इस्रायलला बसला आहे. त्यामुळे स्थापनेपासूनच या देशाने संरक्षणावर अत्यंत भर दिला आहे. याचाच एक भाग असलेली ‘मोसाद’ ही गुप्तचर संस्था जगभरात कारवायांसाठी प्रसिद्ध आहे. महायुद्धानंतर युरोप-अमेरिकेमध्ये वेशांतर करून राहणाऱ्या अनेक नाझी युद्धगुन्हेगारांना पकडण्याचे किंवा संपविण्याचे काम ‘मोसाद’ने केले आहे. म्युनिच ऑलिम्पिकमध्ये इस्रायलच्या काही खेळाडू व प्रशिक्षकांचे हत्याकांड करणाऱ्या प्रत्येकाला इस्रायली गुप्तहेरांनी कंठस्नान घातल्याचे सर्वश्रूत आहे. यावर अनेक चित्रपटही तयार झाले आहेत. थोडक्यात सांगायचे तर ‘मोसाद’ ही गुप्तहेर संस्था असली तरी तिच्या कारवाया गुप्त राहिलेल्या नाहीत. उलट इस्रायली राज्यकर्त्यांनी या कहाण्या अधिक चवीपरीने चघळल्या जातील, याचीच व्यवस्था केल्याचे अनेकदा दिसते. आजवर भारतीय गुप्तहेरांबाबत असे काही घडले नव्हते. मात्र कॅनडाच्या आरोपांनंतर अन्य काही घटनांचीही चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाकिस्तान, ब्रिटनमधील संशयास्पद अपघाती मृत्यू…

१९ जून रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामध्ये एका गुरुद्वाराबाहेर निज्जर याची गोळ्या झाडून हत्या झाली. त्याच्या आधी तीन दिवस, १६ जून रोजी खलिस्तान लिबरेशन फोर्स या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा म्होरक्या अवतारसिंग खंदा हा ब्रिटनच्या बर्मिंगहॅममधील एका रुग्णालयात मरण पावला. त्याच्यावर विषप्रयोग झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात असलेला तिरंगा काढण्यामागे या अवतारसिंगचा हात होता. कॅलिफोर्नियामध्ये गुरपतवंतसिंग पन्नू हा रस्त्यावरील अपघातात मारला गेला. मार्च २०२२मध्ये आयसी-८१४ विमान अपहरणात सहभाग असलेल्या झहूर मिस्त्री याची कराचीमध्ये गोळ्या झाडून हत्या झाली. १९८५च्या एअर इंडिया बॉम्बस्फोटातील आरोपी रिपुदमनसिंग मलिक याची ब्रिटनच्या सरे येथे जुलै २०२२मध्ये हत्या झाली. २०२१मध्ये हरविंदरसिंग संधू पाकिस्तानमध्ये अमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे मृत्यू पावला. गेल्या चार-पाच वर्षांत झालेले असे अनेक संशयास्पद मृत्यू निज्जरच्या हत्येचा भारतीय गुप्तहेरांवर आरोप झाल्याने पुन्हा चर्चेत येणार आहेत.

आणखी वाचा-हरदीप सिंग निज्जर कोण होता? खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येवरून कॅनडाने भारतावर आरोप का केले?

भारतावर आता ‘पाच डोळ्यां’ची नजर?

कॅनडाच्या आरोपांची ऑस्ट्रेलियाने सर्वप्रथम दखल घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांनी आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे आणि आपली चिंता भारतीय परराष्ट्र खात्याच्या कानी घातल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाने यावर तातडीने प्रतिक्रिया देण्याचे कारण त्यांचे कॅनडाबरोबर असलेला करार. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, ब्रिटन आणि अमेरिका या पाच देशांच्या गुप्तहेर संस्थांचा कथित ‘फाईव्ह आईज’ (पाच डोळे) नावाचा करारगट आहे. या संस्था आपल्याकडील गुप्त माहिती या गटाद्वारे परस्परांना पुरवित असतात. त्यामुळे कॅनडाच्या आरोपांमध्ये या अन्य चार देशांच्या गुप्तहेर संस्थाही लक्ष घालणे क्रमप्राप्त आहे. वर उल्लेख केलेल्या काही कारवाया या अमेरिका-ब्रिटनमधील असल्यामुळे आता त्यावरही संशय व्यक्त केला जाऊ शकतो. याला भारतीय गुप्तचर यंत्रणा कसे तोंड देते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

भारतीय गुप्तहेरांचा नवा चेहरा?

अजित डोभाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाल्यानंतर अनेक बदल झाले आहेत. यापूर्वी भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना जशास तसे उत्तर कधी दिले गेले नव्हते. मात्र उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेले ‘सर्जिकल स्ट्राईक’ हे बदललेल्या भारताचे द्योतक बनले. काही माजी गुप्तहेरांच्या मते एकेकाळी स्वत: गुप्तहेर असलेले डोभाल हे शांतपणे दहशतवादी कारवाया बघत बसणाऱ्यांपैकी नाहीत. त्यामुळे अलिकडच्या काळातील गुप्तचर मोहिमांमागे त्यांचेच डोके असल्याचे मानले जात असले तरी अर्थातच याला सबळ पुरावा नाही. देशाच्या राजकीय नेतृत्वाने ‘रॉ’ला दिलेला काहीसा मुक्तहस्तही यामागे असू शकेल. अर्थात, अशा वेळी शांतपणे आपले काम साध्य करून त्याची जबाबदारी नाकारण्याचे धोरण अवलंबावे लागते. निज्जरच्या हत्येचा आरोप झाल्यानंतर भारताने हे धोरण अंगिकारले आहे. आता याचे आंतरराष्ट्रीय परिणाम पचनी पाडण्याची मुत्सद्देगिरी भारत सरकारला दाखवावी लागणार आहे.

amol.paranjpe@expressindia.com